दाद्रा व नगरहवेली : महाराष्ट्र व गुजरात राज्यांच्या सीमेवरील केंद्रशासित प्रदेश. क्षेत्रफळ ४९१ चौ . किमी. लोकसंख्या ७४,१७० (१९७१). विस्तार २०° १० उ. ते २०° ६० उ. व ७३° पू. ते ७३° ३० पू. यांदरम्यान. हे मुंबईच्या उत्तरेस सु. २०० किमी. आणि भारताच्या पश्चिम किनाऱ्यापासून २० ते ५० किमी. दूर आहे. याच्या उत्तरेस व पूर्वेस गुजरात राज्याचा बलसाड जिल्हा आणि दक्षिणेस व पश्चिमेस महाराष्ट्र राज्याचा ठाणे जिल्हा असून दाद्रा भागात तीन आणि नगरहवेली भागात ६९ खेडी आहेत. सिल्व्हासा हे प्रशासन केंद्र आहे. लोक गुजराती, वारली, मराठी, धोडिया, कोंकणी, हिंदी या भाषा बोलतात.

भूवर्णन : या राज्याचा ईशान्य, पूर्व व दक्षिण भाग डोंगराळ असून मध्य व पश्चिम भाग त्या मानाने सपाट आहेत. दमणगंगा (संदलखाल) ही एकच नदी राज्यातून आग्नेय–वायव्य दिशेने गेलेली आहे.

हवामान : पावसाळ्यात (सु. पाच महिन्यांच्या) नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून सु. ७० दिवसांत येथे १९५ सेंमी. पाऊस पडतो. सरासरी कमाल तपमान ३०° से. व किमान २०° से पर्यंत असते.

या राज्याचा सु. ४१·५% भाग वनाच्छादित असून त्यात सागवान, खैर, शिसू, शिवण (पांढरा साग), बाबू, चंदन इ. उपयुक्त वृक्ष आहेत.

येथील जंगलात उत्तर सह्याद्रीतील चित्ता, अस्वल, कोल्हा, लांडगा, डुक्कर, सायाळ इ. वन्य प्राणी व महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये नेहमी आढळणारे पक्षी, कीटक, साप वगैरे आढळतात.

इतिहास व राज्यव्यवस्था : मराठ्यांच्या आरमाराने पोर्तुगीजांची काही गलबते लुटली. त्याची भरपाई म्हणून ११ जानेवारी १७८० रोजी झालेल्या एका तहाने नगरहवेली परगण्यातील ७२ गावे खंडणी म्हणून पेशव्यांकडून पोर्तुगीजांकडे आली (१७८३). तेव्हापासून दमण भागापासून मधल्या ८ ते ११ किमी. रुंदीच्या पट्‌ट्याने वेगळा झालेला हा विभाग पोर्तुगीजांकडेच राहिला. १८३३ मध्ये बेरनार्दो पेरेझ दा सिल्व्हा या गोमंतकीयाने पोर्तुगालच्या राजाकडून प्रशासक म्हणून मिळवलेली नेमणूक यूरोपीय पोर्तुगीजांना सहन न होऊन त्यांनी अठराच दिवसांत गोव्यातून त्याला हुसकून लावले तेव्हा त्याने दमणला कारभार सुरू करून दमण व दीवप्रमाणेच दाद्रा व नगरहवेलीवरही सु. दोन वर्षे अंमल गाजवला होता. नंतर स्वयंसेवक व आरमार जमवून दा सिल्व्हा याचा गोव्यात परत सत्ता मिळविण्याचा प्रयत्न  दुर्दैवाने फसला व हा प्रदेश पूर्ववत पोर्तुगीज कारभाराखाली गेला. शतकाचा अवधी लोटल्यानंतर भारत स्वतंत्र होताच पोर्तुगीजव्याप्त प्रदेशातही मुक्तिआंदोलन सुरू झाले. दाद्रा व नगरहवेली प्रदेशाजवळच्या दमण येथील पोर्तुगीज सत्ताकेंद्रापासून तुटक पडल्याचा फायदा अचूकपणे घेऊन दाद्रामधील प्रजेने ‘युनायटेड फ्रंट ऑफ गोवन्स’ या पक्षाच्या मदतीने २१ जुलै १९५४ रोजी पोर्तुगीज सत्ता झुगारून दिली. पाठोपाठ नगरहवेलीच्या लोकांनीही ‘इंडिपेंडंट युनायटेड पार्टी ’ व ‘गोवा पीपल्स पार्टी ’ यांच्या साह्याने २ ऑगस्ट १९५४ रोजी पोर्तुगीजांच्या अंमलातून सुटका करून घेतली. तेथे सैन्य पाठविण्याच्या हक्कासाठी पोर्तुगालने हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे दाद मागितली होती परंतु त्यांचा हा हक्क तेथे मान्य झाला नाही. मुक्तीनंतर या स्वायत्त प्रदेशांवर केंद्राची देखरेख होती. १९६१ मध्ये सातवा संघराज्यांतर्गत प्रदेश म्हणून दाद्रा व नगरहवेलीला मान्यता मिळून तेथील लोकांनी निवडून दिलेला एक सदस्य भारताच्या लोकसभेत बसू लागला. आता प्रदेशाचा अंतर्गत कारभार एक प्रशासक पहात असून त्याला सल्ला देणारी २१ सदस्यांची वरिष्ठ पंचायत आहे. न्यायव्यवस्था मुंबई वरिष्ठ न्यायालयाच्या अधिकारकक्षेत आहे. सिल्व्हासा येथे दिवाणी, जिल्हा व सत्र न्यायालये आहेत. सिल्व्हासा हे मुख्य शासकीय व व्यापारी ठाणे प. रेल्वेच्या वापी स्थानकापासून पूर्वेस १८ किमी. आहे.


आर्थिक स्थिती : या प्रदेशांत शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. मध्य भागातील मृदा खोलपर्यंत चिकणमातीयुक्त आहेत. त्यांना उन्हाळ्यात भेगा पडतात. उत्तर व दक्षिण भागातील मृदांचे थर फिरत्या शेतीमुळे धूप होऊन उथळ व मुरूममिश्रित झाले आहेत. तथापि त्यांत ओलावा टिकून राहून पिके चांगली येतात. १९७४–७५ मध्ये १८,००० हे. जमीन शेतीखाली होती. भात व रागी ही मुख्य पिके होतात. भाताखाली ९,६११ हे. व रागीखाली २,७१७ हे. क्षेत्र होते. सुधारित प्रकारची भातशेती व जास्त उत्पन्न देणारी भातशेती यांखाली अनुक्रमे २,१९५ व ३,७१८ हे. क्षेत्र मुख्यतः पावसावरच अवलंबून आहे. तेलबिया व ऊस ही नगदी पिके होत. गव्हाचे रब्बी पीक काढण्यास प्रोत्साहन देण्यात येत असून २०८ हे. क्षेत्र गव्हाखाली आहे. कृषिव्यवसायाला पूरक उद्योग म्हणून फलसंवर्धनव्यवसाय विकसित करण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत. राज्यात एकूण २,६२६ हे. जमीन पडीक आहे. भूसंधारण योजनेखाली १९७४–७५ साली ३०० हे. क्षेत्रात सोपान शेती करण्याचे उद्दिष्ट होते. भूसंधारणासाठी ५०% अनुदान दिले जाते. येथे मोठ्या जलसिंचन योजना नाहीत. तथापि गुजरातच्या दमणगंगा प्रकल्पाबाबत या प्रदेशाचा सहयोग आहे. खान्वेल व बिंद्राबिन येथे छोट्या जलसिंचन योजना पुऱ्या झाल्या आहेत. तिग्रा, खेर्डी, खडोली, तिनोदा, खान्वेल–बिंद्राबिन व दाद्रा येथे उपसा जलसिंचन योजना आहेत.

प्रदेशाची वनसंपत्ती अधिक संपन्न करण्यासाठी सागाच्या व बांबूच्या सुधारलेल्या जातींची लागवड, रस्त्यांच्या दुतर्फा निलगिरी वृक्षारोपण असे उपक्रम चालू आहेत.

राज्यात एक गुरांचा दवाखाना व दोन उपचार केंद्रे असून १९७३–७४ मध्ये ४,९८० जनावरांवर मोफत उपचार करण्यात आले. १९७४–७५ मध्ये एक पशुसंवर्धन केंद्र व एक कुक्कुटपालन केंद्र उभारण्यात आले असून चार कांक्रेजी जातीचे वळू पुरविले आहेत. या वर्षी दाद्रा व नगरहवेलीत प्रथमच गोबर वायू केंद्र उभारण्यात आले. सध्या या प्रदेशात चाळीसच्या वर लहान कुक्कुटपालन केंद्रे असून ती सर्व आदिवासी लोकांच्या मालकीची आहेत. हे कृषिपूरक उपक्रम उपयुक्त ठरत असून १९७३–७४ मध्ये सहा शेतकऱ्यांना कुक्कुटपालनासाठी २६,००० रु, व बारा शेतकऱ्यांना दुग्धव्यवसायासाठी २०,००० रू. कर्ज देण्यात आले. १९७४–७५ मध्ये ४८ शेतकऱ्यांना पशुपालन व कुक्कुटपालन यांसाठी २०,३०० रू. कर्ज दिले गेले. १९७३–७४ मध्ये शासकीय दूध प्रकल्पात ३९,७४४ लि. दूध उत्पादन झाले. सिल्व्हासा येथील कुक्कुटपालन केंद्रातून त्या वर्षी ३१,२५५ अंडी मिळाली.

उद्योगधंदे : या प्रदेशात खनिजे उपलब्ध नाहीत व मोठे औद्योगिक उपक्रमही नाहीत. तथापि सिल्व्हासाजवळ पिपरिया येथील औद्योगिक वसाहतीत ५६ छोटी औद्योगिक केंद्रे असून त्यांत मोटारींचे सुटे भाग, जंतुनाशके, प्रकाशीय काचा, अभियांत्रिकी माल, हातकागद, कापडी व नायलॉन फिती, दोर, ‘फोम’ रबराच्या वस्तू, प्रक्षालके, साबण, रासायनिक पदार्थ, कमावलेली कातडी, कौले, कापड इ. उत्पादन होते.

विद्युत् शक्ती : गुजरातमधील वापी वीज उपकेंद्रातून या राज्याला वीज मिळते. १९७५ मध्ये २० गावांना वीज पुरविण्यात आली होती. ९३ पंप आणि नलिकाकूप यांस वीज पुरविली जाते. सिल्व्हासा येथे ६६ किवॉ. क्षमतेचे उपकेंद्र उभारण्याची योजना मान्य झालेली आहे. त्याचा लाभ ६,८०० हे. क्षेत्रास होईल.

वाहतूक : या राज्यात सडका एवढेच वाहतूक माध्यम उपलब्ध आहे. १९७३–७४ मध्ये १०७·४४ किमी. डांबरी ३६·९७ किमी. खडीच्या १५·८४ किमी. मुरूमाच्या व २७·९८ किमी मातीच्या सडका होत्या. १९७५ मध्ये मोटारी चालविण्यास उपयुक्त रस्ते १५८ किमी. होते. पावसाळ्यात पुलांच्या अभावी वाहतूक थंडावते.


लोक व समाजजीवन : दाद्रा व नगरहवेलीच्या एकूण लोकसंख्येपैकी १९७१ मध्ये ४९·८४% पुरूष व ५०·१६% स्त्रिया होत्या. दर १,००० पुरुषांस १,००७ स्त्रिया असे प्रमाण आहे. एकूण लोकसंख्येपैकी ८७% लोक आदिवासी आहेत. त्यांपैकी ९५·८३% हिंदू, १ % मुस्लिम, २·५८% ख्रिस्ती, १·१ % बौद्ध, ०·४१ % जैन, ०·०३% इतर धर्मांचे असून ०·०५ % लोकांचा धर्म नोंदलेला नाही. लोकवस्तीची घनता १९७१ मध्ये दर चौ. किमी. ला १५२ होती. देशाच्या (दर चौ. किमी. १८२) सरासरी घनतेपेक्षा ती कमी आहे कारण प्रदेश डोंगराळ असून अरण्यव्याप्त भाग मोठा आहे हे होय. साक्षरतेचे प्रमाण १४·८६% (१९७१) होते. त्यात पुरुषांचे साक्षरतेचे प्रमाण २२% व स्त्रियांचे ७·७७% आहे. १९६२ मध्ये एकूण साक्षरता ९·४९% होती त्यात पुरुषांची १४·७१% व स्त्रियांची ४·०५% होती. यावरून याबाबतची प्रगती दिसून येते. तथापि २८·८२० पुरुष व ३४,३२५ स्त्रिया अद्याप निरक्षर आहेत. यावरून याबाबत केवढे मोठे कार्य व्हावयास पाहिजे याची कल्पना येते. १९७१ मध्ये ७२·७५% लोक शेतकरी, १६·९६% लोक शेतमजूर व १०·२९% लोक वनोद्योग, मच्छीमारी, पशुपालन, बागा, कुटिरोद्योग, बांधकाम, व्यापार, वाहतूक इ. इतर व्यवसायांत होते. १९७१ मध्ये ४७·१७% कामकऱ्यांपैकी ५५·४३% पुरुष व ३८·९६% स्त्रिया होत्या.

शिक्षण, आरोग्य, जलसिंचन, उद्योगधंदे, वाहतूक इ. सोयी करून देऊन आदिवासींचे मागासलेले जीवनमान उंचावण्याचे प्रयत्न शासकीय स्तरावर चालू आहेत. १९७५ मध्ये शासकीय १४४, अनुदान घेणाऱ्या मिशनरी १२ व अनुदान न घेणारी मिशनरी १ अशा एकूण १५७ प्राथमिक शाळा होत्या. १९७३–७४ मध्ये त्यांत ६,६२० मुलगे व ३,४३४ मुली होत्या. पूर्व प्राथमिक ४ व माध्यमिक ४ शाळा होत्या. माध्यमिक शाळांत ५८८ मुलगे व २६२ मुली होत्या. ८ शासकीय समाजकल्याण वसतिगृहे व राखोलीला अनुसूचित जाती–जमाती व इतर मागासवर्ग यांसाठी १ आश्रमशाळा आहे. आदिवासींसाठी खास शिष्यवृत्या ठेवलेल्या आहेत. सिल्व्हासा व नरोली येथे ग्रंथालये आहेत. सिल्व्हासा येथे २५ खाटांचे एक रूग्णालय असून तेथे क्ष–किरण उपचार आणि क्षय व कुष्ठरोग यांवरील उपचार यांची सोय आहे. नरोली व दुधनी येथे दवाखाने असून किळवणी व खान्वेल येथे प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. फिरत्या दवाखान्याने आदिवासींच्या दारापर्यंत वैद्यकीय साह्य पोहोचविले जाते. सहकारी संस्थांचाही विकास येथे चांगला होत आहे.

दळणवळणाच्या वाढत्या सोयी व जंगलातील आणि फळबागांतील उत्पन्ने दक्षिण गुजरातमध्ये पाठविण्याची झालेली व्यवस्था दाद्रा व नगरहवेलीतील आदिवासींचा गुजरातमधील पुढारलेल्या जनतेशी संपर्क वाढत आहे.

ओक, शा. नि. कुमठेकर, ज. ब.


दाद्रा व नगरहवेली


राजधानी सिल्व्हासा

आदिवासी नृत्य

अंबर चरखा चालवणाऱ्या आदिवासी महिला, सिल्व्हासा

दमणगंगा नदीवरील पूल