महानदी : भारताच्या मध्य प्रदेश व ओरिसा राज्यांतून वाहणारी आणि बंगालच्या उपसागाला मिळणारी एक महत्त्वाची नदी. लांबी ८५८ किमी. जलवाहन क्षेत्र १,३२,१०० चौ. किमी. मध्ये प्रदेश राज्याच्या रायपूर जिल्ह्यातील सिहाव गावापासून काही अंतरावर एका लहानशा कुंडात हिचा उगम होतो. साधारण पुराच्या वेळी प्रतिसेकंदास सु. ४२,४७५ घ.मी. इतक्या प्रचंड प्रमाणावर नदीतून पाणी वाहत असते. त्यामुळेच तिला ‘महानदी’ (मोठी नदी) असे म्हटले जात असावे. ‘चित्रोत्पला’ असाही तिचा नामोल्लेख आढळतो.

पहिल्या टप्प्यात अनेक उपनद्यांसह महानदी रायपूर जिल्ह्यातून प्रथम थोडी उत्तरेकडे व नंतर ईशान्येकडे वहात जाते. सुरुवातीला छत्तीसगढ द्रोणीच्या पूर्वेकडील भागाचे जलवाहन करीत २०४ किमी. उत्तरेकडे वाहत गेल्यावर पश्चिमेकडून येणारी सेवनाथ नदी मिळाल्यावर ही पूर्ववाहिनी बनते. प्रथम बिलासपूर जिल्ह्यातील दक्षिण सरहद्दीवरून व नंतर रायगढ जिल्ह्यातून पूर्वेकडे वहात जाऊन ओरिसात प्रवेश करते. येथपर्यंत तिला अनेक उपनद्या मिळतात. त्यांपैकी पैरी, जोंक, औंग तेल या उजवीकडून मिळणाऱ्या, तर इब, मांड, हसदेव (हसदो) व सेवानाथ या डावीकडून मिळाणाऱ्या प्रमुख उपनद्या आहेत. या सर्व नद्या मिळून छत्तीसगढ विभागाचे म्हणजेच दुर्ग, रायपूर, बिलासपूर, रायगढ व बस्तर जिल्ह्यांच्या काही भागांचे जलवाहन करतात.

ओरिसा राज्यात महानदीवर संबळपूरजवळ हिराकूद धरणाचा बहूद्देशीय प्रकल्प उभारण्यात आला आहे. धरणापासून पुढे नदी दक्षिणवाहिनी बनते व पूर्व वनाच्छादित घळ्यांमधून नागमोडी वळणांनी वाहू लागते. सतकोसिआ ही येथील प्रसिद्ध घळई आहे. येथे अनेक द्रुतवाहही आढळतात. त्यानंतर महानदी पूर्ववाहिनी बनून पुढे कटकपासून ओरिसाच्या मैदानी प्रदेशात प्रवेश करते व शेवटी अनेक मुखांनी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. यांपैकी मुख्य फाटा फॉल्स दिवी पॉइंटजवळ उपसागराला मिळतो. कटकापासून नदी अनेक शाखांमध्ये विभागली गेली असल्याने तेथे सु. २४० किमी. रुंदीच्या त्रिभुज प्रदेशांची निर्मिती झालेली आहे. कातजुरी, कोयाखाई, सुरुआ, देवी, पैकी, बिरूपा, चितरतळा, गेंगुती, न्यून हे महानदीचे त्रिभुज प्रदेशातील फाटे असून पुरी, कोनारक, पारादीप, कटक, भुवनेश्वर इ. त्या प्रदेशातील मुख्य ठिकाणे आहेत. महानदीच्या खोऱ्याने ओरिसा राज्यातील संबळपूर, बोलानगीर, फुलबानी, कालाहंडी, धेनकानाल, पुरी व कटक या जिल्ह्यांचे पूर्ण किंवा आंशिक भाग व्यापले आहेत.

महानदीचा खालचा टप्पा जलवाहतुकीय योग्य आहे. ओरिसा राज्यातील डोंगराळ व जंगलमय भागातील लाकडेच ओंडके नदीप्रवाहातून वाहून आणले जातात. नदीला येणाऱ्या पुरामुळे छत्तीसगढ मैदान व विशेषतः किनारी प्रदेशातील पिके, वाहतूक व दळणवळणाचे मार्ग, मानवी वसाहती यांची खूप हानी होते. १९६१ मध्ये आलेल्या पुरामुळे दुर्ग, बिलासपूर व रायगढ जिल्ह्यांतील अनेक गावांची व ३,०५५ हे क्षेत्रातील भातपिकाची हानी झाली. १९२७, १९३३ व १९३७ या वर्षीही ओरिसा राज्यात महानदीच्या पुरामुळे विस्तृत क्षेत्रातील पिके वाहून गेली व फार मोठी हानी झाली. महानदी आणि तिच्या उत्तरेकडील ब्राह्मणी व वैतरणी या तिन्ही नद्यांचा सलग असा विस्तृत त्रिभुज प्रदेश आढळतो. त्यामुळे पुराच्या वेळी त्रिभुज प्रदेशातील हा विस्तृत भाग पाण्याखाली येतो.

नदीच्या पाण्याचे एवढे प्रचंड प्रमाण असल्याने जलसिंचन व जलविद्युतनिर्मिती यांना खूप वाव आहे. तथापि या जलसंपत्तीचा म्हणावा इतका योग्य व पुरेसा उपयोग करून घेतलेला आढळत नाही. महानदी, तंदुला व कुरुंग असे तीन प्रमुख कालवा-समूह या खोऱ्यांत आहेत. पैकी महानदी कालव्याची चार उपकालव्यांसह लांबी २२१.९४ किमी. असून जलसिंचनक्षमता १,४४,८२९ हे. आहे. तंदुला कालवा सेवानाथ नदीवर बांधलेल्या धरणापासून काढलेला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात मात्र नदीतील पाण्याच्या योग्य वापराकडे विशेष लक्ष देण्यात आले. जौंक, पैरी, हसदेव−मांड, मोंग्रा, आरपा, हाप हे माहनदीच्या उपनद्यांवरील, तर महानदी जलाशय, हिराकूद, तिकरपारा, नराज हे महानदीवरील प्रमुख प्रकल्प आहेत. महानदी जलाशय प्रकल्प मध्य प्रदेश राज्यात असून याचे टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यांत रविशंकर सागर प्रकल्प, भिलाई पोलाद कारखान्याला पाणीपुरवठा करण्यासाठी संपूरक आणि सांडूर नदीवरील धरण व त्याचे कालवे यांचा समावेश होतो. दुसऱ्या टप्प्यात महानदी संपूरक कालव्याचा विस्तार, अमनपूर उच्चालक कालवा व महानदी प्रमुख कालव्याचा फाटा क्र. २ चा विस्तार या गोष्टी येतात. ओरिसा राज्यातील तिकरपारा येथे १,२७१ मी. लांबीचे धरण असून त्यावर प्रत्येकी १२५ मेवॉ. क्षमतेचे १६ जलविद्युत्निर्मिती संच आहेत. तिकरपाराच्या खाली नारज धरण आहे.

छत्तीसगढ द्रोणी व किनारी मैदानांचा प्रदेश वगळता नदीखोऱ्यात बाकीचा बराचसा भाग जंगलव्याप्त आहे. छत्तीसगढ द्रोणी व त्रिभुज प्रदेशातील मृदा तांबडी व पिवळी आहे. तेथे पर्जन्याचे प्रमाण जास्त असून बराचसा प्रदेश जलसिंचनाखाली आणलेला आहे. त्यामुळे तेथून कृषि-उत्पादने मोठ्या प्रमाणावर (वर्षांतून तीन पिकेही) घेतली जातात. भात या मुख्य पिकाशिवाय गहू, जवस, कडधान्ये यांचेही उत्पादन घेतले जाते. ताग हे त्रिभुज प्रदेशातील मुख्य पीक आहे. त्रिभुज प्रदेशातील वेगवेगळ्या शाखांपासून काढलेल्या कालव्यांबरोबरच येथे असलेल्या मोठ्या प्रमाणावरील तलावांचाही जलसिंचनासाठी उपयोग केला जातो.

चौधरी, वसंत