नारायणगंज बंदराचे दृश्य

नारायणगंज : बांगला देशातील औद्योगिक शहर. लोकसंख्या २,७०,६८० (१९७४). हे डाक्का जिल्ह्यात, डाक्क्याच्या आग्नेयीस सु. १३ किमी. असून लाख्या व ढालेश्वरी या नद्यांच्या संगमावर वसले आहे. डाक्क्याचे हे मुख्य नदीबंदर असून चितगाँग व इतर मुख्य अंतर्गत बंदरांशी बोटीने जोडले आहे. येथे देशातील सर्वांत मोठी बाजारपेठ असून तीत कातडी, ताग, तांदूळ, मासे व जवस या प्रमुख वस्तूंचा समावेश होतो. तसेच डाक्का–नारायणगंज ही बांगला देशातील सर्वांत मोठी औद्योगिक वसाहत असून, तीत ताग व कापडाच्या बऱ्याच गिरण्या आहेत.उद्योगधंदे आणि व्यापार या दृष्टींनी हे भरभराटलेले शहर असून येथे जहाजदुरुस्ती व बांधणी, विणमाल, काच, बर्फ, साखर, लहानमोठे अभियांत्रिकी कारखाने हे उल्लेखनीय उद्योग आहेत. येथे १८७६ पासून नगरपालिका असून महाविद्यालय, रुग्णालय आणि वाचनालय इ. सुविधा आहेत. येथील ऐतिहासिक वास्तूंमध्ये टिपेरा संस्थानाच्या गुलाम मुहंमदाने १८०१ मध्ये बांधलेला कदम रसूल दर्गा, सोळाव्या शतकातील बंगालच्या बारा जमीनदारांनी बांधलेला व म्हणून त्यानुसार ओळखला जाणारा बारा भैया किल्ला आणि ज्यावरून शहरास नाव पडले ते बाराव्या शतकातील लक्ष्मीनारायण विष्णुमंदिर यांचा समावेश होतो.

कांबळे, य. रा.