कार्ताजीना : दक्षिण अमेरिकेतील कोलंबियाचे कॅरिबियन समुद्रावरील बंदर. लोकसंख्या ३,४७,६०० (१९७२). हे बारांगकियाच्या आग्नेयीस सु.१०० किमी. व बोगोटाच्या ईशान्येस सु.६६४ किमी., कार्ताजीना उपसागरावर आहे. या भागातील रत्नभांडार येथे जहाजावर चढवीत असल्याने कार्ताजीना स्पेनचे दक्षिण अमेरिकेतील रत्नकोठार झाले आणि संरक्षणाकरिता बंदराभोवती २९ बुरूज व शहराभोवती प्रवाळकोट असूनही सोळाव्या शतकात अनेकदा चाच्यांचे भक्ष्य झाले. स्पेनविरूद्धच्या स्वातंत्र्ययुध्दात त्याला जबरदस्त किंमत द्यावी लागली. यामुळे मॅग्डालीना नदीच्या शहराकडील फाटा गाळाने तुंबल्याने यास अवकळा आली. अलीकडे लोहमार्गामुळे व मॅग्डालीना खोऱ्यातून आलेल्या तेलनळांमुळे हे पुन्हा उर्जितावस्थेस आले आहे. याचे समुद्रावरील बंदर ला माशीना असून विमानतळ मान्सनीयो बेटावर आहे. येथे तंबाखूचे व कापसाचे पदार्थ, साबण, कातडी सामान, सुवासिक पदार्थ, औषधे, मेणबत्त्या, फर्निचर, रबराच्या वस्तू, शिसे, बिस्किटे, चॉकोलेट, बीअर, साखर, डबाबंद मासे यांचे कारखाने असून यांशिवाय तेल, सोने, प्लॅटिनम यांची येथून निर्यात होते. येथील सुंदर इमारतींत आर्चबिशपचा राजवाडा, जुनी चर्चे, कार्ताजीना विद्यापीठ, नाविक शाळा, कस्टम हाऊस इत्यादींची गणना होते.

शहाणे, मो.ज्ञा.