लडाख : भारताच्या जम्मू व काश्मीर राज्यातील क्षेत्रफळाने सर्वांत मोठा जिल्हा. राज्याच्या पूर्व भागातील या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १,१८,५२३ चौ. किमी. असून सांप्रत याचे तीन भाग झाले आहेत. पश्चिमेकडील सु. २८,५०० चौ. किमी. चा प्रदेश पाकिस्तानने व्यापला आहे, तर ईशान्येकडील सु. ३७,५५५ चौ. किमी. प्रदेश चीनव्याप्त आहे. उत्तरेस व पूर्वेस चीन आणि पश्चिमेस पाकिस्तान यांच्या सीमेवर हा प्रदेश असल्याने भूराजनैतिक दृष्ट्या, विशेषतः संरक्षणदृष्ट्या, याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. १९८१ मध्ये या प्रदेशाची एकूण लोकसंख्या २,००,००० होती. लेह हे जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण आहे.

हा प्रदेश भारतातील सर्वांत उंचावर असलेले ‘लडाख पठार’ (सस. पासून सु. ५,३०० मी.) म्हणून ओळखला जातो. स्थिर वसती असलेल्या जगातील काही उंच प्रदेशांत याची गणना होते. भूरचनेच्या दृष्टीने मध्यवर्ती सिंधू नदीचे खोरे वगळता याचा बहुतेक भाग दऱ्याखोऱ्यांनी व उंच पर्वतरांगांनी व्यापलेला आहे. येथील पर्वतरांगा वायव्य-आग्नेय दिशेने पसरलेल्या असून उत्तरेकडून दक्षिणेकडे अनुक्रमे काराकोरम, लडाख, झास्कर या प्रमुख रांगांचा त्यांत समावेश होतो. याच्या पूर्व भागात चांगचेन्मो ही पूर्व-पश्चिम पसरलेली मोठी पर्वतरांग असून तिच्या उत्तरेस सोड मैदान, देपसंग व लिंगझिटांग हे मैदानी प्रदेश आहेत. पूर्वेकडील हा प्रदेश ‘अक्साई चीन’ या नावाने ओळखला जात असून तो चीनव्याप्त आहे. अधिल पर्वतश्रेणी लडाखच्या उत्तर सीमेवर वायव्य-आग्नेय दिशेने पसरली आहे. काराकोरम पर्वतरांगेतील मौंट गॉडविन ऑस्टिन ऊर्फ के-२ हे लडाखमधील सर्वोच्च (८,६११ मी.) शिखर असून त्याचा उंचीप्रमाणे जगात दुसरा क्रमांक लागतो. याशिवाय हिडन (८,०६८ मी.), ब्रॉड (८,०४७ मी.) गाशेरब्रुम (८,०३५ मी.) ही आठ हजार मीटरपेक्षा जास्त उंचीची शिखरे याच प्रदेशात आहेत. काराकोरममधील सासेर खिंड, अधिल पर्वतश्रेणीतील काराकोरम, शक्सगम, अधिल इ. खिंडींना वाहतुकीच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय महत्त्व आहे. लेहच्या उत्तरेस असलेली स्वारडॉग खिंडही चीनमध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. लडाखमधील बहुतेक मोठ्या नद्या आग्नेय-वायव्य दिशेने वाहतात, तर त्यांच्या उपनद्या दक्षिण अथवा उत्तर दिशेने वाहतात. सिंधू नदी लडाखच्या मध्यातून वायव्येस वाहत जाऊन पाकिस्तानात प्रवेश करते. श्योक, नुब्रा या उत्तरेकडून, तर झास्कर दक्षिणेकडून सिंधूला येऊन मिळते. हिस्पार, सिमो, बिआरी, बलतोरो, सिअचेन यांसारख्या प्रचंड हिमनद्यांनी लडाखचा उत्तर भाग व्यापला आहे. प्रदेशाच्या आग्नेय कोपऱ्यातील पंगाँग, अक्साई चीन भागातील सॉल्ट इ. खाऱ्या पाण्याची प्रमुख सरोवरे आहेत. यांशिवाय या भागात उष्णोदकांचेही अनेक झरे आहेत.  

लडाखचे हवामान सर्वसाधारणपणे थंड व कोरडे आहे. जोरदार वारे व समुद्रसपाटीपासूनची उंची यांमुळे उत्तर भागात कडाक्याची थंडी (सायबीरियाच्या खालोखाल) असून हा भाग वर्षातील काही महिने बर्फाच्छादित असतो. येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ९.३ सेंमी आहे. जमीन रेताड व सु. १०%  लागवडयोग्य आहे. गहू, जब, वाटाणा, राय इ. पिके थोड्याफार प्रमाणात घेतली जातात. डोगरउतारांवर तसेच जलसिंचन सुविधा असलेल्या भागांत फळबागांचे प्रमाण जास्त आहे. सफरचंद, जरदाळू, अक्रोड यांच्या बागा मोठ्या प्रमाणात दिसून येतात. लुसर्न या जनावरांसाठी उपयुक्त गवताची लागवड बऱ्याच भागात केली जाते. खेचरे, तट्टे, याक या प्राण्यांचा दूध-दुभते, वाहतूक व कातडी यांसाठी उपयोग केला जातो. रानमेंढी, बारशिंगा, हरिण, कुरंग, तांबडे (तपकिरी) अस्वल, लेपर्ड, औंस (हिमलेपर्ड) इ. जंगली दुर्मिळ प्राण्यांसाठी हा प्रदेश प्रसिद्ध आहे. [⟶ जम्मू व काश्मीर].  

लडाखची ऐतिहासिक व राजकीय माहिती विश्वकोशातील काश्मीर समस्या जम्मू व काश्मीर भारत भारत-चीन संघर्ष भारत-पाकिस्तान संघर्ष सिमला करार इ. नोंदीमध्ये यथास्थळी आलेली आहे.


प्राचीन काळापासून लडाखचे क्षेत्र अनिश्चित राहिले आहे. याचा इतिहास पूर्णतः जम्मू-काश्मीरच्या इतिहासाशी संबंधित आहे. इ. स. चौथ्या शतकापासूनचा काश्मीरचा इतिहास शिलालेखांवरून ज्ञात होतो.  लडाखचा पहिला उल्लेख चिनी प्रवासी फाहियान याच्या प्रवास वृत्तांतात मिळतो. कल्हणच्या राजतरंगिणीतील उल्लेखावरून काश्मीरचा राजा ललितादित्य याने तिबेट व लडाख हे प्रदेश जिंकून आपल्या राज्याला जोडले. अलेक्झांडर कनिंगहॅमच्या मते नवव्या शतकात क्रांती होऊन तिबेटचे विघटन झाले व राजघराण्याच्या वाटणीत पश्चिम तिबेट वेगळा झाला. तेव्हापासून लडाख व तिबेटच्या हद्दी निश्चित झाल्या परंतु याच काळात निम्‌गॉन नावाच्या एका मुत्सद्दी व्यक्तीने तिबेटमध्ये येऊन तेथील राजाच्या मुलीबरोबर लग्न केले व लडाखसह सर्व प्रदेश आपल्या नियंत्रणाखाली आणला. यावेळी तिबेटी लोक लडाखचा उल्लेख ‘मांग्याल’ अथवा ‘माऱ्यूल’ असा करीत असत. पुढे कित्येक वर्षे हा प्रदेश निम्‌गॉनच्या वारसांच्या ताब्यात होता आणि ते ‘लडाखचे राजे’ म्हणून ओळखले जात. चौदाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात तिबेटचा राजपुत्र रिंचिन काश्मीरमध्ये घुसला आणि त्याने हळूहळू सत्ता हस्तगत केली. सतराव्या शतकात लडाख मोगल सुभेदारांच्या आधिपत्याखाली होते. त्याच शतकात मंगोल शाखेतील कलंपा नावाच्या लोकांनी लडाखवर आक्रमण केले. तेव्हापासून लडाखसह काश्मीरवर मुसलमानांचा अंमल आला. अफगाण राज्यकर्ता अहमदशाह दुर्रानीने या प्रदेशावर अनेक वेळा स्वाऱ्या केल्या व काश्मीर जिंकले. अफगाणांच्या जुलमी सत्तेला कंटाळून येथील जनतेने उठाव केला (१८१९). पुढे डोग्रा घराण्याचा संस्थापक गुलाबसिंग याच्या कारकीर्दीत काश्मीर संस्थान अस्तित्वात आले व लडाख त्याचा एक भाग बनले. त्यानंतर भारताचे स्वातंत्र्य, काश्मीर संस्थानाचे भारतात विलीनीकरण इ. ऐतिहासिक घटना घडल्या. यावेळी झालेल्या पाकिस्तान-भारत युद्धात (१९४७-४९) पाकिस्तानने लडाखचा वायव्य भाग व्यापला व तेव्हापासून आजमितीस (१९९०) हा भाग वादग्रस्त ठरला आहे. गेल्या चाळीस वर्षांत तत्संबंधी कोणताच निर्णय झाला नाही. भारत व पाकिस्तान यांत १९७२ मध्ये झालेल्या सिमला करारानुसार हा सीमावाद सोडवावा, अशी आग्रही भूमिका भारताने घेतली आहे तर संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीने जम्मू  व काश्मीर राज्यात सार्वमताचा कौल घेऊन निर्णय घ्यावा, असे पाकिस्तानला वाटते. [⟶ भारत-पाकिस्तान संघर्ष].

लडाखच्या ईशान्य सीमेवरील भारत-चीन संघर्षाला चीनच्या तिबेटवरील आक्रमणाने १९५८ मध्ये प्रारंभ झाला. तिबेटवरील वर्चस्व टिकविण्यासाठी चीनला अक्साई चीनची आवश्यकता भासली. ब्रिटिश काळापासून तिबेट, चीन व भारत यांमध्ये दोन आयोग नेमूनही सीमारेषांबाबत कधीच एकमत झाले नाही व चीनने आपल्या नकाशांप्रमाणे ३८००० चौ.किमी.चा लडाखचा भूप्रदेश चीनचा आहे असा दावा केला व भारत-चीन युद्धात (१९६२) लडाखमधील चांगचेन्मो, पंपाँग आदी प्रदेशांसह काही महत्वाची ठाणी घेतली [⟶ भारत-चीन संघर्ष]. यानंतर १९६८ पर्यंत लडाखच्या चीनव्याप्त प्रदेशाकडे कोणाचेच फारसे लक्ष गेले नाही. भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींच्या पुढाकाराने कोलंबो योजनेनुसार चीनने याबाबत बोलणी करण्यास मान्यता दिली व १९७६ मध्ये दोन देशांत वाटाघाटी सुरू झाल्या. त्यांतून दूतावास, मंत्र्याची जा-ये वाढली काही प्रमाणात व्यापार सुरू झाला व आता कैलास, मानससरोवर या ठिकाणी भारतीय यात्रेकरूंची ये-जा सुरू झाली आहे. तथापी अक्साई चीनचा प्रश्न हे अद्यापही भिजत पडलेले घोंगडे आहे. चीनने गेल्या ३० वर्षात सामरिक दृष्ट्या उपयुक्त ठरतील असे अनेक महत्वाचे रस्ते लडाखच्या चीन व पाकव्याप्त प्रदेशातून चीनशी जोडलेले आहेत. काराकोरम महामार्ग, कॅश्गार-ल्हासा, स्कार्डू-सिंक्यांग हे त्यांपैकी काही महत्वाचे मार्ग आहेत. त्यांद्वारे कोणतीही लष्करी मदत चीन पाकिस्तानला तात्काळ पुरवू शकतो. लष्करी तज्ञांच्या मते चीन भारताविरुद्ध कोणत्याही क्षणी सु. ३६ पलटणी या प्रदेशात जमा करू शकतो. त्यामुळे लडाखचा प्रदेश ही संरक्षणदृष्ट्या अंत्यत नाजुक बाब बनली आहे.  

लडाखमधील एकूण लोकसंख्येच्या निम्मे मुसलमान आसून त्याची पश्चिम भागात अधिक वस्ती आहे तर पूर्व भागात बौद्ध, हिंदू, शीख व तिबेटी लोकांची वस्ती आहे. बरेचसे मुसलमान मूळचे हिंदू असून त्यांच्यात जुन्या हिंदू चालीरीती  आढळतात. जातकर्म, उपनयन व विवाह या संस्कारांत धर्म भिन्न असले, तरी काही रूढी सारख्या आढळतात. काही हिंदू समारंभांत मुस्लिम स्त्रियाही सहभागी होतात. लडाखमधील मुसलमानांत साटेलोटे विवाहाची पद्धत रूढ असून अद्यापी बौद्धांत बहुपतित्वाची चाल आहे तसेच पेहरावांत हवामानामुळे फारसा फरक आढळत नाही. बल्टिस्तानातील मुसलमान सुन्नी पंथाचे असूनही स्थानिक श्रद्धांनुसार ते विविध विधी करतात. लडाखमध्ये चीन व तिबेट या देशांतूनच बौद्ध धर्म आला. बौद्ध धर्मियांचे प्रेरणा स्थान दलाई लामा आहे. त्याला भगवान बुद्धाचे प्रतिरूप मानतात. लडाखमधील बौद्ध धर्म तांत्रिक पंथाला जवळचा आहे. लडाखमध्ये हेमिस, शंकर थिकसे, स्पिटूक,चेदे, ट्रापक इ. प्रसिद्ध गुम्पा (गोम्पा बौद्धांची धार्मिक क्षेत्रे-मठ) आहेत. यांशिवाय इतर धर्मीयांच्या मशिदी, गुरुद्वारा आहेत. बुद्धजयंती, पद्मसंभव जयंती, गुस्तर इ. बौद्धांचे धार्मिक दिन श्रद्धेने साजरे होतात. या सर्वांत पिशाच नृत्य हा महत्वाचा समांरभ मानण्यात येतो कारण त्यावेळी स्वतः लामा नृत्य करतात. लडाखमध्ये बोधी, बल्टी, लडाखी या प्रमुख बोली भाषा असून उर्दू, हिंदी आणि तिबेटी भाषाही प्रचलित आहेत. लडाखची अशी खास संस्कृती असून तीत सर्व धर्मीयांत एकात्मता जाणवते. 

संदर्भ: 1. Grosvenor, Gilbert Hovey, Ed. National Geographic : Ladakh-the Last Shangrila, Washington March 1978.

          २. दीप, त्रिलोक, लडाख, दिल्ली, १९७३. 

देशपांडे, सु. र.