पोर्ट सैद : अरबी-बुर सद. ईजिप्तमधील प्रमुख शहर व दुसऱ्या क्रमांकाचे बंदर. लोकसंख्या ३·४२ लक्ष (१९७४ अंदाज). हे भूमध्यसमुद्र व मेंझाला सरोवर यांदरम्यान अरुंद अशा वालुकामय पट्टीवर सुएझ कालव्याच्या उत्तर टोकाशी पश्चिम किनाऱ्यावर वसले असून, ते कैरोच्या ईशान्येस रेल्वेने २३३ किमी. आहे. शहराची स्थापना १८५९ साली करण्यात आली, तर बंदर १८६९ पासून कार्यान्वित झाले. ईजिप्तचा खेदिव (व्हाइसरॉय) सैद पाशा याच्या स्मरणार्थ शहरास पोर्ट सैद नाव देण्यात आले. एकोणिसाव्या शतकात येथे जगातील सर्वांत मोठी कोळसाभांडारे होती. सुएझ कालव्यातून वाहतूक करणारी जहाजे इंधनासाठी येथे थांबतात. पोर्ट सैदच्या समोरच कालव्याच्या पूर्व किनाऱ्यावर पोर्ट फौद हे उपनगर १९२९ मध्ये वसविण्यात आले. त्याला तत्कालिन सुलतान व राजा पहिला फौद (१९१७–२२ १९२२–३६) याचे नाव देण्यात आले. १९५६ मधील ईजिप्तच्या सुएझ कालवा राष्ट्रीयीकरणानंतर पोर्ट सैदवर ब्रिटिश व फ्रेंच छत्रीधारी सैन्याने केलेल्या हल्ल्यामुळे त्याची हानी झाली. १९५९ मध्ये बंदराची सुधारणा करण्यात आली. १९६७ सालच्या ईजिप्त-इस्त्राएल युद्धानंतर सुएझ कालवा बंद पडल्याने पोर्ट सैदचे महत्त्व कमी झाले होते, तथापि ५ जून १९७५ रोजी तो पुन्हा वाहतुकीस खुला झाल्यापासून पोर्ट सैद जगातील एक गजबजलेले बंदर बनले आहे. १९६८ मध्ये पोर्ट सैद बंदराच्या दोन्ही बाजूंवर दोन लाटारोधक बांधले असून पूर्व बाजूस दीपगृह, तर पश्चिम बाजूस सुएझ कालव्याचा प्रवर्तक फर्दिनंद मारी दे लेसेप्सचा १८९९ मध्ये बांधलेला प्रचंड पुतळा आहे. पोर्ट सैद बंदरातून कापूस व मीठ यांची मोठ्या प्रमाणात निर्यात होते.
डिसूझा, आ. रे.
“