कोलोरॅडो : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी पर्वतविभागातील एक राज्य. ३७० उ. ते ४१० उ. आणि १०२० ते १०९० ३’ प. क्षेत्रफळ २,६९,९९८ चौ.किमी. लोकसंख्या २१,९५,८८७ (१९७०). याच्या दक्षिणेस ओक्लाहोमा व न्यू मेक्सिको, पश्चिमेस उटा, उत्तरेस वायोमिंग व नेब्रॅस्का आणि पूर्वेस नेब्रॅस्का व कॅनझस ही राज्ये असून डेन्व्हर हे राजधानीचे शहर आहे.
भूवर्णन : राज्याचा पश्चिम भाग डोंगराच्या रांगांनी आणि पठारांनी व्यापलेला असून पूर्व भाग सपाट व अनेक नदीखोऱ्यांचा आहे. खंडाचा कणा किंवा मुख्य पाणलोट रॉकी पर्वत हा राज्यातून उत्तरदक्षिण गेलेला असून त्याच्या पार्क, फ्रंट, सॉवॉच, कॉल व सॅन वॉन या पर्वतश्रेणी राज्यभर पसरल्या आहेत. या पर्वतमालिकेतील अनेक सुप्रसिद्ध शिखरे येथे आढळतात : मुख्य खंडभूमीवरील दुसऱ्या क्रमांकाचे (उंची ४,३९८ मी.) मौंट एलबर्ट व तिसऱ्या क्रमांकाचे (उंची ४,३९५ मी.) मौंट हार्वर्ड, यांखेरीज पांइक्स, लाँग्झ, एव्हॅन्स, ब्लँका, ला प्लॅटा, शॅव्हानो इत्यादी. येथे ४,२६७ मी. पेक्षा जास्त उंचीची एकंदर ५५ शिखरे आहेत. राज्याची तृतीयांश भूमी केंद्र शासनाच्या मालकीची असून तिच्यावर रॉकी मौंटन, ग्रेड सँड ड्यून्स, मेसा व्हर्दी व कोलोरॅडो नॅशनल मॉन्युमेंट अशी चार प्रमुख राष्ट्रीय उद्याने आहेत. त्यांच्या पश्चिमेस ३,१०० मी. पर्यंत उंचीची विस्तीर्ण पठारे असून राज्याची सरासरी उंची समुद्रसपाटीपासून २,१०८ मी. आहे. नदीखोऱ्यात रेताड गाळमाती सुपीक असून अन्यत्र जमिनीत जैव द्रव्यांपेक्षा खनिज द्रव्ये अधिक आढळतात. खनिज तेल, कथील (देशात फक्त याच राज्यात), मॉलिब्डेनम, बेरिलियम, व्हॅनेडियम, कार्बोनेट, पायराइट, फ्ल्युओरोस्पार, जस्त, शिसे, टंगस्टन आणि युरेनियम शिवाय अल्प प्रमाणात सिमेंट, शाडू, तांबे, फेलस्पार, सोने, जिप्सम, लोह, चुनखडी, अभ्रक, नैसर्गिक ज्वलनवायू, पर्लाइट, पमीस, मीठ, रेती, कंकर, चांदी व मौल्यवान दगड राज्यात सापडतात. अनेक प्रमुख नद्यांचा उगम हिमाच्छादित पर्वत प्रदेशातून होतो. उत्तरेत कोलोरॅडो व नॉर्थ प्लॅट, मध्य विभागात आर्कॅन्सॉ व साउथ प्लॅट आणि दक्षिणेस रीओ ग्रँड या येथील प्रमुख नद्या होत. पूर्ववाहिनी नद्यांना अनेक उपनद्या आहेत. पश्चिमेस कोलोरॅडोला मिळणारी गनिसन ही प्रमुख उपनदी. राज्यातील आर्कॅन्सॉवरील रॉयल गॉर्ज, गनिसनवरील ब्लॅक कॅन्यन तसेच यांपा, गोर या कॅन्यन भव्य आहेत. राज्यात पाटबंधाऱ्यांसाठी नद्या अडवून झालेले कित्येक सामान्य जलाशय आहेत. पर्वतशिखरे, पठारे, खोरी व मैदाने यांच्या हवामानात स्थानपरत्वे फरक आढळतो. सामान्यतः हवा कोरडी व स्वच्छ, पाऊस तुरळक व एकंदर कमी पडतो. तपमान किमान –०·५० से. कमाल २३० से., सरासरी १०·८० से. असून वार्षिक पर्जन्य सरासरी ३३·६ सेंमी. आहे. राज्याचा तृतीयांश प्रदेश वनाच्छादित असून त्यात पाइन, सीडार, स्प्रूस, ओक व फर या जातींचे वृक्ष आढळतात. पश्चिमेच्या डोंगर उतारांवर व नदीखोऱ्यांतून गवताळ कुरणे आहेत. बाकी प्रदेशाच्या उंचीप्रमाणे समशीतोष्ण कटिबंधातील अन्य प्रकारची झाडेझुडपे आढळतात. राज्यात हरिण, एल्क, काळे अस्वल, रानमेंढी, ग्राउज, बदक, रानटर्की इ. पशुपक्षी असून नद्यांतून ट्राउट, ग्रेलिंग इ. जातीचे मासे आहेत.
इतिहास व राज्यव्यवस्था : राज्याच्या नैर्ऋत्य विभागात वीस हजार वर्षांपूर्वीच्या मानवी वस्तींचे अवशेष सापडले आहेत. पर्वतीय यूट आणि मैदानी शायएन व आरापाहो या दोन भिन्न भाषा वंशीय आदिवासी रेड इंडियनांचे पूर्वज इ.स. च्या पहिल्या शतकात या राज्यात असल्याचे पुरावे मिळतात. पहिला गौरवर्णीय या भागात आला, तो मेक्सिकोकडून सोन्याच्या शोधार्थ १५४० मध्ये आलेला स्पॅनिअर्द कोरोनादो. त्याच्यामागून अनेकजण येथे सोन्यासाठी व्यर्थ शोध करून गेले. १७९९ साली मेसानो ह्या फ्रेंच माणसाने या मुलखात केसाळ चामड्यांच्या व्यापाऱ्यांची वर्दळ चालू केली. १८०३ मध्ये लुइझिॲना खरेदीत अमेरिकेला या प्रदेशाचा काही भाग मिळाला. १८०६ साली पाइक नावाच्या अमेरिकन भूसंशोधकाने आता त्याचेच नाव असलेल्या शिखरावर चढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यामागून लॉग, फ्रेमाँट, गनिसन वगैरे इतर साहसी प्रवासीही या बाजूस येऊन गेले. प्रसिद्ध वाटाड्या किट कार्सन आणि बेंट बंधू यांनीही हा भाग वसाहतींसाठी खुला करण्यास हातभार लावला. राज्याचा आजचा प्रदेश अमेरिकेकडे हळूहळू आला. १८१९ मध्ये स्पॅनिश मुलखाशी सरहद्द ठरविण्यात आली, १८४५ मध्ये ती पश्चिमेकडे सरकविण्यात आली, १८४८ च्या मेक्सिकन युद्धानंतर रीओ ग्रँड नदीच्या पश्चिमेकडची भूमी अमेरिकेला मिळाली आणि १८५० साली टेक्सस आणि रीओ ग्रँडच्या दरम्यानची पट्टी प्राप्त झाली. १८५८ मध्ये या भागात सोने सापडते ही बातमी देशाच्या पूर्व भागात फैलावली आणि लवकरच ‘पाइक्स पीक’कडे सुवर्णार्थी लोकांचा लोंढा लोटला. त्यांपैकी जरी पुष्कळसे निराश होऊन परत गेले, तरी बाकीचे वसाहती करून इकडेच राहिले शहरे व वस्त्या तयार झाल्या, १८५९ मध्ये डेन्व्हर शहर स्थापन झाले आणि १८६१ मध्ये केंद्र विधिमंडळाच्या कायद्याने कॅनझस, नेब्रॅस्का, उटा व न्यू मेक्सिको या प्रदेशांच्या भागातून कोलोरॅडो हा वेगळा प्रदेश निर्माण केला. प्रथम त्यात येऊन स्थायिक होणाऱ्यांची संख्या बेताचीच होती तशात यादवी युद्धासाठी बरेचशे सैनिक इकडून गेल्यामुळे रेड इंडियनांचा उपद्रवही चालू होता. पण हळूहळू यूट जमातीखेरीज इतर इंडियनांचा पाडाव झाला. १८६७ मध्ये राष्ट्राध्यक्ष अँड्रू जॅक्सनने कोलोरॅडोला संघराष्ट्रात प्रवेश नाकारला. पण नऊ वर्षानंतर प्रवेश मिळून राज्यदर्जा प्राप्त झाला. दरम्यान विकास चालू होता लोहमार्ग आले, कृषिक्षेत्रात विस्तार झाला, नव्या खाणी चालू झाल्या. राज्याची सुरुवातीची वर्षे कटकटीची गेली. प्रगतीबरोबर सामाजिक असंतोषही वाढत होता. १८९३ मध्ये स्त्रियांना मताधिकार मिळाले पण बेबंदशाही, संप, टाळेबंदी, गुरांचे कळपवाले व मेंढपाळ यांच्यातील संघर्ष हे प्रकार चालूच होते. विसावे शतक उजाडल्यावर राज्याला काहीसे स्थैर्य आले. पहिल्या महायुद्धात चांदीला मागणी येऊन वैभव वाढले. त्या युद्धात राज्यातून ४३,१८० लोक दाखल झाले होते. नंतरच्या वर्षात मंदीची लाट आली तरी केंद्र शासनाच्या खर्चाने मोठमोठे हमरस्ते झाले, राष्ट्रीय उद्याने आखण्यात आली. दुसऱ्या महायुद्धात १,३२,२८८ लोक राज्याने पुरविले. खाणी, शेती आणि कारखानदारी या धंद्यांना पुन्हा तेजी आली. आता कोलोरॅडो राज्य कार्यप्रवण व विकसनशील आहे. युरेनियमचे जंगी साठे देशाच्या संरक्षणव्यवस्थेला उपयोगी पडत आहेत. कोलोरॅडोची राज्यव्यवस्था बव्हंशी अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील इतर राज्यांसारखीच आहे.
आर्थिक व सामाजिक स्थिती : कोरडवाहू शेतीच्या तंत्राने काढण्यात येणारे रब्बी गव्हाचे पीक हे राज्यातील सर्वांत महत्त्वाचे कृषिउत्पादन होय. ते पूर्वभागातील मैदानी प्रदेशात निघते. पाटाच्या पाण्यावरची पिके बीट, बटाटा, आल्फाल्फा गवत, बार्ली, मका, कांदे, पावटे, भाजीपाला आणि कलिंगडे ही होत. चराईवर मांसासाठी पोसलेली गुरे, डुकरे, टर्की कोंबडी व अंडी यांचेही उत्पादन भरपूर होते. बीट, पावटे यांच्या उत्पादनात कोलोरॅडो देशात दुसरा व कांदा उत्पादनात पाचवा आहे. ९% लोक शेती, वनोद्योग व मच्छीमारीत ७% बांधकामावर, २% खाणकामात बाकीचे व्यापार, उद्योग, शासकीय व इतर नोकऱ्यांत आहत. कारखानदारी मुख्यत: अन्नपदार्थांवर प्रक्रिया, दगड, शाडू व काचमाल, रसायने आणि वीजयंत्रे या धंद्यांची असून खाणीतून मुख्य उत्पादन खनिज तेल, मॉलिब्डेनम, कोळसा व युरेनियम यांचे होते. पर्यटनव्यवस्था हा राज्यातील एक महत्त्वाचा व्यवसाय. दरसाल ५० लाखांवर हौशी प्रवासी कोलोरॅडोला भेट देतात. राज्यात लोहमार्ग ६,०५८ किमी. व रस्ते १,२५,७४४ किमी. (पैकी ५५% पक्के) असून जगातील सर्वांत उंचावरून मौंट एव्हॅन्सवर आणि पाइक्स शिखरापर्यंत जाणारे पक्के रस्ते याच राज्यात आहेत. येथे नुकताच जगातील सर्वोच्च आयझन हौअर बोगदा बांधण्यात आला आहे. राज्यात १९७० साली १७७ विमानतळ, ९० नभोवाणी व १२ दूरचित्रवाणी–केंद्रे, १२,९२,१०० दूरध्वनियंत्रे, २६ दैनिके व १३४ इतर नियतकालिके होती. ७४% शहरी लोकवस्ती आहे. राज्यात ३ विद्यापीठे, २५ महाविद्यालये, खाणविद्येची प्रशाला, वायुसेनेची राष्ट्रीय प्रबोधिनी, अनेक ग्रंथालये, वस्तुसंगहालये व कलावीथी आहेत. धर्म, पंथ, रूढी, समाजजीवन, भाषा, कला व क्रीडा या बाबतींत अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील इतर राज्यांशी कोलोरॅडोचे साधारण साधर्म्य आहे. राष्ट्रीय व राज्य-उद्यानांतून इतिहासपूर्वकालीन दरीवासी संस्कृतीचे अवशेष, भव्य पर्वतप्रदेश, अतिप्राचीन प्राण्यांच्या शिलास्थी, वाळूचे सरकते डोंगर, वन्य पशूंच्या मुक्त संचारासाठी विस्तीर्ण पठारे आणि निबिड वने अशा अनेक सृष्टिचमत्कारांसाठी आणि निसर्गदृश्यांसाठी कोलोरॅडो विख्यात आहे.
ओक, शा. नि.