पेण : कुलाबा जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ११,७५४ (१९७१). हे भोगावती नदीच्या उजव्या काठावर, खोपोली रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेस सु. ५० किमी. मुबंई-गोवा या हमरस्त्यावर आहे. बोर घाटातून जाणाऱ्या कोकणमार्गांने हे दक्षिण भागाशी व धरमतर खाडीतून जलमार्गांने मुंबईशी जोडले आहे. हे शहर मुख्यत: मातीच्या व प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती-विशेषत: गणेशमूर्ती-तसेच पोहे, पापड इ. उद्योगांसाठी प्रसिद्ध असून शहरात मूर्ती बनविण्याचे अनेक कारखाने आहेत. यांशिवाय लाकडी खेळणी, लोखंडी नळ व टाक्या, चाकू-कात्र्या, विटा, भात सडणे इ. उद्योगही येथे चालतात. शहरातील रामेश्वर मंदिर आणि दातार वाड्यासारख्या इतिहासकालीन वास्तू उल्लेखनीय आहेत. येथे प्राथमिक, माध्यमिक व तांत्रिक शिक्षणाच्या सोयी असून नगरपालिका (स्थापना १८६५), नगर सर्वेक्षण, मीठ तपासणी, वनविभाग इत्यादींची कार्यालये आहेत. शहरातून कुलाबा समाचार हे मराठी साप्ताहिक प्रसिद्ध होते.

सावंत, प्र. रा. गाडे, ना. स.