जीनान : चिनान. चीनच्या शँटुंग प्रांताची राजधानी. लोकसंख्या १५,००,००० (१९७० अंदाज). हे चीनच्या ताइशान या पवित्र डोंगराजवळ ह्‌वांग होच्या दक्षिणेस आहे. हे इ.स.पू. पासून विकसित शहर असून मिंग राजवटीत येथे राजधानी आली. जर्मनांनी चिंगडाऊपासून बांधलेला लोहमार्ग व तिन्‍त्‍सिन-पूको लोहमार्गावरील प्रस्थानक (१९१२) तसेच येथील छोट्या नौकांनी नद्यांतून होणारी वाहतूक यांमुळे याचे महत्त्व वाढले. शस्त्रास्त्रसाठ्याच्या सैनिकी महत्त्वामुळे १९३७–४५ पर्यंत हे जपान्यांनी घेतले होते. येथे रेशमी व सुती कापडगिरण्या आणि लोखंड व पोलाद, सोडा-ॲश, मालमोटारी, रसायने, यंत्रे इत्यादींचे कारखाने आहेत. हे शँटुंग सांस्कृतीक केंद्र असून येथे विद्यापीठ व शेतकी, वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. याचा परिसरही ऐतिहासिक अवशेषांनी भरलेला व निसर्गसौंदर्याने नटलेला आहे.

ओक, द. ह.