शरावती : भारतातील कर्नाटक राज्याच्या शिमोगा व उत्तर कानडा जिल्ह्यांतून वाहत जाऊन पश्चिमेस अरबी समुद्राला मिळणारी नदी. लांबी सुमारे ९५ किमी. बाणगंगा या नावानेही ती ओळखली जाते. पश्चिम घाटात, शिमोगा जिल्ह्याच्या तीर्थहळ्ळी तालुक्यातील ‘अंबुतीर्थ’ येथे शरावती उगम पावते. ‘शरावती’ म्हणजे बाणापासून जन्मलेली. श्रीरामचंद्रांच्या शरसंधानातून हिचा उगम झाला, अशी आख्यायिका सांगितली जाते.

उगमानंतर ही नदी शिमोगा जिल्ह्यातून सामान्यपणे वायव्य दिशेने वाहत जाते. या जिल्ह्यातील तिची लांबी सु. ३२ किमी. असून या भागात तिला पट्टगुप्पे गावाजवळ उजवीकडून हरिद्रवती, तर बारंगीजवळ डावीकडून येन्ने-होळ या प्रमुख उपनद्या मिळतात. या जिल्ह्यात म. गांधी जलविद्युत प्रकल्प असून त्याच्या पाणीपुरवठ्यासाठी लिंगनामक्की गावाजवळ शरावती नदीवर २,७५१.१० मी. लांबीचे धरण बांधण्यात आले आहे. याशिवाय जादा पाणी पुरवठ्यासाठी करगल गावाजवळ एक बंधारा (करगल अँनिकट) बांधण्यात आला आहे. वरील विद्युतगृहातून वर्षाला १,८९,२१,६०० एमव्हिए. वीजनिर्मिती केली जाते. या जिल्ह्याच्या वायव्य सरहद्दीवर ही नदी पश्चिमेस वळते. याच ठिकाणी जोग गावाजवळ तिच्यावरील प्रसिद्ध ⇨ गिरसप्पा धबधबा आहे. तेथे नदीपात्र सु. २२७ मी. रुंद असून चार स्त्रोतांनी धबधब्याचे पाणी खाली कोसळते. राजा, रोअरर, लेडी किंवा राणी व रॉकेट या नावांनी हे प्रपात प्रसिद्ध आहेत. नदीखो-याचा हा प्रदेश दाट अरण्याचा आहे. शरावती नदीमुळे उत्तर कानडा व शिमोगा या जिल्ह्यांदरम्यानची सु. १३ किमी. लांबीची सरहद्द बनली आहे. नदीपात्रात नीस व सुभाजा प्रकारचे खडक आढळतात. उत्तर कानडा जिल्ह्यातील होनावर येथे ही नदी अरबी समुद्राला मिळते. शरावती नदीखोरे प्रकल्पातील धरणे, पाण्याचे बोगदे, वीजनिर्मिती केंद्रे तसेच प्रपात ही पर्यटकांची आकर्षणस्थळे आहेत.

  चौंड, मा. ल.