रिख्‌थोफेन, फर्दिनँद बारोन फॉन : (५ मे १८३३−६ ऑक्टोबर १९०५). एक प्रसिद्ध जर्मन भूगोलज्ञ, भूवैज्ञानिक आणि प्रवासी. जन्म प. जर्मनीतील कार्लझ्रूए येथे. भौगोलिक पद्धतीशास्त्राच्या तसेच भूविज्ञानातील भू-आकृतिविज्ञान या शाखेच्या विकासातही त्याचे महत्त्वपूर्ण कार्य आहे. १८६०−६२ मधील पूर्व आशियातील प्रशियन सफरीमध्ये रिख्‌थोफेन सहभागी झाला होता. या सफरीत त्याने श्रीलंका (सिलोन), जपान, तैवान, सेलेबीझ, जावा, फिलिपीन्स इ. प्रदेशांचा प्रवास केला आणि मलाया द्वीपकल्प ओलांडून थायलंडमधील बँकॉक येथून ब्रह्मदेशातील मोलमाइनपर्यंत त्याने प्रवास केला. पुढे १८६२−६८ या काळात रिख्‌थोफेन अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील कॅलिफोर्नियामध्ये गेला. तेथे त्याने भूवैज्ञानिक दृष्ट्या संशोधन करून सोन्याच्या खाणीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर १८६८−७२ या काळात त्याने चीन आणि जपानमध्ये प्रवास करून चीनच्या जवळजवळ सर्व भागांचा विशेष अभ्यास केला. या अभ्यासात मिळालेली भौगोलिक, भूशास्त्रीय, आर्थिक व मानववंशशास्त्रीय माहिती त्याने तीन खंडात आणि एका नकाशा संग्रहात एकत्रित केली (१८७७−८५). हे तीन खंड आणि एका नकाशा संग्रहात एकत्रित केली (१८७७−८५). हे तीन खंड त्याच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाले (१९११-१२). चीनच्या अभ्यासाविषयीचे हे लेखन इंग्रजी भाषांतर-चायना, द रिझल्टस ऑफ माय ट्रॅव्हल अँड द स्टडीज बेस्ड देअरऑन या नावाने प्रसिद्ध आहे. भूगोल पद्धतीशास्त्राविषयी त्याने महत्त्वपूर्ण लेखन केलेले आहे. त्या संदर्भातील टास्क अँड मेथडस ऑफ प्रेझेंटे-ड-जिऑग्रफी (१८३३), इंपल्सेस अँड डिरेक्शन्स ऑफ जिऑग्रफी इन् द नाइंटींथ सेंचरी (१९०३) हे लेखन महत्त्वाचे आहे. रिख्‌थोफेनने १८७५−८३, १८८३−८६ व १८८६ पासून अखेरपर्यंत अनुक्रमे बॉन, लाइपसिक व बर्लिन या विद्यापीठांत प्राध्यापक म्हणून काम केले. बर्लिन इन्स्टिट्यूट ऑफ ओशनॉलॉजी या संस्थेचा तो संस्थापक होता (१९०२−०५). बर्लिन येथे त्याचे निधन झाले.

चौधरी, वसंत