मिशकोल्त्स : हंगेरीतील दुसऱ्या क्रमांकाचे शहर व बॉर्शॉद-अबउज-झेम्प्लेन काउंटीचे मुख्यालय. लोकसंख्या २,११,२०० (१९८३). हे बूडापेस्टच्या ईशान्येस सु. १४५ किमी., बूक टेकड्यांच्या पायथ्याशी शॉयो नदीच्या झिन्व्हा उपनदीकाठी वसलेले आहे. देशातील एक प्रमुख औद्योगिक व व्यापारी शहर म्हणून यास महत्त्व आहे. रस्ते, लोहमार्ग यांनी हे बूडापेस्टशी व देशातील इतर प्रमुख शहरांशी जोडलेले आहे.

प्रागैतिहासिक काळापासून येथील चुनखडकांच्या टेकड्यांतील गुहांतून मानवी वस्ती होती. येथे जर्‌मॅनिक, आव्हार आदी लोकांचे वास्तव्य होते. दहाव्या शतकात येथे लोहखनिजाचे उत्पादन सुरू झाल्याचे दिसते. तेराव्या व चौदाव्या शतकांत एक व्यापारी केंद्र म्हणून, विशेषतः मद्याच्या व्यापारासाठी, हे प्रसिद्ध होते. पंधराव्या शतकात यास मुक्त शहराचा दर्जा होता. शहरास वारंवार लागलेल्या आगी, तसेच महापूर, मंगोलाची व तुर्कांची अनुक्रमे तेराव्या व सोळाव्या-सतराव्या शतकांतील आक्रमणे, हंगेरियन स्वातंत्र्ययुद्ध (सतरा-अठरावे शतक) यांसारख्या अनेक अडचणीवर मात करून एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून या शहराची उत्तरोत्तर भरभराट होत गेली.

बॉर्शॉद- मिशकोल्स या देशातील प्रमुख औद्योगिक पट्‌ट्यात दिओझद्यर, कॉझींत्सबॉर्त्सीकॉ इ. लहानमोठ्या शहरांचा अंतर्भाव असून, मिशकोल्त्स हे या पट्‌ट्यातील प्रमुख केंद्र आहे. आता दिओझद्यरचा समावेश मिशकोल्समध्ये झालेला आहे. लोह, कोळसा, चुनखडक यांच्या खाणी व दळणवळणाच्या सुविधा यांमुळे दुसऱ्या महायुद्धोत्तर काळात येथील उद्योगांचे मोठ्या प्रमाणात आधुनिकीकरण व विस्तार झालेला आहे. येथे लोह-पोलाद, चुना व सिमेंट, कागद, मोटारी, काच, कापड, अन्नप्रक्रिया, मद्यनिर्मिती इ. उद्योग विकसित झालेले आहेत. कृषिपदार्थ, यंत्रसामग्री इत्यादींचा व्यापारही येथे चालतो.

देशातील एक प्रगत आर्थिक व औद्योगिक दृष्ट्या संपन्न असे हे शहर आहे. येथे विधी व इतर शिक्षणविषयक सोयी असून अवजड यंत्रसामग्रीविषयक तांत्रिक शिक्षणाचे विद्यापीठ (१९४९) आहे. येथे सेंट स्टीफन्स गॉथिक चर्च (तेरावे शतक), नॅशनल थिएटर, ॲव्हास रिफॉर्म्ड चर्च (पंधरावे शतक), दिओझद्यर किल्ला (तेरावे शतक) ऑटो हेरमान संग्रहालय इ. पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. शहराच्या आसमंतातील बूक टेकड्यांत पर्यटकांना आकर्षित करणारी अनेक हॉटेल असून लिलॉफ्यूरेड येथे देशातील एक प्रमुख हॉटेल आहे.

गाडे, ना. स.