ग्वांगटुंग : दक्षिण चीनचा एक प्रांत. प्राचीन यूएह. क्षेत्रफळ २,११,५०० चौ. किमी. लोकसंख्या ४,२८,००,००० (१९७० अंदाज). याच्या दक्षिणेस व पूर्वेस चिनी समुद्र, पश्चिमेस ग्वांगसी आणि उत्तरेस व ईशान्येस जिआंगसू प्रांत असून हैनान बेटही यातच येते. कँटन ही राजधानी आहे. डोंगराळ किनाऱ्यामुळे कँटन (क्वांगजो) व स्वाटौ ही दोनच सोयीस्कर बंदरे आहेत. हान, सी, टुंग, बाय इ. नद्या काही कालवे व कँटन-पीकिंग लोहमार्ग यांमुळे वाहतूक सोयीची होते. उष्ण कटिबंधीय व १५० सेंमी. पावसाच्या हवामानामुळे भात (दोन पिके), ऊस, तंबाखू, केळी, वाटाणा, लिंबे, अननस इत्यादींचे उत्पादन होते. इमारती लाकूड व दालचिनी यांचेही चांगले उत्पन्न आहे. तुतींच्या पानांवर रेशमाचे किडे पोसतात. चीनचे एक तृतीयांश रेशीम येथे होते. रेशमी कापड हा स्वाटौचा खास व्यवसाय आहे. कोळसा, टंग्स्टन, जस्त, मँगॅनीज ही येथे थोडीशी सापडतात. शिहवानला केओलीनपासून चिनी मातीची भांडी व खेळणी होतात.

इ.स.पू. २११ मध्ये येथे चिनी सत्ता आली. कँटनमार्गे यूरोपीय राष्ट्रांशी संबंध, सन-यत्-सेनच्या क्वोमितांग पक्षाची स्थापना व चँग-कै-शेकचा देशाच्या एकीकरणाचा प्रारंभ, यांमुळे चीनच्या इतिहासात ग्वांगटुंगला विशेष महत्त्व आहे.

ओक, द. ह.