सूदान : पूर्व मध्य आफ्रिकेतील एक प्रजासत्ताक देश. हा आकारमानाने आफ्रिका खंडातील तिसऱ्या क्रमांकाचा व जगातील सोळाव्या क्रमांकाचा मोठा देश असून याचा विस्तार ८ ते २२ उ. अक्षांश व २१ ते ३९ पू. रेखांश यांदरम्यान आहे. हा देश उत्तरेस ईजिप्त, वायव्येस लिबिया, पश्चिमेस चॅड, नैर्ऋत्येस मध्य आफ्रिका प्रजासत्ताक, दक्षिणेस साउथ सूदान, पूर्वेस इथिओपिया, एरिट्रीया, ईशान्येस तांबडा समुद्र यांनी वेढलेला आहे. क्षेत्रफळ १८,८६,०६८ चौ. किमी., लोकसंख्या ४,३१,९२,००० (२०११ अंदाज). खार्टूम ६,३९,५९८ (२००९ अंदाज) हे देशाच्या राजधानीचे ठिकाण असून राजकीय, व्यापारी व सांस्कृतिक केंद्र आहे.

भूवर्णन : नाईल नदीमुळे देशाचे पूर्व व पश्चिम असे दोन भाग झाले आहेत. सूदान हा एक विस्तीर्ण पठारी प्रदेश असून याची सस.पासून सरासरी उंची ४६० मी. आहे. देशाचा इथिओपियाच्या सरहद्दीवरील भाग व तांबड्या समुद्रालगतचा भाग पर्वतमय आहे. नाईल नदीच्या पश्चिमेस सु. ३०५–६१० मी. उंचीचे कोर्दोफॅन पठार आहे. पश्चिम भागातडारफूर प्रांतात सु. १,५२० ते ३,०५० मी. उंचीचा जेबेल मार्‌रा हा उच्चभूमी प्रदेश आहे. डेरिबा कॅल्डेरिया हे ३,०४२ मी. उंचीचे सूदानमधील सर्वोच्च शिखर याच भागात आहे. कोर्दोफॅन पठार व मार्‌रा पर्वतभाग यांमध्ये नुबा मौंटन आहे. या पर्वताच्या उत्तरेस व मार्‌राच्या आग्नेयेस आणि पूर्वेस अनेक वाळूच्या टेकड्या आढळतात. वायव्य भागात लिबियन वाळवंटाचा काही भाग येतो. तसेच सु. १,४५० मी. उंचीचे एर्दी पठार याच भागात आहे. नाईल नदीखोऱ्याच्या पूर्वेस न्यूबियन वाळवंट असून तांबड्या समुद्रकिनारी भागात डोंगररांगा आहेत. सूदानच्या या डोंगराळ भागात जेबेल ओडा हे २,२५९ मी. उंचीचे शिखर आहे. ⇨ नाईल, रिबेर, आतबारा इ. देशातील प्रमुख नद्या आहेत.

हवामान : सूदानचे हवामान उष्णकटिबंधीय खंडीय प्रकारचे आहे. वर्षभर तापमान उच्च असून ते मे व जूनमध्ये जास्त असते. खार्टूमलगतच्या भागात सरासरी तापमान जानेवारीत २३० से. तर जूनच्या सुरुवातीस ३४० से. असते आणि उन्हाळ्यात ते ४३० से. पेक्षा जास्त असते. ईजिप्त सरहद्दीनजीक जानेवारीत सरासरी तापमान १६० से. तर जून, जुलै, ऑगस्टमध्ये ३३० से. पर्यंत जाते. येथील तापमान कित्येकदा ४३० से. किंवा ४९० से. पर्यंत वाढते. तांबड्या समुद्रावरुन येणाऱ्या वाऱ्यांचा परिणाम त्या भागातील हवामानावर होतो. पोर्ट सूदानमध्ये सरासरी तापमान फेब्रुवारीत २३० से. तर ऑगस्टमध्ये ३५० से. असते. देशात पावसाचे प्रमाण फारच कमी आहे. खार्टूमलगतच्या भागात पाऊस १५ मिमी. पर्यंत असतो. ईजिप्त सरहद्दीलगतच्या वाळवंटी भागात पाऊस पडत नाही. तांबड्या समुद्रकिनारी भागात ऑक्टोबर ते जानेवारी व जुलै ते ऑगस्ट दरम्यान सु. १०० मिमी. पाऊस पडतो. वाळवंटी प्रदेशात धुळीची वादळे होतात, ती ‘हबूब’ नावाने ओळखली जातात.

वनस्पती व प्राणी : देशातील एकूण भूक्षेत्रापैकी २०% भागात जंगले आहेत. नाईल नदीखोऱ्यात व तांबड्या समुद्रकिनारी भागातील डोंगराळ प्रदेशात बाभूळ व अन्य काटेरी वनस्पती आढळतात. येथे हरिण, उंट, माकडे, तांबड्या समुद्रकिनारी भागात आयबेक्स (रानबकऱ्या) आहेत. यूरोपातील हिवाळ्याच्या कालावधीत यूरोप व दक्षिण आफ्रिकेतील पक्षी नाईल नदीकाठी येतात.

इतिहास व राज्यव्यवस्था : पूर्वी सूदानचा प्रदेश ‘कुश’ म्हणून ओळखला जात होता. इ. स. पू. १५०० ते १२०० दरम्यान हा प्रदेश ईजिप्तच्या वर्चस्वाखाली होता. कुश हे स्वतंत्र राज्य इ. स. पू. ७५० ते इ. स. ३५० पर्यंत होते. याची राजधानी प्रारंभी नॅपला होती. ती इ. स. ३०० मध्ये मेरोवे येथे हलविण्यात आली होती. कुश साम्राज्याच्या अस्तानंतर या भागात अनेक राज्ये उदयास आली. त्यांपैकी नोबॅटिआ (सध्या ईजिप्तमध्ये ), मुकूरिआ आणि मेरोवे ही राज्ये प्रमुख होती. बायझंटिन साम्राज्यातून धर्मप्रसारार्थ पाठविलेल्या थिओडोरने नोबॅटिआ येथे येऊन इ. स. सु. ५४० मध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रचार केला.न्यूबियन राजाने ख्रिस्ती धर्म स्वीकारला. ईजिप्तच्या अरब कमांडरने सैनिकी कारवायांच्या अपयशानंतर न्यूबियनांबरोबर शांतता करार केला. त्यामुळे येथील लोकांत सामंजस्य निर्माण झाले. आंतरजातीय विवाह, अरब व्यापाऱ्यांशी संबंध, अरबस्तानातील सूफींचा उदारपणा यांमुळे इस्लामचा प्रसार होण्यास मदत झाली. इ. स. १०९३ मध्ये न्यूबियन मुस्लिम राजकुमार मुकूरिआ येथील राजा झाला व त्याचा अंमल प्रस्थापित झाला. सोळाव्या शतकात फुंज लोकांनी अमारा डंकस याच्या नेतृत्वाखाली येथे सनार सल्तनत स्थापन केली. त्याची राजधानी सना येथे होती.सतराव्या शतकात हे साम्राज्य वैभवाच्या शिखरावर होते. ईजिप्तचा व्हॉइसराय मुहम्मद अली याने सूदान जिंकले. पुढे ६५ वर्षे ईजिप्तचा अंमल सूदानवर होता. ईजिप्तच्या राजांनी येथे जलसिंचन व कापूस उत्पादन वाढीसाठी विशेष प्रयत्न केले. तसेच इ. स. १८२५–४३ मध्ये अली खुर्शिद आगा व अहमद पाशा अबू अधन या दोन प्रशासकांच्या काळात व्यापाराची भरभराट झाली परंतु तद्नंतरच्या २० वर्षांत यामध्ये लक्षणीय अशी सुधारणा किंवा विकास झाला नाही. इस्माईल पाशाने इ. स. १८६३ मध्ये ईजिप्तचा ताबा घेतला. त्याने सर सॅम्युएल बेकर या इंग्रजाच्या नेतृत्वाखाली मध्य आफ्रिकेतील विषुववृत्तीय भागात ईजिप्तची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी व अप्पर नाईलच्या भागातील गुलामांचा व्यापार कमी करण्यासाठी मोहीम आखली. इ. स. १८७३ मध्ये बेकरने येथे ईजिप्तचा अंमल प्रस्थापित करुन गुलामांचा व्यापारही कमी केला. बेकरचा वारसदार जनरल चार्ल्स जॉर्ज गोडॉनने बेकरचे धोरण पुढे चालू ठेवले परंतु तो ईजिप्तचे वर्चस्व राखण्यात अपयशी ठरला. इ. स. १८७० मध्ये गोडॉन सूदानचा गर्व्हनर जनरल म्हणून नियुक्त झाला. त्याने गुलामांचा व्यापार कमी करण्याचे धोरण अवलंबिले. याच काळात सूदानमध्ये ख्रिस्ती धर्मियांनी इस्लामच्या तत्त्वांना धक्का देणारे धर्मयुद्घ सुरु केले असल्याची येथील जनतेत भावना निर्माण झाली होती. परिणामत: १८७९ मध्ये गोडॉनने पदाचा राजीनामा दिला. दरम्यान ईजिप्तच्या प्रशासनाविरुद्घ जनतेत विद्रोह निर्माण झाला होता. परिणामी जनता बंड करु लागली. या बंडाचे नेतृत्व मुहम्मद अहमद इब्न अब्द अल्लाह याने केले. त्याने इ. स. १८८१ मध्ये स्वतःला मसिहा म्हणून जाहीर केले. इस्लामची पुनर्स्थापना करणे हे त्याचे ध्येय होते. तुर्की-ईजिप्शियन सैन्यावर त्याने वारंवार हल्ले करुन २६ जानेवारी १८८५ रोजी खार्टूममचा ताबा घेतला व गोडॉनचा वध केला. पाच महिन्यांनी अल्लाहच्या मृत्यूनंतर खलीफा अब्द अल्लाह याने या प्रदेशाचा ताबा घेतला. संपूर्ण मुस्लिम जगतात इस्लामची स्थापना करणे हे त्याचे स्वप्न होते. इ. स. १८९८ मध्ये अँग्लो-ईजिप्शियन सैन्याने जनरल किचनर याच्या नेतृत्वाखाली सूदान पुन्हा जिंकले. याप्रमाणे सूदान अँग्लो-ईजिप्त यांच्या अंमलाखाली आला. ब्रिटिशांनी पाश्चिमात्य शिक्षण, प्रशासन, लोहमार्ग, रस्ते, वैद्यकीय सेवा, जलवाहतूक इ. विकास योजना राबविल्या. मात्र काही निवडक लोकांनी प्रशासनात सहभाग देण्याविषयी मागणी केली. त्यामुळे १९४४ मध्ये सल्लागार परिषद स्थापन करण्यात आली व १९४८ मध्ये विधानसभा व कार्यकारी परिषदेची स्थापना झाली. इ. स. १९५३ च्या अँग्लो-ईजिप्शियन करारान्वये सूदानला ईजिप्तमध्ये समाविष्ट व्हावे की स्वातंत्र्य हवे याबद्दल मतदानाचा हक्क मिळाला. सूदानी संसदेने सूदानला संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली. तद्नंतर १ जानेवारी १९५६ रोजी सूदान स्वतंत्र देश झाला.


स्वातंत्र्यानंतर दोन वर्षे संसदीय शासनप्रणाली अस्तित्वात होती. जन. इब्राहिम अबूद याने सरकारमधील भ्रष्टाचार, अकार्यक्षमता या बाबी नमूद करुन १७ नोव्हेंबर १९५८ रोजी सत्ता हस्तगत केली. सैनिकी प्रशासनाबद्दल लोकांची आस्था फार काळ टिकू शकली नाही. अरेबियन-इस्लामीकरण याविरुद्घ दक्षिणेकडील लोकांनी बंड केले.लष्करी प्रशासनाने सैनिकी कारवायांद्वारे ते शमविण्याचा प्रयत्न केला. पुढील काही काळात उत्तरेकडील बुद्घिजीवी वर्ग, श्रमिक संघ, सरकारी कर्मचारी यांनी सैनिकी प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली. जनतेतील असंतोषाच्या परिणामी जन. अबूदने १९६४ मध्ये राजीनामा दिला. तद्नंतर तरुण सैनिकी अधिकाऱ्यांनी कर्नल गफार अल् नुमेरी याच्या नेतृत्वाखाली सत्ता हस्तगत केली. स्वातंत्र्योत्तर काळात उत्तर व दक्षिण सूदानमध्ये राजकीय, धार्मिक, वांशिक मुद्यांवरुन १९५५– ७२ मध्ये यादवी झाली. उत्तरेत मुस्लिमांचे तर दक्षिणेत ख्रिश्चन धर्मियांचे प्राबल्य होते. नुमेरीच्या कार्यकाळात या यादवीत समझोता होऊन दक्षिणसूदानला स्वायत्तता देण्याचे मान्य करण्यात आले व दक्षिण सूदान हा स्वायत्त प्रदेश झाला (१९७२). अल् नुमेरी १९८५ पर्यंत सत्तेवर राहिला. त्याने आपल्या सत्ताकाळात शरियत कायदा लागू केला. त्यासाठी खास न्यायालये स्थापिली. याच काळात दक्षिणेत (साउथ सूदान) ३ मे १९८३ मध्ये यादवी सुरु झाली होती. १९८५ मध्ये जनरल रहमानने देशाची सत्ता काबीज केली. १९८६ मध्ये निवडणूक होऊन सादिक अल् मेहदी याच्या नेतृत्वाखाली ३ वर्षे शासन होते. १९८९ मध्ये कर्नल ओमर अल् बशिर यांनी देशाची सूत्रे हाती घेतली, स्वतःला अध्यक्ष घोषित केले. इस्लामी कायदा लागू केला. विरोधी पक्षांवर बंदी घातली. १९९३ मध्ये अल् बशिर राष्ट्राध्यक्ष असले, तरी महत्त्वाची राजकीय सूत्रे नॅशनल इस्लामिक फ्रंटचे नेते हसन अल् तुरबी यांच्याकडे होती. १९९६ मध्ये निवडणुका घेण्यात आल्या. अल् बशिर हे राष्ट्रप्रमुख म्हणून निवडून आले. १९९८ मध्ये अमेरिकेने सूदानला बहिष्कृत राष्ट्र मानून सूदान रासायनिक शस्त्रे बनवीत असल्याचे कारण पुढे करुन, त्याच वर्षी खार्टूम येथील औषधनिर्मिती कारखाना क्षेपणास्त्रांद्वारे नष्ट केला. याच कालावधीत सूदानी संसदेचे अध्यक्ष तुरबी यांनी राष्ट्राध्यक्षांचे अधिकार कमी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तुरबी व बशिर यांच्यात सत्तासंघर्ष सुरु झाला. बशिर यांनी १९९९ मध्ये आणीबाणी जाहीर केली. संसद बरखास्त केली. सन २००० मध्ये निवडणुका घेण्यात आल्या. अल् बशिर हे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले मात्र प्रमुख विरोधी पक्षांनी या निवडणुकीवर बहिष्कार घातला होता, तसेच या निवडणुकीचा निर्णयही अमान्य केला होता. २००२ मध्ये शासन व सूदान पिपल्स लिबरेशन मुव्हमेंटचे नेते जॉन गरांग यांच्यात दक्षिण सूदानमध्ये शांतता प्रस्थापित करणे व स्वातंत्र्य देणे या संबंधातील कार्यक्रम निश्चित करण्याबाबतचा समझोता झाला. जानेवारी २००५ मध्ये सर्वसमावेशक शांतता करार होऊन १९८३ पासून सुरु असलेली यादवी संपली. तद्नंतर ९ जुलै २०११ रोजी सूदानमधून साउथ सूदानची स्वतंत्र देश म्हणून निर्मिती झाली.

दक्षिण व उत्तर सूदानमधील यादवीचे या देशावर अनेक दुष्परिणाम झाले. देशाच्या विकासास खीळ बसली. यादवी युद्घात २० लाखांपेक्षा अधिक लोक मारले गेले, ४० लाखांहून अधिक लोक निर्वासित झाले.

साउथ सूदानच्या स्वातंत्र्यानंतरही खनिज तेलाचे सु. ८०% उत्पादन साउथ सूदानमध्ये मात्र तेलशुद्घीकरण कारखाने सूदानमध्ये (उत्तर सूदान) होते. त्यामुळे खनिज तेल महसुलाच्या वाटपाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.

सूदानमध्ये राष्ट्राध्यक्ष हा देशाचा प्रमुख असतो. २००५ च्या राज्यघटनेप्रमाणे राष्ट्रीय विधानमंडळ ही सूदानची संसद आहे. राष्ट्रीय विधानमंडळ द्वीसदनी आहे. यांपैकी नॅशनल असेंब्ली (कनिष्ठ सभागृह) मध्ये ४५० सदस्य व कौन्सिल ऑफ स्टेट (वरिष्ठ सभागृह) मध्ये ५० सदस्य असतात. संसदेच्या या ५०० सदस्यांना अप्रत्यक्ष मतदानानेराज्य विधिमंडळामार्फत सहा वर्षांसाठी निवडण्यात आलेले असते. सन २०१० मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत अल् बशिर हे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. सूदानमध्ये १७ राज्ये असून त्यांमध्ये १३३ जिल्हे आहेत (२०१२). संविधानाने स्वतंत्र अशी न्यायव्यवस्था निश्चित केली आहे. येथील न्यायव्यवस्था ब्रिटिश कॉमन लॉ व शरियत यांवर आधारित आहे.

आर्थिक स्थिती : सूदानची अर्थव्यवस्था विकसित होत आहे. यादवी युद्घ, राजकीय अस्थिरता, प्रतिकूल हवामान, आंतरराष्ट्रीय पातळीवरील शेतमालाचा कमी दर, परकीय मदतीचा कमी ओघ, आर्थिक धोरण यांचा परिणाम येथील आर्थिक विकासावर झालेला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे देशाच्या आर्थिक धोरणात सहकार्य आहे. डारफूर क्रायसेस, साउथ सूदानचे स्वातंत्र्य या अडचणींमुळे विकासदरात घसरण होणार नाही, याची दक्षता शासनाने घेतल्याचे दिसून येते. शेती हा उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे. देशाच्या एकूण उत्पादनाच्या ३९% भाग शेती उत्पादनाचा आहे. येथे बाजरीसारखे धान्य (दूरी), गहू, बार्ली, तांदूळ, मका, तीळ, भुईमुग, लिंबूवर्गीय फळे, ऊस, कांदा, खजूर, आंबा, केळी इत्यादींची उत्पादने घेतली जातात. नाईल नदीखोऱ्यात खष्म अल् क्विराब, अर्-रुमायरिस, लेक न्यूबिया, सना, जुनयद प्रकल्प,गेझीस योजना, सुकी प्रकल्प, मेरोवे बहुद्देशीय जलविद्युत् प्रकल्प, द हजर असल्या आणि किनन्ह या साखरनिर्मिती उद्योगांनी राबविलेल्या योजना या प्रमुख सुविधांमुळे येथे बागायती शेती होते. नगदी पिकांमध्ये बदल करण्याचे सूदानमध्ये प्रयत्न चालू आहेत. ऊस, कापूस, गहू इ. प्रमुख पिके घेतली जातात. ‘द अरब ऑथॉरिटी फॉर ॲग्रिकल्चर इन्व्हेस्टमेंट अँड डेव्हलपमेंट’ यांद्वारे शेतमालावर आधारित उद्योगांस चालना मिळते.

स्वातंत्र्योत्तर काळात येथील उद्योगांना चालना मिळाली आहे. सूदानच्या प्रमुख उद्योगांत सूतगिरणी, कापड उद्योग, साखर कारखाने, सिमेंट, साबण, तयार कपडे, खनिज तेलशुद्घीकरण यांचा समावेश आहे. १९७० च्या मध्यास नाईल नदीखोऱ्यात खनिज तेल शोधण्यास प्रारंभ झाला. २००० मध्ये येथून प्रत्यक्षात खनिज तेल निर्यातीस सुरुवात झाली. निर्यातीत खनिज तेलाचा हिस्सा ७०% ते ९०% आहे. मुगलद, मेलूर रिफ्ट बेसीन ही प्रमुख तेलक्षेत्रे आहेत. खार्टूम व पोर्ट सूदान येथील तेल शुद्घीकरण कारखाने नळाद्वारे तेलक्षेत्राशी जोडले आहेत. खार्टूम येथील कारखान्याची निर्मितीक्षमता प्रतिदिनी १,००,००० बॅरलची तर पोर्ट सूदान येथील तेलशुद्घीकरण कारखान्याची २१,७०० बॅरल प्रतिदिन होती (२००६). अल् जयली येथेही तेलशुद्घीकरण कारखाना आहे.


खष्म अल् क्विराब, सना या प्रकल्पांतून प्रामुख्याने वीजपुरवठा होतो, तसेच नाईल नदीवरील मेरोवे धरण (मेरोवे बहुउद्देशीय जल-विद्युत् प्रकल्प – हमदब धरण) मुख्यत: वीजनिर्मितीच्या हेतूने बांधण्यात आले आहे. येथून १,२५० मेवॉ. वीजनिर्मिती होते. नाईल नदी व तांबड्या समुद्रात मासेमारी केली जाते. देशातून मुख्यतः नाईल पर्च व शेल माशांची निर्यात होते. निर्यातीत खनिज तेल, कापूस, डिंक, तेलबिया यांचा, तर आयातीत वाहने, यंत्रसामग्री, लोह-पोलाद यांचा समावेश असतो.

द बँक ऑफ सूदान ही देशाची प्रमुख राष्ट्रीय बँक आहे. सूदानमधील अन्य सर्व बँकांचे १९७० मध्ये राष्ट्रीयीकरण करण्यात आले आहे मात्र १९७६ पासून परदेशी बँकांनाही त्यांच्या शाखा देशात सुरु करता येतात. देशाचे सूदान पौंड हे चलन आहे.

वाहतूक व दळणवळण : खार्टूम, पोर्ट सूदान, अल् ओबेद, उब्ररद, न्याला, वाडी हैफा, आतबारा, सना, कोल्टी इ. प्रमुख शहरे लोहमार्गाने जोडण्यात आली आहेत. लोहमार्गाची लांबी ५,३११ किमी. होती (२०११). वाडी मेदानी ते गेदरुफ हा महामार्ग १९७७ मध्ये पूर्ण झाला आहे. एकूण रस्त्यांची लांबी ११,९०० किमी. होती (२०११). नाईल नदीच्या काही भागात जलवाहतूक केली जाते. पोर्ट सूदान हे प्रमुख बंदर असून सॅवॅकिन, ट्रिकिटॅट, ॲक्विक ही अन्य बंदरे आहेत. शासकीय सूदान एअरवेज कंपनीमार्फत देशी व आंतर्देशीय हवाई वाहतूक केली जाते. खार्टूम, पोर्ट सूदान येथील विमानतळ प्रमुख आहेत.

लोक व समाजजीवन : सूदान हा जगातील विरळ लोकसंख्या असलेला देश आहे. २०११ मध्ये लोकसंख्येची घनता वाळवंटी भागात दर चौ. किमी.ला २, तर खार्टूम च्या शहरी भागात दर चौ. किमी.ला २४ होती. २००८ च्या जनगणनेप्रमाणे उत्तर, पश्चिम व पूर्व सूदान या तीन भागांची मिळून लोकसंख्या ३ कोटी नोंदलेली होती. खार्टूम शहराची व उपनगरांची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. याशिवाय युनायटेड स्टेट्स कमिटीने प्रसिद्घ केलेल्या जागतिक निर्वासित सर्वेक्षण अहवालान्वये २००७ मध्ये देशातील निर्वासितांची संख्या ३,१०,५०० होती.

सूदानच्या लोकसंख्येत सु. ७०% अरब लोक असून त्यांव्यतिरिक्त न्यूबियन, कॉप्टस, ख्रिश्चन व बेजा यांचा समावेश होतो. देशात ५९७ जनजाती होत्या (२०११). सुदानमध्ये सु. ४०० च्या वर भाषा व पोटभाषा (बोली) बोलल्या जातात. येथे अरब लोकसंख्या जास्त असून ते धर्माने मुस्लिम आहेत. मुस्लिमांध्ये ९७% सुन्नी आहेत.यांपैकी बहुसंख्य सूदानी अरबी भाषा बोलतात. इतर अरब जनजातीत विशेषत: अवदिआ, फॅदनिया, नज्दी इ. लोक अरबी भाषा बोलतात. तांबड्या समुद्रालगतच्या भागातील बेजा लोक बेजा भाषा बोलतात. न्यूबियन लोकांत न्यूबियन भाषा प्रचलित आहे. सूदानची २००५ पूर्वी अरबी ही अधिकृत भाषा होती मात्र २००५ च्या घटनेप्रमाणे देशाच्या अधिकृत भाषा अरबी व इंग्रजी आहेत.

खेळांमध्ये व्यायामाचे खेळ (ॲथलेटिक) आणि फुटबॉल प्रमुख आहेत. यांशिवाय हँडबॉल, बास्केटबॉल हे खेळही खेळले जातात. १९७२ च्या म्यूनिक ऑलिम्पिक क्रिडा सामन्यांत सूदानच्या फुटबॉल संघाने भाग घेतला होता. सांस्कृतिक व धार्मिक विविधतेमुळे सूदानी लोकांच्या पोशाखामध्ये वेगवेगळ्या भागांत विविधता असली तरी, प्रामुख्याने पारंपरिक व पाश्चात्त्य पद्घतीचा पोशाख वापरणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. दूरदर्शन व नभोवाणी सुविधा पूर्णतः शासनाच्या ताब्यात आहेत. या माध्यमांद्वारे शासनाची धोरणे स्पष्ट केली जातात. देशात २८ दैनिके प्रसिद्घ होतात (२०१२).

शिक्षण : ६–१३ वर्षे वयोगटातील मुलांसाठी शिक्षण मोफत व सक्तीचे आहे. प्राथमिक शिक्षण ८ वर्षांचे व माध्यमिक शिक्षण ३ वर्षांचे आहे. सूदानमध्ये १९ विद्यापीठे असून, त्यांमध्ये बायन सायन्स अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, ऑम्डरमन अहलिया युनिव्हर्सिटी, ऑम्डरमन इस्लामिक युनिव्हर्सिटी, द कॅथलिक युनिव्हर्सिटी ऑफ सूदान, युनिव्हर्सिटी ऑफ खार्टूम, युनिव्हर्सिटी ऑफ कोर्दोफॅन व महिलांसाठी अहफद युनिव्हर्सिटी फॉर वुमेन ही विद्यापीठे प्रसिद्घ आहेत. पूर्वी प्राथमिक स्तरावरील शिक्षण अरबी भाषेतून व माध्यमिक आणि विद्यापिठीय स्तरावरील शिक्षण इंग्रजी भाषेतून दिले जात असे मात्र आता माध्यमिक व विद्यापिठीय स्तरावरील शिक्षणही अरबी भाषेतून देण्याची व्यवस्था आहे. देशात २०१२ मध्ये सु. ६१% लोक साक्षर होते.

विसाव्या शतकापर्यंत आरोग्य सुविधा पुरेशा नव्हत्या. आरोग्य मंत्र्यांच्या अखत्यारित आरोग्य सुविधेसाठी खास कार्यक्रम निश्चित केले आहेत. येथे ४,९७३ डॉक्टर, २७८ दंतवैद्य, २६,७३० परिचारिका आहेत (२०१२).

पर्यटन : इतर आफ्रिकी देशांप्रमाणे सूदानमध्ये पर्यटकांची काही आकर्षणस्थळे आहेत. खार्टूम हे राजधानीचे शहर आहे. येथील राष्ट्रीय संग्रहालय व त्यातील ऐतिहासिक-पुरातन वस्तू, बुहेन व सेम्ना ही मंदिरे, खार्टूम विद्यापीठ इ. विशेष प्रसिद्घ आहेत. ऑम्डरमन येथील महदीचे थडगे, शहरातील उंटांचा बाजार, संग्रहालय, सूफी धार्मिकविधिविषयक कार्यक्रम ही विशेष आकर्षणे आहेत. अल्-ओबेद येथील कॅथलिक कॅथीड्रल, पोर्ट-सूदान येथील समुद्रकिनारा, पुळणी व अनेक ऐतिहासिक व धार्मिक वास्तुशिल्पे, कॅरिमा येथील अमून मंदिर, बर्कल पिरॅमिड इ. या देशातील पर्यटनस्थळे आहेत. (चित्रपत्रे).

गाडे, ना. स.


ऑम्डरमन शहराचे एक दृश्यखार्टुम विद्यापीठ : एक दृश्य.कापूस : देशातील प्रमुख शेती उत्पादन, गेझिरा प्रदेशमेरोए येथील प्राचीन पिरॅमिडशुष्क प्रदेशातील पाणवठा : देशाचा वायव्य भआग, डारफूर'महदी मुहंमद अहमद याची कबर', ऑम्डरमनसूदानच्या उत्तर भागातील वाळवंटी प्रदेशाचे एक दृश्य