व्ह्लॅडिव्हस्टॉक : रशियाच्या अतिपूर्वेकडील प्रदेशातील प्रीमॉर्स्की क्राई या शासकीय प्रदेशाची राजधानी व पॅसिफिक किना ऱ्यावरील सर्वात मोठे बंदर – शहर. लोकसंख्या ६,४८,००० (१९८९). सायबीरियच्या अगदी आग्नेय भागात कोरिया व मँचुरिया (चीन) यांच्या सरहद्दीपासून जवळच मूराव्यू या डोंगराळ द्वीपकल्पाच्या दक्षिण टोकावर हे वसलेले आहे. या द्वीपकल्पामुळे पश्चिमेकडील अमूर व पूर्वेकडील उसुरी हे पीटर द ग्रेट उपसागराचे दोन फाटे एकमेकांपासून अलग झाले आहेत. पीटर द ग्रेट उपसागर हा पॅसिफिक महासागरातील जपानी समुद्राचा भाग आहे. अमूर उपसागरातील गोल्डन हॉर्न हार्बर हा खाडीचा भाग असून तिच्या बाजूने असलेल्या टेकड्यांवर रंगमंडलासारखी या शहराची रचना केलेली आढळते. पाच चौ. किमी. क्षेत्राचे गोल्डन हॉर्न हे व्हलॅडिव्हस्टॉकचे अत्युत्कृष्ट बंदर आहे.

व्ह्‌लॅडिव्हस्टॉक : रशियाचे गजबलेले बंदर

अमूर प्रांताचा सरदार निकोलाय मूराव्ह्यू याने इ.स.१८६० मध्ये रशियन लष्करी चौक म्हणून या तटबंदियुक्त नगराची स्थापना केली. १८७२ मध्ये पॅसिफिक किनाऱ्या वरील रशियाचा मुख्य नौसेना तळ येथे हलविण्यात आला. १८९० मध्ये हे प्रादेशिक प्रशासकीय केंद्र बनले, पुढे मॉस्कोहून निघणारा ट्रांस-सायबीरियन लोहमार्ग येथपर्यंत येऊन पोहोचला (१९०२). रशियाचा मुख्य तळ तत्कालीन पोर्ट आर्थर व आताचे चीनमधील लू-शून यांवर जपानने अचानक हल्ला केला व रशिया-जपान युद्ध भडकले. जपानच्या ताब्यात ते गेल्यावर याचे लष्करी महत्त्व वाढले. पहिल्या महायुद्धकाळात दोस्त राष्ट्रांनी या शहराचा प्रमुख रसदकेंद्र म्हणून वापर केला. डिसेंबर १९७१ मध्ये याच्यावर दोस्त राष्ट्रांनी ताबा मिळविला. १९२० साली याचा अंतर्भाव नवघोषित “फार-ईस्टर्न रिपब्लिक” यामध्ये करण्यात आला, तेव्हा जपानी सैन्य तेथे होते. जपान्यांनी तेथे प्रतिक्रांती सरकार स्थापन केले. जपान्यांच्या हातात बाहुल्यासारखे असणारे हे सरकार पुढे कोसळले. १९२२ मध्ये हेच पुन्हा सोव्हिएट रशियाच्या ताब्यात आले. दुस-या महायुद्धाच्या काळात या बंदरातून सर्व वस्तूंची ने-आण होत असे.

व्हलॅडिव्हस्टॉक हे अतिपूर्व रशियातील आर्थिक व सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचे तसेच मोक्याचे केंद्र आहे. शहरातील बहुतांश लोकसंख्या रशियन व युक्रेनियन आहे. जहाजबांधणी व दुरूस्ती, मासे डबाबंदीकरण, धातूकाम, रेल्वे कर्मशाळा, खाणकामाची साधनसामग्री, वस्त्रनिर्माण, तांबे व जस्त शुद्धीकरण, पीठगिरण्या, चर्मसंस्करण, रसायने, रेडिओ निर्मिती, लाकडी सामान, चिनी मातीची भांडी, औषध निर्मिती, इमारत बांधणी हे येथील महत्त्वाचे उद्योगधंदे आहेत. रशियाचा पॅसिफिकमधील प्रमुख नौसेना तळ तसेच मासेमारी व देवमाशांच्या शिकारीसाठी जाणाऱ्यारशियन जहाजांचाही येथे मोठा तळ आहे. व्हलॅडिव्हस्टॉक हे ट्रान्स – सायबीरियन लोहमार्गावरील पूर्वेकडील अंतिम स्थान असल्यामुळे या बंदराला पृष्ठप्रदेशही विस्तृत लाभलेला आहे. दरवर्षी हिवाळ्यातील काही महिने (सामान्यपणे जानेवारी ते मार्च) बंदर गोठलेले असते. परंतु बर्फफोडी बोटीच्या साहाय्याने ते वाहतुकीस खुले ठेवले जाते.

खनिज तेल, कोळसा, धान्य, लाकूड यांची येथून निर्यात होते तर खनिज तेलउत्पादने व मासे यांची आयात केली जाते. साखर, चहा, सोयाबीन, कोळसा, ज्यूट-पोती, मीठ, खनिज तेल, लाकूड इत्यादींच्या व्यापार येथे चालतो. अभियांत्रिकी, वैद्यक, शिक्षणशास्त्र, मत्स्यविज्ञान, सागरविज्ञान, व्यापारशास्त्र इ. विषयांच्या तसेच फार – ईस्टर्न स्टेट युनिव्हर्सिटी (स्था.१९२०), फार-ईस्टर्न सायंटिफिक सेंटर इ. उच्च शिक्षणसंस्था शहरात आहेत. वस्तुसंग्रहालये, ग्रंथालये, रंगभूमी व संगीतविषयक संस्था शहरात आहेत.

चौधरी, वसंत