ऱ्हाईन : पश्चिम यूरोपातील अंतर्गत जलवाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची नदी. लांबी सु. १,३३५ किमी व जलवाहनक्षेत्र २,५२,००० चौ. किमी. सर्वसामान्यपणे दक्षिणोत्तर वाहणाऱ्या या नदीचा लाभ स्वित्झर्लंड, लिख्टेनश्टाईन, ऑस्ट्रिया, जर्मनी, फ्रान्स व नेदर्लंडस या देशांना होत असून हिचे वार्षिक सरासरी प्रवाहमान प्रतिसेकंदास २,३४० घ. मी. आहे. फॉर्देर-ऱ्हाईन व हिंट-ऱ्हाईन या ऱ्हाईन नदीच्या दोन प्रमुख शीर्षप्रवाहांचा उगम मध्य स्विस आल्प्समधील सेंट गॉटर्ड डोंगररांगेत अनुक्रमे तोमा सरोवरातून व एका हिमनदीतून होतो. हे दोन्ही शीर्षप्रवाह स्वित्झर्लंडमधील रायखानाऊ शहराजवळ एकमेकांना येऊन मिळतात. पर्वतांमधून २,३०० मी. खाली वहात आल्यावर ऱ्हाईन नदी प्रथम स्वित्झर्लंड-लिख्टेनश्टाईन यांच्या सरहद्दीवरून एका रुंद दरीतून, तसेच पुढे ऑस्ट्रिया-स्वित्झर्लंड सरहदीवरून उत्तरेस वाहत जाऊन कॉन्स्टन्स सरोवरात प्रवेश करते. कॉन्स्टन्स सरोवरातून पश्चिमेस बाहेर पडल्यावर शाफ हौझनजवळील ऱ्हाईन फॉल या २१ मी. उंचीच्या प्रेक्षणीय धबधव्यावरून ऱ्हाईन खाली उतरते व बाझेलपर्यंत स्वित्झर्लंड-जर्मनी सरहद्दीवरून वाहते. दरम्यान उत्तर स्वित्झर्लंडचे जलवाहन करून येणारी आरे (अर) नदी दक्षिणकडून ऱ्हाईनला मिळाली आहे.

बाझेलपासून नदी एकदम उत्तरवाहिनी होऊन एका खचदरीतून वाहू लागते. तेथे तिच्या पात्राच्या पश्चिमेस व्होज पर्वत व पूर्वेस ब्लॅक फॉरेस्ट प्रदेश आहे. पूर्वी नदीचे पात्र बरेच रुंद व पसरट होते, त्यामुळे पुराचे पाणी पात्रापासून खूपच दूरपर्यंत पसरत असे. एकोणिसाव्या शतकात परिश्रमपूर्वक प्रयत्न करून यावर नियंत्रण आणल्यामुळे आजचे नदीपात्र अरुंद व कृत्रिम बनल्याचे दिसून येते. बाझेलपासून माइन्त्सपर्यंतची नदीची लांबी ३२० किमी. आहे. तीपैकी सुरूवातीचे साधारण निम्मे अंतर ही नदी जर्मनी-फ्रान्स यांच्या सरहद्दीवरून वाहते व नंतर ती पूर्णपणे जर्मनीमधून वाहते. हा प्रदेश गहू, साखर बीट, तंबाखू यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या प्रदेशात ईल ही फ्रान्समधील महत्त्वाची उपनदी ऱ्हाईनला डावीकडून येऊन मिळते, तर नेकार व मेन ह्या उजवीकडून प. जर्मनीमधून येऊन मिळतात.

ऱ्हाईन-मेन संगमापासून पुढे मार्गात आलेल्या पर्वतीय प्रदेशाच्या अडथळ्यांमुळे नदी पश्चिमेकडे वळते. या भागात बिंगनपासून नदीने पर्वतीय प्रदेशाची मोठ्या प्रमाणात झीज केल्याने सु. १६० किमी. लांबीची ‘ऱ्हाईन गॉर्ज’ तयार झाली आहे. या घळईच्या काठचा प्रदेश द्राक्षमळे, ऱ्हाईन वाइन, तसेच अनेक प्राचीन किल्ल्यांचे अवशेष यांसाठी प्रसिद्ध आहे. कोब्लेंट्सजवळ पश्चिमेकडून मोझेल व पूर्वेकडून लान ह्या उपनद्या ऱ्हाईनला येऊन मिळतात. बॉनच्या दक्षिणेस डोंगराळ प्रदेश ओलांडताच नदी कोलोन शहरापासून मैदानी प्रदेशात प्रवेश करते व रुंद पात्रातून वाहू लागते. जर्मनी व नेदर्लंडस यांच्या सरहद्दीपर्यंतचे नदीचे पात्र उथळ व नागमोडी असून सु. १ किमी. रुंद आहे. या प्रदेशात नदीतीरांवर अनेक मोठ्या शहरांचा व औद्योगिक क्षेत्रांचा विकास झाला आहे. सरहद्दीवर पोहोचण्यापूर्वी रुर व लिप ह्या शेवटच्या प्रमुख उपनद्या ऱ्हाईनला मिळतात. या भागातच प्रसिद्ध रुर औद्योगिक क्षेत्र आहे.

नेदर्लंड्‌समधील नदीचा शेवटचा टप्पा १२० किमी. लांबीचा असून या टप्प्यात नदीचा वेग खूपच कमी आहे त्यामुळे त्रिभुज प्रदेशांचीही निर्मिती झालेली आहे. या भागात गाळाच्या संचयनामुळे नदीपात्र बाजूच्या प्रदेशापेक्षा हळूहळू उंचावले जाऊन पुराच्या वेळी पात्रातील पाणी बाजूला पसरून शहरांना मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होतो. त्यामुळे डच लोकांनी नदीकाठावर पक्के बांध घालून वा कालवे काढून या अडचणीवर मात केली आहे. पूर्वी ऱ्हाईन नदी द हेग या शहराजवळ उत्तर समुद्राला मिळत असे. सांप्रत ही नदी जर्मनी व नेदर्लंडस यांच्या सरहद्दीवर दोन मुख्य शाखांत विभागली गेली आहे. त्यांपैकी उत्तरेकडील ‘लेक’ ही शाखा आर्नहेम व रॉटरडॅम यांच्याजवळून वाहत जाऊन हूक फान हॉलंट येथे उत्तर समुद्राला मिळते. दक्षिणेकडील व्हाल ही दुसरी शाखा अधिक मोठी असून ती नाइमेगन शहराजवळून वाहत जाते. म्यूज ही या शाखेला येऊन मिळणारी प्रमुख उपनदी आहे. ही शाखा कालव्याने रॉटरडॅमशी जोडली आहे.


उन्हाळ्यात बर्फ वितळल्यामुळे नदीला मोठ्या प्रमाणात पाण्याचा पुरवठा होतो. नदीपात्रातून फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक, तर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये  सर्वांत कमी पाणी वाहते. हिवाळ्यात काही दिवस बर्फामुळे नदीतील वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. नदीमार्गातील धोकादायक खडकाळ भाग, द्रुतवाह व अनेक वेळा नदीप्रवाहात होणारे बदल इत्यादींवर नियंत्रण आणण्यात आले असल्याने अलीकडे नदीतून वाहतूक सुलभ झाली आहे. बाझेल ते स्ट्रॅसबर्ग यांदरम्यान कालव्यातून वाहतूक केली जाते. यांशिवाय वेगवेगळ्या कालव्यांच्या साहाय्याने ऱ्हाईन नदी डॅन्यूब, ऱ्होन, मार्न, एम्स, वेझर, एल्ब व ओडर या नद्यांशी आणि त्यावरील शहरांशी जोडलेली असून या कालव्यांचाही जलवाहतुकीस मोठ्या प्रमाणात उपयोग होतो.

रोमन काळापासून नदीतील वाहतुकीवर कर आकारला जात असे. चौदाव्या शतकात नदीवर ६० पेक्षा अधिक जकातनाकी होती. पुढे ही संख्या हळूहळू कमी होत गेली. १८१५ मध्ये व्हिएन्ना काँग्रेसने तर नदीतील जलवाहतुकीला आंतरराष्ट्रीय स्वातंत्र्य असावे, अशी बाजू मांडली. १८६८ च्या मॅनहाइम कराराने याच मागणीचा जोरदार पाठपुरावा केला व याच वर्षी आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी ही नदी खुली करण्यात आली. १९१९ मधील व्हर्सायच्या तहाने हेच स्वातंत्र्याचे तत्त्व मोझेल नदीला लागू करण्यात आले. सध्या ऱ्हाईन नदीतून मोठ्या प्रमाणावर वाहतूक चालते. प्रवाहाच्या उलट दिशेने होणारी मालवाहतूक ही प्रवाहाच्या दिशेने होणाऱ्या वाहतुकीपेक्षा दुप्पट आहे. वा नदीमधून रुर या औद्योगिक प्रदेशाकडे लोहखनिज आणले जाते, तर तेथून कोळसा बाहेर पाठविला जातो. तेलशुद्धीकरण कारखान्यांपासून वरच्या दिशेने खनिज तेल उत्पादने पाठविली जातात. नदीमुखाशी असलेले रॉटरडॅम-यूरोपोर्ट संकुल म्हणजे जगातील एक मोठे बंदर समजले जाते. ड्युइसबुर्क, रुर, स्ट्रॅसबर्ग, कोलोन, लूट व्हिख्‌सहाफेन, मॅनहाइम ही या नदीवरील इतर महत्त्वाची बंदरे आहेत.

कोलोनपर्यंत नियमितपणे सागरगामी  बोटीही येतात. औद्योगिकीकरण, पर्यटन, शेती इ. दृष्टींनी ऱ्हाईनचे खोरे विशेष प्रगत आहे. माइन्त्स ते बॉन यांदरम्यानचा नदीखोऱ्यातील निसर्गरम्य भूप्रदेश, औद्योगिक नगरे, ऐतिहासिक किल्ले, टेकड्या, द्राक्षांचे मळे यांमुळे या प्रदेशात पर्यटकांची विशेष गर्दी असते.

चौधरी, वसंत