हान्को : मध्य चीनच्या हूपे प्रांतातील प्रमुख बंदर व वूहान नगरसमूहातील एक शहर. हे हान व यांगत्सी नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. हान्कोचा शब्दशः अर्थ ‘हान नदीचे मुखङ्ख असा होतो. चीनच्याउत्तर-दक्षिण व पूर्व-पश्चिम दळणवळणाच्या मार्गावरील हान्को हेमुख्य शहर आहे. येथून नानकिंग, शांघाय, कँटन, चुंगकिंग इ. चीनमधील मुख्य शहरांशी हवाई वाहतूक चालते. यांगत्सी नदी हान्कोपर्यंत जलवाहतुकीस सुलभ असल्यामुळे येथे दहा हजार टनापर्यंतच्या गलबतांची ये-जा होत असते.

 

ताइपिंग बंडातील सैन्याने १८५३ मध्ये दक्षिण चीन व पीकिंगपर्यंतचाल करून हान्कोची लूट केली. त्या वेळी हान्कोचे लष्करी दृष्ट्यामहत्त्व समजले. मांचू राजवटीच्या काळात हान्को हे एक महत्त्वाचे लष्करी ठाणे झाले होते. १८५८ पासून हे विदेशी व्यापारासाठी खुले करण्यात आले. यांगत्सी नदीमार्गे शांघाय ते हान्को जलवाहतूक सुरू झाल्यामुळेहान्कोचा विकास झाला आहे. येथील दुतर्फा झाडांच्या रांगा असलेलेरुंद रस्ते हे शांघायमधील ‘व्हांग पू रिव्हर बंडङ्खची बरोबरी करतात.१९२९ मध्ये हान्को नगरपरिषदेची स्थापना झाली. शहराचा विस्तार जवळच्या हानयांग शहराच्या सीमेपर्यंत आहे. ऑगस्ट १९३१ मध्ये अतिवृष्टीमुळे यांगत्सी नदीस आलेला महापूर व चक्रीवादळामुळे हान्कोचे मोठे नुकसान झाले होते.

 

हान्को हे शेती उत्पादने व खनिज धातू वितरणाचे मुख्य केंद्र आहे.येथून हूनान प्रांतातून येणारे तांदूळ, कापूस, चहा, सुरमा आणि मँगॅनीजहेनान व शान्सी प्रांतांतून गहू , कापूस, तंबाखू , वाटाणे, अंबाडीतसेच यांगत्सी नदीखोऱ्यातून व जिआंगसी प्रांतातून येणारे रेशीम, साखर, कापसाचे गठ्ठे, खनिज तेल उत्पादने आणि गरजेच्या महत्त्वाच्या वस्तूंचे वितरण होते. हान्कोमध्ये उद्योगधंद्यांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला असून सध्या हे चीनमधील सर्वांत मोठे औद्योगिक शहर आहे. येथे यंत्रसामग्री, रसायने, सिमेंट, कापडउद्योग इत्यादींचा विकास झाला आहे. येथे १९५८ मध्ये सुरू झालेला लोखंडाचा कारखाना हा चीनमधील सर्वांत मोठ्या कारखान्यांपैकी एक आहे.

 

हान्कोमध्ये प्राचीन मंदिरे थोडीच आहेत. त्यांपैकी १९२७ मध्ये हूपे प्रांताच्या गव्हर्नरने ज्या बुद्धमंदिराचा भारतीय वास्तुकलेच्या धर्तीवर जीर्णोद्धार केला त्याचा समावेश असून हे मंदिर याप्रकारचा चीनमधील हा एकमेव नमुना आहे. याशिवाय नऊ मजली पॅगोडा, सेंट पॉल चर्च, खेळांची मैदाने तसेच शहराच्या आग्नेय भागात ‘सन यत् सेन’ च्या स्मरणार्थ बांधलेले उद्यान ही पर्यटकांची आकर्षणे आहेत.

 

पहा : वूहान.

कुंभारगावकर, य. रा.