जर्मिस्टन : द. आफ्रिकेच्या ट्रान्सव्हाल प्रांतातील शहर. लोकसंख्या १,९७,०२० (१९६८). जोहॅनिसबर्गपासून पूर्व आग्नेयीस १४ किमी. वरील हे शहर समुद्रसपाटीपासून १,६७० मी. उंच आहे. द. आफ्रिकेमधील जन. स्मट्स हा प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून फक्त १२ किमी. लांब आहे. जर्मिस्टन हे लोहमार्गाचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. ह्या शहराच्या आसमंतात विट्वॉटर्झरँड भागात सोन्याच्या खाणी असून सोने शुद्ध करण्याचा जगातील सर्वांत मोठा कारखाना येथेच आहे. कापूस पिंजणे, स्फोटक व रासायनिक पदार्थ, शेती अवजारे, आगपेट्या, कपडे, साबण, स्टार्च, ग्लुकोज, पेंड, पोलादी सामान, प्वाकू, कात्र्या इत्यादींचे कारखानेही येथे आहेत. हे या भागातील एक महत्त्वाचे शक्ति उत्पादन केंद्र आहे.

लिमये, दि. ह.