सुमात्रा : इंडोनेशियातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे बेट. क्षेत्रफळ ४,८१,७८४ चौ. किमी. लोकसंख्या ६,२०,०२,०८७ (२०११). हिंदी महासागरातील हे बेट मले द्वीपकल्पाच्या दक्षिणेस व पश्चिमेस ५° ३९’ उ. ते ५° ५७’ द. अक्षांश व ९५° १०’ ते १०६° ५’ पू. रेखांश यांदरम्यान विस्तारलेले आहे. विषुववृत्त या बेटाच्या मध्यातून गेलेले आहे. वायव्य-आग्नेय दिशेत पसरलेल्या या बेटाची कमाल लांबी सु. १७५० किमी. व कमाल रुंदी सु. ४०० किमी. (विषुववृत्ताजवळ) आहे. या बेटाची पश्चिम किनारपट्टी लहान आहे. या किनारपट्टीजवळ बारिसान ही पर्वतरांग आहे. यामध्ये ९३ उंच शिखरे आहेत. यात किरिंतजी नावाचे ३,८०६ मी. उंचीचे सर्वोच्च शिखर आहे. या बेटावर अनेक ज्वालामुखी शिखरे आहेत. पर्वतरांगांमधील खोऱ्यात सरोवरे आहेत. यामध्ये टोबा सरोवर सर्वांत मोठे असून त्याची लांबी सु. ८० किमी. व रुंदी सु. २५ किमी. आहे. पश्चिम किनाऱ्यावरील नद्या कमी लांबीच्या आहेत. पूर्व किनाऱ्यावरील नद्या लांब व जलवाहतुकीस उपयुक्त आहेत. हारी (जांबी) ही मोठी नदी आहे. याशिवाय मुसी, इंद्रगिरी, कांपार, रोकन या अन्य महत्त्वाच्या नद्या आहेत. उंच भाग वगळता येथील हवामान उष्ण व अत्यंत दमट आहे. वार्षिक सरासरी तापमान उत्तरेकडे १,२०० मी. उंचीवर २०° से. तर दक्षिणेकडे सखल भागात २७° से. असते. वार्षिक सरासरी पर्जन्यमान २४० ते २५५ सेंमी असते. डोंगराळ भागात घनदाट जंगले आहेत. येथे बांबू, साग, एबनी, आयर्नवुड इत्यादी वृक्षप्रकार आहेत. येथील जंगलात हत्ती, वाघ, अस्वल, सांबर इ. प्राणी दिसून येतात.

या बेटावरील शेती हे उपजीविकेचे महत्त्वाचे साधन आहे. शेतीतून भात, मका, तंबाखू, कॉफी, रबर, चहा ही उत्पादने घेतली जातात. खाऱ्या व गोड्या पाण्यातील मासेमारी येथे चालते. तेल, कथिल, कोळसा, बॉक्साइट ही बेटावरील प्रमुख खनिजे आहेत. सुमात्रा हे इंडोनेशियातील नैसर्गिक वायूच्या साठ्याचे मुख्य बेट आहे.

बेटावर गायो, बटाक, मेनांगकाबाऊ, लापाँग इ. लोकांची वस्ती आहे. यांतील कित्येकांनी इस्लाम धर्म स्वीकारला आहे. बेटावर लोहमार्ग, अंतर्गत रस्ते आहेत. हवाई वाहतुकही उत्तम चालते.

इ. स. च्या सातव्या शतकात या भागातील लोकांवर हिंदू संस्कृतीचा मोठा प्रभाव होता. तद्नंतर मुस्लिमांनी येथे वर्चस्व प्रस्थापित केले. सोळाव्या शतकाच्या प्रारंभी पोर्तुगीज व तद्नंतर डचांचे आगमन झाले. मलॅका सामुद्रधुनीचे व्यापारी महत्त्व लक्षात घेऊन इंग्रजांनी सतराव्या शतकात येथे व्यापारी वखारी स्थापन केल्या तथापि सुमात्रावर डचांचे आधिपत्य होते. इंडोनेशियाच्या स्वातंत्र्यानंतर इंडोनेशियन प्रजासत्ताकांत सुमात्रा सामील झाले.

पालेंबाग, मेडान, पाडांग ही येथील प्रमुख शहरे आहेत.

पहा : इंडोनेशिया.

लिमये, दि. ह.