इप्सविच – १ : पूर्व इंग्‍लंडच्या सफक परगण्यातील शहर. लोकसंख्या १,२२,८१४ (१९७१). हे लंडनच्या ईशान्येस ११५ किमी. आहे. उत्तर समुद्राला मिळणाऱ्या ऑर्वेल नदीखाडीच्या मुखापासून १९ किमी. आतील सुरक्षित बंदर म्हणून याची प्राचीन काळापासून वाढ झाली. सहाव्या शतकातील रोमन अवशेष येथे सापडतात. आठव्या शतकात येथील परिसरात उत्तम चिनी मातीची भांडी बनविली जात. सोळाव्या शतकात हे भरभराटलेले व्यापारकेंद्र व धार्मिक क्षेत्र बनले होते. शहरात अनेक जुन्या वास्तू, संग्रहालये, शैक्षणिक संस्था आहेत. सोळाव्या शतकातील प्रसिद्ध मुत्सद्दी टॉमस वुल्झे याचे हे जन्मस्थळ. त्याने येथे बांधलेल्या शैक्षणिक केंद्राच्या वास्तूचे काही अवशेष मिळतात. शहरात शेतीची अवजारे, खाणकामाची यंत्रे, खते, सिगारेट, कापड, कपडे, छपाई आदी उद्योग आहेत. येथून बार्ली, मद्य, खते, कोळसा इत्यादींची निर्यात होते व पेट्रोल, धान्य, रसायने, लाकूड, खडी इत्यादींची आयात होते.

शाह, र. रू.