रूवेनझोरी: आफ्रिकेतील युगांडा व झाईरे या देशांच्या सरहद्दीदरम्यान दक्षिणोत्तर दिशेत पसरलेली पर्वतश्रेणी. एडवर्ड सरोवर ते ॲल्बर्ट सरोवर यांदरम्यान ही श्रेणी पसरलेली असून तिची कमाल लांबी १२८ किमी .व रूंदी ६५ किमी. आहे. विषुववृत्तापासून अगदी जवळच उत्तरेस ही श्रेणी आहे. पश्चिमेकडील खचदरीकडे पर्वताची उंची एकदम कमी झालेली असून पूर्वेस युगांडा पठाराकडे ती हळूहळू कमी होत गेलेली दिसते. आफ्रिकेतील इतर विषुववृत्तीय पर्वतश्रेण्यांप्रमाणे रूवेनझारी पर्वत ज्वालामुखी प्रक्रियेतून निर्माण झालेला नसून प्राचीन आर्कियन कालखंडातील हा कठिण असा अवशिष्ट भूभाग आहे. भूकवच उंचावले जाऊन त्याची निर्मिती झालेली असून तीत रूपांतरित व स्फटिकमय खडक आढळतात.

हिमनद्या व प्रंचड हिमराशींनी युक्त असे सहा स्वतंत्र ‘हॉर्स्ट’ (ठोकळ्यासारखा उंचावलेला भूभाग) या पर्वतश्रेणीत आहेत. त्या प्रत्येकाची उंची ४,२०० मी. पेक्षा अधिक आहे. मौंट स्टॅन्ली या सर्वांत उंच गिरिपिंडातील मार्गारीटा (५,१०९मी.) हे या पर्वतश्रेणीतील सर्वोच्च शिखर आहे. खिंडी, घळ्या व नद्यांच्या खोल दऱ्यांमुळे येथील सर्व हॉर्स्ट किंवा ठोकळा पर्वतभाग एकमेकांपासून अलग झाले आहेत. पर्वताच्या दोन्ही उतारांवरून वाहणाऱ्या अनेक वेगवान जलप्रवाहांमुळे खोल दऱ्यांची निर्मिती झालेली आहे. पश्चिम उतारावरून वाहणारे सर्व जलप्रवाह शेवटी सेमलिकी नदीला येऊन मिळतात. या नदीमुळेच ॲल्बर्ट व एडवर्ड ही दोन सरोवरे एकमेकांना जोडली गेली आहेत. पूर्व उतारावरील प्रवाह कमी वेगवान असून त्यातील बरेचसे प्रवाह जॉर्ज सरोवराला जाऊन मिळतात. या सरोवरातील पाणी काझिंगा प्रवाह व एडवर्ड सरोवराद्वारे सेमलिकी नदीत जाते. हे सर्व नाईलचे शीर्षप्रवाह आहेत. अधिक उंचीच्या दऱ्याखोऱ्यांत हिमनद्या व लहान लहान सरोवरे आढळतात. पर्वतावरील बर्फ वितळल्यामुळे येथील प्रवाहांना भरपूर पाणीपुरवठा होतो. कायम हिमरेषा पूर्व उतारावर सस. पासून ४,५११ मी. उंचीवर, तर पश्चिम उतारावर ४,८४६ मी. उंचीवर आहे. पूर्वी सस. पासून केवळ १,२०० मी. उंचीवरच हिमरेषा होती. पर्वतशिखरांचे २,७०० मी. पेक्षा अधिक उंचीचे भाग नेहमी मेघाच्छादित असतात. अटलांटिक व हिंदी महासागरांकडून नियमितपणे वहात येणाऱ्या आर्द्रतायुक्त वातप्रवाहांमुळे हे मेघाच्छादन निर्माण होते. येथील आर्द्रता व वृष्टिमानही अधिक आहे. उंच भागातील वार्षिक सरासरी वृष्टीमान ५०० सेंमी. पर्यंत आहे. युगांडाकडील उतारावर वर्षातील १०० ते १५० दिवसां त सरासरी १९० सेंमी वृष्टी होते.

रूवेनझोरी पर्वतप्रदेशाची भूमी वेगवेगळ्या भागांत बर्फाच्छादित, उघडी–खडकाळ, गवताळ व अरण्यमय आहे. सस. पासून २,३०० मी. उंचीपर्यंतचा भाग मुख्यतः गवताळ आहे. पूर्वी तो वनाच्छादित होता. गवताळ प्रदेशाच्या वर ३,३०० मी. उंचीपर्वतच्या प्रदेशात दाट अरण्ये व बांबूची वने आहेत. अरण्यमय व गवताळ प्रदेशात हत्ती, गवा, चित्ता इ. प्राणी आढळतात. हिमरेषेखालील सर्व भागांत हरणे दिसतात. पूर्व उतारावरील अरण्ये हा युगांडातील सर्वात विस्तीर्ण अरण्यमय प्रदेश आहे. एडवर्ड सरोवराच्या पूर्वेस व रूवेनझोरी पर्वतश्रेणीच्या दक्षिणेस, नैर्ऋत्य युगांडात ‘रूवेनझोरी राष्ट्रीय उद्यान’ (स्था.१९५२) आहे. पायथ्यालगतच्या टेकड्यांतील कीलेंबे (युगांडा) येथे तांबे व कोबाल्टच्या भरपूर खाणी आहेत. येथील खाणकामासाठी पर्वतश्रेणीतील मुकुंब या सर्वात मोठ्या नदीपासून जलविद्युतशक्ती पुरविली जाते. गवताळ प्रदेशाच्या वरच्या भागात कायम स्वरूपाच्या मानवी वसाहती क्वचितच आढळतात. बाकोंजो व ब्वांबा ह्या शिकारी जमाती अरण्यमय प्रदेशाच्याही वरच्या भागापर्यंत आढळतात. हे लोक उदरनिर्वाहाची शेती करतात. ते मका, द्विदल धान्ये, रताळी, टॅपिओका, केळी ,गहू ही कृषिउत्पादने घेतात.

प्रसिद्ध भूगोलज्ञ टॉलेमी याने याचा ‘मौंटन्स ऑफ द मून’ असा उल्लेख केला आहे. त्यानेच नाईल नदीचे हे उगमस्थान मानले होते. हेन्री स्टॅन्ली हा रूवेनझोरी पर्वतश्रेणी पाहणारा पहिला यूरोपीय समन्वेषक होय (१८८७–८९). त्यानेच या पर्वताला ‘रूवेनझोरी ’ (रेनमेकर-पर्जन्यदायी) असे नाव दिले. इटालियन समन्वेषक आब्रुत्सीचा ड्यूक याने आपल्या सफरीत येथील महत्वाच्या शिखरांवर जाऊन तेथील बहुतेक भूमिस्वरूपांना नावे देऊन या भागाचा पहिला अचूक नकाशा तयार केला (१९०६). १९३२ मध्ये एका बेल्जियन सफरीने रूवेनझोरी पर्वत, तेथील शिखरे, हिमनद्या, हिमसरोवरे, अरण्ये या सर्वाचे समन्वेषण केले.

चौधरी, वसंत