खांडवा : मध्य प्रदेश राज्यातील जिल्ह्याचे ठिकाण. लोकसंख्या ८५,४०३ (१९७१). हे मुंबईच्या ईशान्येस‌ ५६८ किमी. आणि नागपूरच्या वायव्यपूर्वेस २९८ किमी. आहे. या पुराणप्रसिद्ध शहराचा उल्लेख टॉलेमी, अल् बीरूनी यांच्या वृत्तांतांतही आहे. बाराव्या शतकात हे जैन धर्माचे केंद्रस्थान असल्याने येथे जैन शिल्प आढळते. १५१६ मध्ये खांडवा येथे माळव्याच्या सुभेदाराची राजधानी होती. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या धामधुमीत या शहराची जाळपोळ झाली होती. मुंबई-दिल्ली रुंदमापी आणि हैदराबाद-रतलाम मीटरमापी लोहमार्ग खांडवा येथून जात असल्यामुळे आणि हे मोटार रस्त्यांचेही केंद्र असल्यामुळे खांडवा हे महत्त्वाचे लोहमार्ग प्रस्थानक व दळणवळणाचे केंद्र बनले आहे. ही कापसाची प्रसिद्ध बाजारपेठ असून स‌रकी काढण्याचे व कापसाचे गठ्ठे बांधण्याचे अनेक कारखाने येथे आहेत. आजूबाजूच्या प्रदेशांत पिकणाऱ्या तेलबिया, गहू, ज्वारी इत्यादींचा व्यापार येथे होतो. तेल गाळण्याच्या व लाकूड कापण्याच्या गिरण्याही आहेत. जवळच्या मोहघाट तलावाचे पाणी खांडव्याला पुरविले जाते. दोन महाविद्यालये, अनेक प्राथमिक व माध्यमिक शाळा, धंदेशिक्षण शाळा इ. शैक्षणिक संस्था येथे आहेत. १८६७ पासूनची नगरपालिका, शासकीय कचेऱ्या इत्यादींच्या इमारती आहेत.

कापडी, सुलभा