इंद्रप्रस्थ : उत्तरभारतांतर्गत महाभारतकालीन राजधानी. यमुना नदीच्या उत्तर किनाऱ्यावरील या प्राचीन नगराची उत्तर-दक्षिण लांबी १६ कोस व पूर्व-पश्चिम रुंदी ४ कोस होती. आधुनिक दिल्लीच्या दक्षिणेकडील फिरोजशहा कोटला व हुमायूनची कबर यांच्या दरम्यान ते असावे. दिल्ली या वैकल्पिक नावानेही हे ओळखले जाते. पांडवांच्या सूचनेनुसार विश्वकर्म्याने याची रचना इंद्रनगरीसद्दश वैभवसंपन्न केली त्यावरून त्याला इंद्रप्रस्थ नाव पडले असावे. युद्धिष्ठिराने राजसूय यज्ञ येथेच केला व त्यावेळी मयसभेची निर्मितीही येथेच केली. राजसूय दिग्विजयासाठी पांडव येथूनच निघाले व परत येथेच आले. भारतीय युद्धानंतर पांडवांनी आपली राजधानी इंद्रप्रस्थ नगराहून हलवून हस्तिनापूरला नेली व श्रीकृष्णाचा नातू वज्र यास येथे राज्याभिषेक केला. वज्रानंतर इंद्रप्रस्थाच्या सिंहासनावर परीक्षित् व त्याचे २९ वंशज, गौतमी, मौर्यसम्राट इ. अनेक राजे आले. मौर्य सम्राटांपैकी ‘दिलू’ राजाने इ. स. च्या पहिल्या शतकात इंद्रप्रस्थ नगराच्या परिसरात ‘दिल्ली’ या नव्या नगराची स्थापना केली असे म्हणतात. दिल्लीचा शेवटचा हिंदू राजा पृथ्वीराज चौहान होता. त्यानंतर मात्र इ. स. ११९३ मध्ये तेथे पठाणांनी आपली राज्यसत्ता सुरू केली. आज आढळणाऱ्या अवशेषांपैकी नीलछत्री मंदिर, निगमबोधघाट व प्रवेशद्वार, पुराना किल्ला, इंद्रपत ही स्थळे महाभारतकालीन आहेत. युधिष्ठिराच्या किल्ल्याच्या अवशेषांवरच हुमायूनने ‘दिन्‌पन्नाह’ हा नवीन किल्ला बांधला. याच किल्ल्यातील कीलाकोणी मशिदीच्या जागी पांडवांच्या राजसूय यज्ञात अश्वरक्षणार्थ अर्जुन उभा होता तर शेर मंझिलच्या जागी पांडवांचा खलबतखाना असून त्याच्या समोरील पटांगणात राजसूय यज्ञकर्माची जागा होती, असे म्हणतात.

जोशी, चंद्रहास