फिजी : पॅसिफिक महासागरातील द्वीपसमूहांनी बनलेला स्वतंत्र देश.  क्षेत्रफळ १८,३७६ चौ. किमी.  लोकसंख्या ५,८८,१०० (१९७६).  ही बेटे न्यूझीलंडच्या उत्तरेस २,१०० किमी. १५° द. ते २२° द. अक्षांश व १७४° पू. ते १७७° प. रेखांश यांदरम्यान आहेत. त्याच्या भोवती  कॉरो समुद्र आहे. त्यात सु. ८५० लहानमोठ्या बेटांचा अंतर्भाव असून त्यांपैकी सु. १०० बेटांवर लोकवस्ती आहे. व्हिटी लेव्हू (१०,३८८ चौ. किमी.) व्हानूआ लेव्हू (५,५३५ चौ. किमी.), टाव्हेऊनी (४३२ चौ. किमी.), कांडाव्हू (४०६ चौ. किमी.) कॉरो, ओव्हालाऊ, एन्‌गाऊ ही प्रमुख बेटे असून लाऊ व यासावा हे द्वीपसमूह महत्त्वाचे आहेत. १२° ३०’ द. अक्षांश व १७८° पू. रेखांशावर असलेल्या रोटूमा बेटाचा (४७ चौ.किमी.) समावेशही फिजी बेटांतच होतो.  व्हीटी लेव्हू बेटावरील सूव्हा [लोकसंख्या ६३,६२२ (१९७६)] ही फिजीची राजधानी आहे.

भूवर्णन : फिजी द्वीपसमूहातील बेटांमधील भूरचनेत विविधता आढळते. व्हीटी लेव्हू, व्हानूआ लेव्हू, ओव्हालाऊ, रोटूमा यांसारखी मोठी बेटे ज्वालामुखीपासून बनलेली आहेत, तर लहान बेटे ही प्रवाळांनी बनलेली आहेत. प्रमुख मैदानी भाग व्हीटी लेव्हूवर सिंगाटोका नदीखोऱ्यात व रेवा, एम्बा, नाव्हूआ या नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांत आणि व्हानूआ लेव्हूवर एन्‌ड्रेकेटी नदीखोऱ्यात आहेत. मोठ्या बेटांच्या मध्यभागी पर्वतरांगा असून व्हीटी लेव्हूवर टोमानीव्ही (१, ३२३ मी.) हे सर्वोच्च शिखर, तर व्हानूआ लेव्हूवर नासोरोलेव्हू (१,०३२ मी.) हे सर्वोच्च शिखर आहे. यांशिवाय ९१५ मी.पेक्षा जास्त उंचीची अनेक शिखरे या द्वीपसमूहांत आहेत.  

या बेटांभोवती प्रवाळ खडकांच्या मालिका असल्याने सागरी वाहतुकीत अडथळे येतात. रेवा ही येथील प्रमुख नदी असून ती जलवाहतुकीस उपयोगी आहे. याशिवाय एम्बा, नाव्हूआ, सिंगाटोका इ. इतर महत्त्वाच्या नद्या आहेत. 

हवामान : येथील हवामान उष्ण कटिबंधीय सागरी प्रकारचे आहे. ही बेटे आग्‍नेय व्यापारी वाऱ्यांच्या कक्षेत असून येथील हवामान दमट असते. येथील कमाल तपमान डिसेंबर ते एप्रिल व किमान तपमान जून ते सप्टेंबर या महिन्यांत असते. दैनिक तपमान सरासरी २४° ते २९° से.असून ते क्वचितच १८° ते २१° से.पर्यंत खाली येते. कमाल तपमान ३२° से.पर्यंत वाढते. पावसाचे प्रमाण हे वाताभिमुख प्रदेशात जास्त, तर वाताविमुख क्षेत्रात कमी असते. तथापि पावसाचे सरासरी प्रमाण सर्वत्र सारखेच आहे. सूव्हा हे राजधानीचे ठिकाण पूर्वेकडे असल्याने तेथे ३०० सेंमी. पाऊस पडतो. कधीकधी डिसेंबर ते एप्रिल महिन्यांत हरिकेन वाऱ्यांमुळे या बेटांचे फार नुकसान होते.

वनस्पती व प्राणी : फिजी द्वीपसमूहाचा बहुतेक भाग जंगलमय आहे. मोठमोठ्या बेटांवर वाताभिमुख बाजूस पर्जन्यप्रमाण जास्त असल्याने सदाहरित जंगले आढळतात, तर वाताविमुख प्रदेशात गवताची कुरणे व केवडा, नेचा यांसारख्या वनस्पती आढळतात. समुद्रकिनारी कच्छ वनस्पती म्हणजे पाणथळीतील वनस्पती व नारळाच्या बागा आहेत. यांशिवाय जंगलांतून डकुआ व दिलो यांसारख्या उपयुक्त वनस्पतीही आढळतात. 

फिजीतील प्राणिजीवन फार मर्यादित आहे. येथे कुत्रा, डुक्कर, मुंगूस, वटवाघूळ इ. प्राणी आहेत. बुलबुल, मैना, पोपट, कबुतरे यांसारखे पक्षी येथे आढळतात. 

इतिहास व राज्यव्यवस्था : फिजी बेटांची प्राचीन माहिती फारशी उपलब्ध नाही. आबेल टास्मान या डच संशोधकाने १६४३ मध्ये या द्वीपसमूहातील व्हानूआ लेव्हू, टाव्हेऊनी व ईशान्येकडीललहान बेटांचा शोध लावला. १७७४ मध्ये कॅ. जेम्स कुकने लाऊ द्वीपसमूहातील व्होटाआ बेटाचा शोध लावला. कॅ. विल्यम ब्लाय (१७५४-१८१७) ‘बाउंटी’ या जहाजातून प्रवास करीत असताना या मार्गे गेला, त्यावेळी त्याने व्हीटी लेव्हू एन्‌गाऊ, कॉरो व यासाव बेटांचा शोध लावला परंतु तो या बेटांवर उतरला नाही. १७९१ मध्ये कॅ. एडवर्ड्‍सने बंडखोरांच्या शोधार्थ फिरत असताना रोटूमा बेटाचा शोध लावला. कॅ. जेम्स विल्सन या ब्रिटिश मिशनऱ्याने व्हानूआ एम्बालाऊ व लाऊ समूहातील इतर लहान बेटांचा शोध लावला. यांशिवाय या द्वीपसमूहांतील काही बेटांचा शोध १८२० मध्ये रशियन संशोधक फेबिअन गॉटलीब फॉन बेर्लिंग्सहाउझेन (१७७८-१८५२) व १८२७ मध्ये फ्रेंच मार्गनिर्देशक द्युर्व्हिल द्यूमाँ (१७९०-१८४२) यांनी लावला.

अठराव्या शतकाच्या शेवटी चंदन आणि सागरी काकडी यांच्या व्यापारामुळे ईस्ट इंडियन व अमेरिकन लोक फिजी बेटांकडे आकर्षित झाले. या काळातच येथील आदिवासी जमातींत संघर्ष चालू होता. १८०४ मध्ये लेव्हूका येथे यूरोपियनांची पहिली वसाहत स्थापन झाली. नंतर येथे अनेक प्रवासी व धर्मप्रसारक येण्यास प्रारंभ झाला. टाँगामधून १८३५ साली येथे पहिले मिशनरी आले. १८५० च्या सुमारास स्थानिक संघर्षामुळे कॅकोबाऊ या टोळीप्रमुखास पुन्हा मामानूथा बेटावर परतावे लागले १८५४ मध्ये त्याने ख्रिस्ती धर्म स्वीकारला. पुढील वर्षी टाँगाच्या राजाने कॅकोबाऊला सैनिकी मदत केली. या मदतीमुळे कॅकोबाऊ पश्चिम फिजीचा प्रमुख बनला. पुढे व्यापारी, वसाहतकार इत्यादींच्या आगमनामुळे त्याच्या कारभारात अनेक कटकटी निर्माण झाल्या, तसेच आर्थिक व प्रशासकीय अडचणीही उद्‍भवल्या. बाहेरील अडथळ्यांपासून बेटांचे संरक्षण करण्याच्या हेतूने कॅकोबाऊने फिजीला वसाहतीचा दर्जा मिळावा, अशी ग्रेट ब्रिटनला १८५८ मध्ये विनंती केली प्रत्यक्षात ग्रेट ब्रिटनने ती १८७४ मध्ये मान्य करून फिजीला आपल्या वसाहतीचा दर्जा दिला व लेव्हूका ही वसाहतीची राजधानी केली. १८७९ च्या सुमारास भारतीय कामगार फिजीत येऊ लागले. उसाच्या मळ्यांत व साखर कारखान्यांत त्याना काम मिळे. १८८१ मध्ये रोटूमा बेटांचा फिजीमध्ये समावेश झाला. दोस्त राष्ट्रांनी दुसऱ्या महायुद्धात फिजी बेटांचा महत्त्वाचे लष्करी रसदकेंद्र म्हणून वापर केला.  याच काळात फिजी सरकारला अधिक स्वायत्तता देण्यात आली. १९६६ च्या राज्यघटनेनुसार येथे प्रातिनिधिक सरकार स्थापन करण्यात आले व रातू सर कामाइसेस मारा हा त्यांचा मुख्यमंत्री झाला. फिजी बेटांनी स्वातंत्र्याची मागणी केल्यावरून १० ऑक्टोबर १९७० रोजी त्यांना सार्वभौमत्व व स्वातंत्र्य देण्यात आले. तथापि फिजी हा राष्ट्रकुलाचा सदस्य देश राहिला आहे. मारा हाच फिजीचा पहिला पंतप्रधान बनला. त्याच्या आघाडी पक्षाने (स्था. १९६६) १९७२ च्या निवडणुकीत बहुमत प्राप्त केले आणि तो पुन्हा पंतप्रधान झाला. मात्र १९७७ च्या निवडणुकीत नॅशनल फेडरेशन पक्षाने (स्था. १९६३) ५२ पैकी २६ जागा जिंकल्या, परंतु तो पक्ष सरकार बनवू शकला नाही. या पक्षात भारतीयांचा प्रभाव होता. नॅशनल फेडरेशन पक्षात फूट पडून त्याचे दोन पक्ष झाले. त्यामुळे सप्टेंबर १९७७ च्या निवडणुकीपर्यंत काळजीवाहू सरकार म्हणून मारानेच काम पाहिले. सप्टेंबर १९७७ च्या निवडणुकीत माराच्या आघाडी पक्षाने ५२ पैकी ३६ जागा जिंकून बहुमत प्राप्त केले व तोच पुन्हा पंतप्रधान झाला. माराचा आघाडी पक्ष व नॅशनल फेडरेशन पक्ष या दोन्ही पक्षांची बैठक बहुजातींवर, तर फिजीयन नॅशनॅलिस्ट पार्टी (स्था. १९७४) या पक्षाची बैठक ‘फिजी हा फिजीयनांचा’ या घोषणेवर आधारीत होती.

येथील राज्यकारभार १९६६ च्या संविधानानुसार चालतो. फिजीच्या गव्हर्नर जनरलची नियुक्ती ब्रिटिश सरकार करते. तो संविधानात्मक तरतुदीनुसार काही गोष्टींचा अपवाद वगळता इतर सर्व बाबतींत मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने कारभार पाहतो. प्रतिनिधी सभा (हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्‌ज) व सीनेट असे द्विसदनी विधिमंडळ आहे. प्रतिनिधी सभेत एकूण ५२ सदस्य असून त्यांपैकी १२ फिजीयन, १२ भारतीय व ३ इतर प्रतिनीधी हे जातीय मतदारसंघांतून, तर १० फिजीयन, १० भारतीय व ५ इतर प्रतिनिधी हे राष्ट्रीय  मतदारसंघांतून पाच वर्षांसाठी निवडून दिले जातात. सीनेटमध्ये २२ नियुक्त सभासद असतात. त्यांतील प्रतिनिधी सभेतील भारतीय, फिजीयन आणि इतरांच्या प्रमुखांमार्फत आठ, पंतप्रधानामार्फत सात, विरोधी व पक्षनेत्यांमार्फत सहा व रोटूमा कौन्सिलमार्फत एक असे सहा वर्षासाठी नियुक्त केले जातात.


येथील न्यायदानाचे काम दंडाधिकारी न्यायालये, अपील न्यायालये व सर्वोच्च न्यायालय यांमार्फत चालते.  फिजीच्या लष्करामध्ये भूसेना, एक नौदल स्क्वॉड्रन, संरक्षक दल (काँझर्व्हेशन कोअर) व प्रादेशिक सेना असे विभाग आहेत. संरक्षक दलाची निर्मिती बेकारांना बांधकामाच्या कार्यात गुंतविण्यासाठी १९७५ मध्ये करण्यात आली. १९७७ मध्ये संरक्षक दलाशिवाय सैन्यसंख्या ६९५ होती. 

आर्थिक स्थिती : फिजीची अर्थव्यवस्था कृषिप्रधान असून ऊस हे प्रमुख पीक आहे. साखरेच्या आंतरराष्ट्रीय व्यापारातील अस्थिरतेमुळे १९७० च्या सुमारास फिजीच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला.  १९७५ च्या ‘लॉमे करारा’मुळे व १९७८ च्या ‘आंतरराष्ट्रीय साखर करारा’मुळे साखर उद्योगास मदत व व्यपारात सवलती प्राप्त झाल्या. परिणामी अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत झाली.

येथील जमीन काळी कसदार आहे नद्यांची सुपीक खोरी, अनुकूल हवामान यांमुळे शेती विकसित झालेली आहे. भात, मका ही प्रमुख अन्नधान्य पिके असून ऊस, नारळ, आले, केळीही प्रमुख व्यापारी पिके घेतली जातात. यांशिवाय तंबाखू, कोको, याकोना, कॉफी, अननस, रताळी यांचेही उत्पादन काही प्रमाणात होते. १९७८ मध्ये कृषिविकासासाठी ऑस्ट्रेलियाकडून मदत मिळालेली असून या प्रकल्पानुसार डोंगराळ भागातील व पडीक अशी ३,२४,००० हे. जमीन लागवडीखाली येईल. काही प्रमुख पिकांचे उत्पादन हजार मे.टनांत : ऊस २,६७४ नारळ १८३·८ टॅपिओका ९० भात २१ रताळी ८ केळी ४ (१९७७) व आले १ (१९७६). देशाच्या निर्यातीत दोन-तृतीयांश भाग साखरेचा असून देशातील २५% लोकसंख्याही या व्यवसायावरच अवलंबून आहे. नारळापासून खोबरेल तेल व इतर काही पदार्थांचे उत्पादन केले जाते. या उद्योगात पुष्कळ लोक गुंतलेले आहेत. पशुपालन व्यवसायाचा विकास होत आहे. १९७६ च्या अंदाजानुसार गुरे १,५६,००० शेळ्या ५५,००० डुकरे ३१,००० घोडे ५५,००० व कोंबड्या ८,५८,००० होत्या.

खाणकाम उद्योगासही महत्त्व असून व्हिटी लेव्हूवरील व्हाटूकोऊला येथे सोन्याच्या खाणी आहेत. याच बेटावर मँगॅनीजचेही साठे आहेत. व्हानूव्हा लेव्हूवर तांब्याच्या खाणी आढळतात. कच्चा माल व शक्तिसाधनांचा अभाव यांमुळे येथे अवजड उद्योगधंदे फारसे विकसित झालेले नाहीत. शेतमालावर आधारित अशा उद्योगांचे प्रमाण मोठे आहे. साखर, खोबरेल तेल, भात सडणे या प्रमुख उद्योगांशिवाय काही प्रमाणात कापड, बांधकाम साहित्य इ. उद्योगही चालतात. १९७७ मध्ये सूव्हा येथे खोबरेल तेलावर आधारित असे खाद्यपदार्थ बनविण्याचा कारखाना निघाल्याने या क्षेत्रातील उद्योगांस चालना मिळाली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत भर पडावी म्हणून प्राप्तिकरात सूट, व्यापारात सवलतीं यांद्वारा सिमेंट, सिगारेट लाकूडकाम इ. उद्योगांना उत्तेजन दिले जात आहे. पर्यटन हा परदेशी चलन मिळवून देणारा एक प्रमुख व्यवसाय असून त्यापासून १९७७ मध्ये आठ कोटी फिजी डॉलर उत्पन्न मिळाले. मासेमारीच्या विकासासाठी प्रयत्‍न केले जात असून खनिज तेलाच्या शोधासाठी अमेरिकन कंपन्यांशी करार केलेले आहेत. फिजीत विविध कामगारसंघटना आहेत. १९७७ मध्ये येथे ४३ कामगारसंघटना नोंदविलेल्या होत्या. त्यांमध्ये फिजी ट्रेड्‌स युनियन काँग्रेस (सदस्यसंख्या ३०, ००० पेक्षा जास्त), फिजी शुगर अँड जनरल वर्कर्स युनियन (२, ५०९), पब्‍लिक एम्प्लॉइज युनियन (८, ००० पेक्षा जास्त) या प्रमुख आहेत.

फिजीच्या पंचवार्षिक विकास योजनेत (१९७६-८० ) देशाचे उत्पादन वाढविणे, आधुनिक उद्योगांचा विकास करणे या गोष्टींचा समावेश असला, तरी शेतीविकासास अग्रक्रम दिलेला आहे. 

फिजीचा आयात-निर्यात व्यापार ग्रेट ब्रिटन, अमेरिका, जपान, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा या देशांशी प्रामुख्याने चालतो. निर्यातीत साखर, सोने, खोबरेल तेल, आले, मासे तर आयातीत विद्युत्‌साहित्य, लोखंड-पोलाद, कापड इत्यादींचा समावेश आहे. १९७७ मध्ये २,८०९·६ लक्ष फिजी डॉलरची आयात झाली, तर १,६२८·२२ लक्ष फिजी डॉलरची निर्यात झाली.

फिजी डॉलर हे देशाचे चलन असून ते जानेवारी १९६९ पासून वापरात आहे. १०० सेंट = १ फिजी डॉ. होतो. जानेवारी १९७९ मध्ये १०० फिजी डॉ. = ६०·४४ पौंड = १२०·७९ अमेरिकी डॉ. असा विनिमय दर होता. सेंट्रल मॉनेटरी ऑथॉरिटी ही प्रमुख बँक असून ती सर्व बँकिंग व्यवहार नियंत्रित करते. याशिवाय फिजी डेव्हलपमेंट बँक (नैसर्गिक साधनसंपत्ती, उद्योगधंदे इत्यादींच्या विकासासाठी) व नॅशनल बँक ऑफ फिजी या प्रमुख बँका आहेत. काही परदेशी बँकांच्या शाखा येथे आहेत. फिजी इन्शुअरन्स कंपनी व ग्रे इन्शुअरन्स लिमिटेड यांमार्फत देशातील विमा व्यवसाय चालतो.

देशात पुरेसे रस्ते व लोहमार्ग नाहीत. १९७८ मध्ये १, १३९ किमी. प्रमुख व ४५७ किमी. दुय्यम रस्ते होते. ६४४ किमी. लांबीचे कायम स्वरूपाचे लोहमार्ग व २२५ किमी. तात्पुरत्या वापरातील लोहमार्ग होते. तात्पुरत्या लोहमार्गाचा उपयोग ऊसवाहतुकीसाठी केला जातो. केळी व इतर काही पदार्थाची जलवाहतूकही होते. येथील सागरी वाहतूक विविध कंपन्यांमार्फत केली जात असून १९७६ मध्ये देशात तीन जहाजबांधणी व दुरुस्तीचे कारखाने होते. 

ऑस्ट्रेलिया व अमेरिका यांच्या सागरी, हवाई मार्गांवरील स्थान व नैर्ऋत्य पॅसिफिकमधील एक दळणवळण केंद्र म्हणून फिजीस महत्त्व प्राप्त झाले आहे. हवाई वाहतुकीस येथे विशेष महत्त्व आहे. नांदी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून तो नेहमी गजबजलेला असतो. ऑस्ट्रेलिया, अमेरिका, ब्रिटन या देशांकडील लांब अंतराच्या विमानप्रवासातील हे थांब्याचे ठिकाण आहे. सूव्हाचा विमानतळ नाउसोरी येथे आहे. या दोन प्रमुख विमानतळांशिवाय इतरत्र १३ विमानतळ आहेत. फिजीत १९७८ मध्ये ३५ डाकघरे होती. न्यूझीलंडमार्फत जगातील सर्व तारायंत्रांशी संपर्क साधला जातो. देशात १९७७ मध्ये ३०,७५९ दूरध्वनी होते. सूव्हा येथे प्रमुख नभोवाणी केंद्र असून तेथून इंग्रजी, हिंदी व फिजीयन भाषांतून कार्यक्रम प्रसारित केले जातात. फिजी सन, फिजी टाइम्स ही दोन इंग्रजी दैनिके सूव्हा येथून प्रकाशित होतात. यांशिवाय तीन मासिके व पाच साप्ताहिकेही प्रकाशित होतात. जय फिजी (स्था. १९५९ ) व शान्तिदूत (१९३५) ही दोन हिंदी साप्ताहिके अनुक्रमे लाउटोका व सूव्हा येथून प्रसिद्ध होतात. 

लोक व समाजजीवन : देशातील लोकसंख्येमध्ये भारतीय, फिजीयन लोकांचे प्रमाण जास्त असून यूरोपीय, चिनी इ. लोकही येथे आहेत. येथील लोक मेलानीशियन वंशाचे असून त्यांत पॉलिनीशियन वंशाचा संकर झाल्याचे आढळते. हे लोक विशेषतः पूर्वेकडील बेटांवर आढळतात. फिजीयन लोकांत ख्रिस्ती धर्मीयांची संख्या जास्त आहे. त्यांमध्ये ४०% मेथडिस्ट चर्चचे अनुयायी असून इतर रोमन कॅथलिक व अँग्लिकन वंशांचे आहेत. येथील भारतीय लोकांत बहुतेक हिंदू आहेत. यांशिवाय काही मुस्लिम व शीखही आहेत. १९७०-७५ अंदाजानुसार फिजीतील जन्म-मृत्युप्रमाण दर हजारी अनुक्रमे २५ व ४·३ असे होते.

फिजी लोक काळ्या वर्णाचे व सुदृढ बांध्याचे आहेत. ते विविध आदिवासी जमातींतून विभागलेले आहेत. प्रत्येक कुटुंबाची एक झोपडी असते व तिला ‘बूर’ म्हणतात. जमातीच्या प्रमुखास फार मान असतो. उत्सवाच्या व आदरातिथ्याच्या प्रसंगी ते मिरीच्या मुळापासून बनविलेले ‘याकोना’(कावा) हे पेय देतात. सांघिक नृत्ये व संगीत यांचे हे लोक भोक्ते असून त्यांतून त्यांनी आपल्या मूळ आदिम परंपरा जतन केल्या आहेत. विस्तवावरून अनवाणी चालण्याचा (फायर वॉकिंग) उत्सव एम्बेंग्गा बेटावर दरवर्षी साजरा केला जातो, तर ‘हिबिस्कस’ हा आंतरजातीय उत्सव सूव्हा येथे दरवर्षी  सप्टेंबरमध्ये साजरा करतात. येथील भारतीय लोक दिवाळीसारखे भारतीय सण त्याचप्रमाणे ‘फायर वॉकिंग’ हे उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करतात.

गाडे, ना. स, फडके, वि. शं.


कला व क्रीडा : येथील स्थानिक कलेवर सामान्यपणे पॉलिनीशियन प्रभाव जाणवतो. तुतीच्या झाडाच्या सालींपासून ‘मासी’ वा ‘टापा’नामक अलंकृत वस्त्र बनविण्यात येते. या अलंकरणात वक्राकार नागमोडी रेषांकन, तारकाकृती यांसारखी प्रतिमाने विशेषत्वाने आढळतात. मूळ वस्त्राच्या नैसर्गिक फिक्या रंगाच्या पार्श्वभूमीवर काळे वा गडद लाल रंग वापरून ही वस्त्रे रंगविली जातात. केवड्याच्या पानांपासून चट्या विणण्यामध्येही फिजीयन लोक कुशल आहेत. येथील मृत्पात्री मात्र पॉलिनीशियन प्रभावापासून पूर्णपणे मुक्त असून ती अतिशय विकसित झालेली आढळते. समुद्रकासवाचे शिल्पबद्ध आकार हे फिजीयन मृत्पात्रीचे ठळक वैशिष्ट्य. त्याशिवाय गोलाकार तसेच ढेरपोटी पात्रे, दुहेरी नौकेच्या  तसेच गोल फळांच्या आकारांच्या मुठींद्वारे एकत्र जोडलेल्या दोन वा त्यांहून अधिक पात्रांचा संच असे अनेक चित्रविचित्र प्रकार त्यात पाहावयास मिळतात. भांड्यांवरील सजावटीत भौमितीक आकृतीबंधांना प्राधान्य असते. विविध प्रकारच्या दैनंदिन उपयोगाच्या लाकडी वस्तूंवरील कोरीवकामही वैशिष्ट्यपूर्ण असते. उदा., काठी वा दंडुका, कावा पेयपात्रे, वाडगे आणि थाळ्या डोके टेकण्यासाठी बनविलेल्या लाकडी बैठकी लाकडांपासून, मोत्याच्या शिंपल्यांपासून वा देवमाशांच्या दातांपासून बनविलेल्या अलंकृत, प्रतीकात्मक भेटवस्तू (टॅम्बूआ) इत्यादी. ‘मेक्की’ ही एक पारंपारिक धार्मिक संगीत-नृत्याचा प्रकार आहे. पुरुषांच्या मेक्कीमध्ये भाले, दंडुके इ. घेऊन केले जाणारे युद्धनृत्य उल्लेखनीय आहे. स्त्रियांची मेक्की नृत्ये अधिक आकर्षक असतात.नृत्य करताना मासी वस्त्रे वापरण्याची प्रथा आहे. फिजीयन पारंपारीक कथा नाचगाण्यांतून जतन करण्यात आल्या आहेत. येथे भारतीय मंदीरे व ख्रिस्ती चर्चवास्तू विपुल प्रमाणात आढळतात.

आधुनिक खेळ व पाश्वात्य नृत्यप्रकार यांनाही फिजी जनजीवनात खास स्थान प्राप्त झाले आहे. रग्बी आणि सॉकर फुटबॉल लोकप्रिय आहेत.

इनामदार, श्री. दे. 

भाषा : फिजी बेटांत इंग्रजी ही शासकीय कामकाजाची अधिकृत भाषा म्हणून मान्यता पावलेली आहे. तथापि संसदेत इंग्रजीबरोबरच फिजीयन आणि हिंदी ह्या दोन भाषाही वापरल्या जातात. येथील बोलभाषा मलायो-पॉलिनीशियन भाषा कुटुंबातील असून रोटूमा बेटाचा अपवाद वगळता, बाऊ ही बोलभाषा प्रामुख्याने बोलली जाते. रोटूमा बेटात रोटूमन ही बोलभाषा प्रचारात आहे. फिजी बेटांतील भारतीय हिंदी भाषा बोलतात.  

कुलकर्णी, अ. र.

शिक्षण : पूर्वी देशातील शिक्षण मोफत अथवा सक्तीचेही नव्हते. परंतु १९७८ च्या योजनेनुसार पहिल्या पाच वर्षाचे प्राथमिक शिक्षण मोफत केलेले आहे. १९७७ मध्ये ६४४ प्राथमिक शाळांत १, ३२, ५३० विद्यार्थी १२४ माध्यमिक शाळांत ३३, ००० विद्यार्थी २७ धंदेशिक्षण व तांत्रिक शाळांतून २, ४०० विद्यार्थी व चार शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयांत ६४० विद्यार्थी व एका वैद्यक शाळेत २६६ विद्यार्थी होते. सूव्हा येथे ‘युनिव्हर्सिटी ऑफ द साउथ पॅसिफिक’ हे विद्यापीठ असून तेथे १,३७७ विद्यार्थी व १३० शिक्षक होते. या विद्यापीठात १९७६ मध्ये फिजी सरकारची शिष्यवृत्ती घेणारे ४६५ विद्यार्थी होते.

फिजी राष्ट्रीय भविष्य निर्वाह निधीची १९६६ मध्ये स्थापना झाली. १९७८ मध्ये त्यामधून निवृत्तिवेतन, विधवावेतन, घरबांधणीसाठी कर्जपुरवठा इ. तरतुदी केलेल्या आहेत. १९७७ मध्ये त्याची सदस्य संख्या १,००,००० होती. फिजीतील लोकांचे आरोग्य सर्वसाधारणपणे चांगले आहे. येथे हिवतापाचा प्रादुर्भाव झालेला नसून उष्ण कटिबंधात आढळणाऱ्या रोगांचे जवळजवळ निर्मूलन करण्यात आलेले आहे. वैद्यकीय व दंतवैद्यकीय सेवा सर्वांना कमीत कमी खर्चात पुरविल्या जातात. १९७७ मध्ये फिजीत २५ रुग्‍णालये, ४५ आरोग्य केंद्रे व ७८ शुश्रूषागृहे होती. 

महत्त्वाची स्थळे : सूव्हा ही फिजीची राजधानी व प्रमुख बंदर असून व्यापाराचे व उद्योगांचे केंद्र आहे. येथील फिजी संग्रहालयामध्ये ऐतिहासिक व मानवशास्त्रविषयक वस्तूंचा संग्रह केलेला आहे. लाउटोका हे व्हीटी लेव्हू बेटावरील शहर देशात दुसऱ्या क्रमांकाचे आहे. साखर करखान्यांमुळे ते विशेष प्रसिद्ध आहे. लेव्हूका ही फिजीची प्राचीन राजधानी (१८७१-८२ ) होती. सांप्रत हे शैक्षणिक, औद्योगिक व प्रशासकीय केंद्र आहे. यांशिवाय सिंगाटोक, साव्हूसाव्हू ही अन्य प्रमुख शहरे आहेत. 

मासेमारी, नारळांच्या बागा, किनारी भागातील पुळणी यांनी विनटलेल्या या बेटांवर अनेक पर्यटक येतात. १९७७ मधील पर्यटकांची संख्या १,७३,०१९ होती. 

फिजी बेटे इतर नवस्वतंत्र देशांच्या मानाने आर्थिक दृष्ट्या सुस्थितीत आहेत. ही परिस्थिती टिकवून ठेवण्यासाठी आंतरसामूहिक तणाव कमी करणे (उदा. फिजीयन, भारतीय इत्यादी ), स्थानिक फिजी लोकांची आर्थिक स्थिती सुधारणे व चिनी आणि यूरोपीय लोकांकडून होणारे आर्थिक शोषण थांबविणे आवश्यक आहे. फिजी  शासन परदेशी भांडवल आकृष्ट करून औद्योगिक विकासाला चालना देण्याच्या धोरणाचा पाठपुरावा करीत आहे. शेतीच्या पद्धतीत सुधारणा करून मासेमारी, जंगलव्यवसाय, खाणकाम इत्यादींतून योजनाबद्ध उत्पादन केल्यास देशाच्या विकासाची गती कायम ठेवण्यास मदत होईल. 


संदर्भ : 1. Burns, Alan, Fiji, London, 1963.

    2. Nayacakalou, R. R. Leadership in Fiji, London, 1976.

    3. Roth, G. K. The Fijian Way of Life, London, 1973.

गाडे, ना. स, फडके, वि. शं.

फिजी

फिजी स्त्रियांचे लोकनृत्य : एक दृश्य.

सूव्हा येथील हिंदू देवालय.

साखर कारखाना, सांतोक.