नागार्जुनसागर : भारतातील सर्वांत मोठा आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मानवनिर्मित जलाशय. आंध्र प्रदेश राज्यात हैदराबादपासून सु. १४४किमी.वर नळगोंडा जिल्ह्यात मिरिआलगुडा तालुक्यात नंदीकोंडा येथे कृष्णा नदीवर गुरुत्वाकर्षण पद्धतीचे चिरेबंदी धरण बांधून २८५चौ. किमी. विस्ताराचा हा जलाशय निर्माण करण्यात आला आहे. दोन हजार वर्षांपूर्वीच्या नागार्जुन विद्यापीठाचे अवशेष या जलाशयात बुडून गेले असते, त्यांचे संरक्षण केलेले आहे. ऑक्टोबर १९५५मध्ये नागार्जुन नियंत्रण मंडळ स्थापन करण्यात आले. डिसेंबर १९५५मध्ये जवाहरलाल नेहरूंनी याचे भूमिपूजन केले व चतुर्थ पंचवार्षिक योजनेत याचे काम पूर्ण झाले. मुख्य धरण १,४५०मी. व दोहो बाजूंचे मातीचे बांध धरून धरणाची एकूण लांबी ४·८किमी., उंची १२४·७मी., भिंतीची तळाशी रुंदी ९७·५मी., तर माथ्यावरील रस्ता ८·४मी. रुंदीचा असून याची जलधारणक्षमता ११,५५८·७ लक्ष घ. मी. आहे. उजव्या बाजूच्या जवाहर कालव्याची संकल्पित लांबी ३९४किमी. असून जलवाहनक्षमता २१,०००क्यूसेक्स आहे. तो दोन ठिकाणी बोगद्यांतून जातो. डाव्या बाजूच्या लालबहादूर कालव्याची संकल्पित लांबी ३५१किमी. असून त्याची जलवाहनक्षमता १५,०००क्यूसेक्स आहे. तो एका नालाकृती बोगद्यातून हलिया नदी पार करतो. या कालव्यांपासून गुंतूर, कुर्नूल, नेल्लोर, नळगोंडा, खग्मम इ. जिल्ह्यांतील ८·३ लाख हे. जमिनीचे सिंचन होणार असून ४·३३ लाख हे. जमिनीचे जलसिंचन १९७४-७५ मध्ये झाले आहे. जलविद्युत् निर्मितीसाठी प्रत्येकी ५०,००० किवॉ. क्षमतेची ८जनित्रे येथे आहेत. या प्रकल्पामुळे अधिक धान्योत्पादन, पूरनियंत्रण, विद्युतीकरण, औद्योगिकीकरण इ. अनेक उद्देश साध्य होणार आहेत.
देसाई, दा. सी.