डॉर्टमुंड : पश्चिम जर्मनीच्या नॉर्थ ऱ्हाईन-वेस्टफेलिया राज्यामधील एक महत्त्वाचे उद्योगकेंद्र व बंदर. ते डॉर्टमुंड-एम्स कालव्यावर असून कोलोनच्या ईशान्येस ७४ किमी. आहे. लोकसंख्या ६,४८,९०० (१९७०). डॉर्टमुंड मध्ययुगात उदयास आले. सुपीक प्रदेशात आणि ऱ्हाईनपासून पूर्वेस सॅक्सनीकडे जाणाऱ्या जुन्या ‘हेलवेग’ मार्गावर ते वसलेले असल्यामुळे त्याला महत्त्व आले. ‘थ्राटमॅनीअ’ नावाने डॉर्टमुंडचा पहिला उल्लेख ८८५ सालचा आढळतो. १२२० मध्ये तेथे एक स्वतंत्र राजसत्ता होती. नंतर ते ‘हॅन्सिॲटिक संघा’चा सदस्य बनले. चौदाव्या शतकात व्यापारामुळे ते अतिशय भरभराटीस आले. तीस वर्षांच्या युद्धानंतर (१६१८–४८) डॉर्टमुंडचे वैभव ओसरले. १८०३ मध्ये तर राजाश्रय गेल्याने शहराची वस्ती अवघी ४,००० उरली. एकोणिसाव्या शतकातील कोळसा व लोहखनिज या उद्योगांचा विकास व १८९९ मध्ये सुरू झालेला डॉर्टमुंड–एम्स कालवा यांमुळे डॉर्टमुंडच्याही विकासास वाव मिळाला. सध्या डॉर्टमुंड रुर प्रदेशाचे दळणवळण व उद्योग ह्यांचे मोठे केंद्र बनले आहे.

 पोलाद कारखान्याचा अंतर्भाग, डॉर्टमुंड.

दुसऱ्या महायुद्धातील बाँबवर्षावामुळे झालेल्या डॉर्टमुंडच्या मोठ्या हानीमधून पुन्हा हल्लीचे शहर उभारण्यात आले. मध्ययुगीन चार चर्चनी पुन्हा स्थापना करण्यात आली. शहरात अद्यापिही चार खंदकवेष्टित किल्ले व सॅक्सनकालीन गढींचे अवशेष आहेत. आधुनिक वास्तुशिल्पांमध्ये ‘सिनॅगॉग’ (१९५६) व ‘वेस्टफेलिया हॉल’ (१९५२) ह्यांचा अंतर्भाव होतो. वेस्टफेलिया हॉल हा यूरोपातील सर्वांत मोठ्या सभागृहांपैकी एक असून परिषदा, प्रदर्शने व क्रीडामहोत्सव ह्यांकरिता त्याचा उपयोग होतो. डॉर्टमुंडमध्ये अनेक शिक्षणसंस्था असून त्यांपैकी पुढील सुविख्यात आहेत : मॅक्स प्लांक औद्योगिक शरीरक्रियाविज्ञान संस्था, मॅक्स प्लांक पोषण क्रियाविज्ञान संस्था ‘द इन्स्टिट्यूट फॉर स्पेक्ट्रोकेमिस्ट्री अँड स्पेक्ट्रोॲनलिसिस’, म्यून्स्टर विद्यापीठाची सामाजिक संशोधनसंस्था समाजशास्त्रे, वृत्तपत्रविद्या, गिर्यारोहण, खाणकाम, अध्यापक प्रशिक्षण व प्रौढशिक्षण यांच्या विशेष शाळा आणि कित्येक वस्तुसंग्रहालये आहेत. पोलाद, कोळसा व बिअर हे डॉर्टमुंडचे प्रमुख उद्योग असून तेथील फळफळावळीचा घाऊक बाजार व भाजीपाला प्रसिद्ध आहे. पुलांचे बांधकाम करणाऱ्या डॉर्टमुंडमधील कंपन्या जगप्रसिद्ध आहेत. 

गद्रे, वि. रा.