लोझॅन : स्वित्झर्लंडमधील जिनीव्हा सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर, आल्प्सच्या झॉरा या डोंगराळ प्रदेशाच्या उतारावर वसलेले महत्त्वाचे शहर व बंदर. लोकसंख्या १,२४,००० नागरी प्रदेश २,६२,९०० (१९८८ अंदाज). जे देशातील पाचव्या क्रमांकाचे शहर मुख्यतःफ्रेंच भाषिक असून शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे आहे. पश्चिम स्वित्झर्लंडमधील व्हो प्रांताची ही राजधानी असून सांप्रत शहराचा विस्तार सस.पासून ३७८ मी. उंचीवरील ऊशी या याच्या सरोवरीय बंदरापासून ६४७ मी. उंचीवरील ले सिग्नल या उंच ठिकाणापर्यंत आहे. पूर्वी शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या फ्लोन व लुवे या दोन लहान प्रवाहांची पात्रे भरून काढलेल्या प्रदेशात हे वसलेले असून त्याची रचना पायऱ्यांची बनली आहे.

जिनीव्हा सरोवरासाठी जेथे फ्लोन नदी सरोवराला मिळते, तेथील मूळच्या केल्टिक वसाहतीजवळ (रोमन-लोझोनियम) रोमनांनी इ.स.पू. ५०मध्ये लष्करी छावणी उभारली. मूळची वसाहत सांप्रतच्या शहराच्या नैर्ऋत्येस होती. रोमन लोझोनियमवरूनच शहराचे लोझॅन हे नाव पडलेले आहे. चौथ्या शतकातील आलेमानी आक्रमणामुळे येथील लोक उत्तरेस डोंगराळ भागात स्थलांतरित झाले व तेथे त्यांनी वसाहती केल्या. इ.स. ५९० मध्ये अव्हेंटिकमचे (सांप्रत ॲव्हांश) बिशप मेरीअस यांनी हा बिशपच्या अखत्यारीतील प्रांत म्हणून जाहीर केला. पुढे हळूहळू शहराचा विस्तार होत गेल्याने पश्चिमेकडील सेंट लोरां चर्चभोवतालची वसाहत व फ्लोन नदीपलीकडील बर्ग गाव यांचा समावेश लोझॅनमध्ये करण्यात आला. बाराव्या शतकापासून या प्रदेशावर बिशप व पवित्र रोमन साम्राज्याचे राजपुत्र ह्यांनी सत्ता गाजविली. १५३६ मध्ये बर्नीज लोकांनी लोझॅन व्यापले. तेव्हापासून हे शहर प्रॉटेस्टंटवादी बनले. त्यांची सत्ता १७९८ पर्यंत होती. १८०३मध्ये हेल्बेटिक प्रजासत्ताकातील नवनिर्मित व्हो प्रांताची ही राजधानी बनली. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून शहराचा विशेष वेगाने विस्तार झाला.

आंतरराष्ट्रीय दृष्ट्या महत्त्वाचे करार व परिषदा येथे भरल्या होत्या. १९१२ मधील इटली-तुर्कस्थान यांच्यातील शांतता करार, १९२३ चा पहिल्या महायुद्धानंतरचा दोस्त राष्ट्रे व तुर्कस्ता न यांमधील करार, जर्मनीने पहिल्या महायुद्धातील मित्र राष्ट्रांना द्यावयाच्या नुकसानभरपाईबाबतची १९३२ मध्ये झालेली परिषद आणि अरबइस्त्राइल यांच्यातील १९४९ चा युद्धविराम करार येथेच झाला. शैक्षणिक व सांस्कृतिक दृष्ट्याही या शहराला महत्त्व आहे. १५३७ मध्ये स्थापन झालेल्या धार्मिक शिक्षण देणाऱ्या अकादमीचे पुढे १८९१ मध्ये विद्यापीठात रूपांतर करण्यात आले. तंत्रशिक्षण देणारी फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही संस्था येथे १८५३   पासून शिक्षणाचे कार्य करीत आहे. याशिवाय इतर विविध शैक्षणिक संस्था शहरात आहेत. विख्यात स्विस साहित्यिक बांझामॅन कॉन्स्टान् द रबेक, आलेक्सांद्र व्हीने, झ्यूस्त ऑलीव्ह्ये, शार्ल फेर्दिनँद रॅम्यू व तत्त्ववेत्ता शार्ल सेक्रेटन इत्यादींचे लोझॅन हे जन्मस्थान आहे. तर व्हॉल्तेअर रूसो, व्हिक्टर ह्यूगो, डिकिन्झ, एडवर्ड गिबन या विचारवंतांचे येथे वास्तव्य होते. शेली व लॉर्ड बायरन हे इंग्रजी कविद्वय १८१६ मध्ये काही काळ ऊशी येथे वास्तव्यास होते.

लोझॅन हे यूरोपमधील महत्त्वाचे रेल्वे दळणवळण केंद्र आहे. पॅरिसमिलान मार्गावरील सिंप्लॉन बोगदा १९० ६ मध्ये पूर्ण होताच त्याचे व्यापारी दृष्ट्या महत्त्व वाढले. जिनीव्हा, बर्न, पॅरिस व मिलान ही शहरे लोझॅनशी लोहमार्गांनी जोडलेली आहेत. डोंगरउतारावरील स्थानामुळे शहरातील रस्ते तीव्र उताराचे तसेच जुन्या पद्धतीचे टप्प्याटप्प्यांचे आहेत. शहरात भुयारी लोहमार्ग-सुविधा आहेत. परिशुद्धी उपकरणे, वस्त्रनिर्मिती, सिगारेटनिर्मिती, अन्नप्रक्रिया हे उद्योग येथे विकसित झाले आहेत. विमा कंपन्या, आंतरराष्ट्रीय व्यवसाय संस्था इत्यादींची मोठी कार्यालये शहरात आहेत. शहरात अनेक जुन्या व प्रेक्षणीय वास्तू आहेत. सरोवरातील नौकाविहाराच्या सोयी, मोठी हॉटेले, पुळणी, सुंदर बागा, विविध खेळांचे क्लब इत्यादींमुळे पर्यटनदृष्ट्याही हे शहर महत्त्वाचे आहे. शहरात अँग्लिकन, प्रेस्बिटेरियन ऑर्थोडॉक्स चर्च असून गॉथिक वास्तुशिल्पाचा नमुना म्हणून प्रसिद्ध असलेले व ११७५ आणि १२७५ मध्ये बांधण्यात आलेले नोत्रदाम कॅथीड्रल प्रेक्षणीय आहे. सेंट फ्रान्सिस चर्च, नगरभवन, सेंट मेरी किल्ला व त्यातील ऐतिहासिक संग्रहालय, विद्यापीठ, पॅलेस दे रूमाइन व त्यातील ग्रंथालय आणि तीन वस्तुसंग्रहालये ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणस्थळे आहेत. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे मुख्यालय येथेच आहे. दरवर्षी लोझॅन महोत्सव येथे होतो. वेगवेगळ्या स्विस शहरांत दर २५ वर्षातून एकदा भरविण्यात येणारे स्विस राष्ट्रीय प्रदर्शन १९६४ साली लोझॅनमध्ये भरविण्यात आले होते.

देशपांडे, सु. चिं.