हाँगकाँग : चीनचा विशेष प्रशासकीय विभाग. आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक उलाढालीचे महत्त्वाचे केंद्र म्हणून हाँगकाँगची ओळख आहे. हा विभाग चीनच्या आग्नेय किनारी भागात वसलेला असून याच्या उत्तरेला चीनचा ग्वांगडुंग प्रांत व पूर्व, दक्षिण आणि पश्चिमेला चिनी समुद्र यांनी हा वेढलेला आहे. याचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार २२° ९′ उ. ते २२° ३७′ उ. व ११३° ५०′ पू. ते ११४° ३०′ पू. यांदरम्यान आहे. क्षेत्रफळ सु. १,१०४ चौ. किमी. असून यास ७३३ किमी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. या विभागात हाँगकाँग (८१ चौ. किमी.), कौलून द्वीपकल्प, लॉनताऊ, स्टोनकटर्स बेट (४७ चौ. किमी.) व न्यू टेरिटरी बेटे यांसह २३० लहानमोठ्या बेटांचा अंतर्भाव होतो. लोकसंख्या ३३,०३,०१५ (२०११). एक देश दोन प्रणाली या तत्त्वानुसार हाँगकाँगमध्ये चीनच्या अन्य प्रदेशापेक्षा वेगळी राजकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

 

भूवर्णन : हाँगकाँग विभाग म्हणजे सामान्यतः खडकाळ टेकड्या व अनेक लहानलहान बेटांचा समूह असून बहुतेक भाग अग्निज व ग्रॅनाइट खडकांनी व्यापलेला आहे. हाँगकाँगचा समुद्रकिनारी प्रदेश काही अंशी जलमग्न आहे. त्यालगतचा भूप्रदेश डोंगराळ असून सस.पासून ९०० मी. पेक्षा जास्त उंचीचा आहे. येथे अनेक उंच शिखरे असून त्यातील न्यू टेरिटरी भागातील ताई मो शान (९५९ मी.) हे हाँगकाँगमधील सर्वांत उंच शिखर आहे. तसेच लॉनताऊ बेटावर लॉनताऊ शिखर (९३४ मी.), सनसेट शिखर (८७० मी.) हाँगकाँग बेटावर व्हिक्टोरिया शिखर (५५२ मी.), पारकर शिखर (५३१ मी.) कौलून द्विपकल्पात कौलून शिखर (६०२ मी.) ही अन्य प्रमुख शिखरे आहेत. हाँगकाँगच्या सखल प्रदेशातपूरमैदाने, नद्यांची खोरी व समुद्र हटवून तयार केलेल्या जमिनी यांचा अंतर्भाव होतो. शामचून ही येथील प्रमुख नदी असून ती गाँगडाँग व हाँगकाँगच्या सीमेवरून वाहते. हाँगकाँगमधील मृदा ही अम्लधर्मीय असून कमी सुपीक आहे. उपसागराच्या किनारी भागात गाळाची मृदा आढळते. डोंगराळ भागात तांबडी-पिवळी पॉडझॉल प्रकारची मृदा आहे.

 

हवामान : येथील हवामानावर उत्तरेकडील विशाल आशियाईभूप्रदेश, कर्कवृत्ताजवळील याचे स्थान व दक्षिणेकडील महासागरीय क्षेत्रया घटकांचा प्रभाव पडलेला आहे. येथील हवामान दमट व उपोष्णकटिबंधीय असून हिवाळ्यात हवा थंड व कोरडी, तर उन्हाळ्यात उष्ण वदमट असते. वार्षिक पर्जन्य २२० सेंमी. असून सु. ८०% पाऊस मे ते सप्टेंबर महिन्यांत पडतो. साधारणतः जून व ऑक्टोबर महिन्यांत हाँगकाँगला टायफून (चक्री वादळे) येतात.

 

वनस्पती व प्राणी : येथे मुख्यतः खारकच्छ वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळतात. याशिवाय उष्णकटिबंधीय व समशीतोष्ण कटिबंधीय हवामान प्रकारातील वनस्पतीही येथे आढळतात. येथे जंगलक्षेत्र विकासासाठी दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात निलगिरी, वड, कॅझ्वारीना प्रकारच्या व ताड यांसारख्या वृक्षांची लागवड केलेली आहे. येथे आखूड व लांब शेपटीची माकडे, वाघ, तांबड्या रंगाचे कोल्हे, सप्तपट्टे असलेले मांजर इ. प्राणी आढळतात. तसेच साप, सरडे, बेडूक यांच्या विविध जाती येथे असून पक्ष्यांच्या बाबतीतही विविधता आढळते.

 

हाँगकाँगमध्ये खनिजसंपत्ती आणि ऊर्जानिर्मिती साधनांची कमतरता आहे. थोड्या प्रमाणात शिसे, ग्रॅफाइट, फेल्स्पार, भांडी तयार करण्याची पांढरीशुभ्र माती इ. खनिजे सापडतात.

 

इतिहास : फार प्राचीन काळापासून हाँगकाँगमध्ये मानवी वसतीहोती, असे पुरावे प्राप्त झाले आहेत. इ. स. पू. २२० पासून हा प्रदेश चीनच्या आधिपत्याखाली होता. इ. स. १८०० पर्यंत हे मासेमारी व शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांचे एक लहानसे ठिकाण होते परंतु सागरी मार्गाने पूर्व व पश्चिमेकडे ये-जा करण्यासाठी हे महत्त्वाचे व मोक्याचे ठिकाण असल्यामुळे यास जागतिक व्यापार व लष्कराच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त झाले.

 

पहिल्या अफू युद्धानंतर (१८३९–४२) हाँगकाँग बेट नानकिंगतहान्वये ब्रिटनच्या स्वाधीन करण्यात आले. १८६० च्या दुसऱ्या अफू युद्धानंतरच्या पीकिंगच्या (बीजिंग) तहात ठरल्याप्रमाणे कौलून द्वीप-कल्पाचा प्रदेश ब्रिटनच्या स्वाधीन करण्यात आला. तसेच १८९८ च्या परिषदेत नमूद केल्याप्रमाणे त्याच वर्षापासून न्यू टेरिटरी प्रांतासह २३५बेटे ब्रिटनला ९९ वर्षांच्या करारावर चीनकडून मिळाली. अशा प्रकारे ब्रिटनने चीनकडून संपूर्ण हाँगकाँग प्रदेश हस्तगत करून येथे आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले. दुसऱ्या महायुद्धात ८ डिसेंबर १९४१ रोजी जपानने हाँगकाँगवर हल्ला केला. या युद्धात ब्रिटनचा पराभव झाल्यामुळे २५ डिसेंबर १९४१ रोजी संपूर्ण हाँगकाँग ब्रिटनने जपानच्या स्वाधीन केले. ३० ऑगस्ट १९४५ मध्ये ब्रिटिश सैन्याने जपानच्या ताब्यात असलेल्या हाँगकाँगवर हल्ला करून संपूर्ण हाँगकाँगचा प्रदेश जपानकडून परत मिळविला व मे १९४६ मध्ये पुन्हा आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले. ब्रिटिश अमदानीत हाँगकाँगची भरभराट झाली. औद्योगिकीकरण वाढले आरोग्याच्या सुविधांमध्ये वाढ झाली. येथील संपूर्ण अर्थव्यवस्था विकसित होण्यास मदत झाली.

 

हाँगकाँगच्या भौगोलिक स्थानामुळे चीन आणि ब्रिटन यांच्यात अनेकदा तणाव निर्माण झाले. १९८२–८४ दरम्यान हाँगकाँग प्रश्नासंबंधी चीनव ब्रिटनमध्ये वाटाघाटी झाल्या. १९ डिसेंबर १९८४ रोजी बीजिंग येथे दोन्ही सरकारच्या प्रमुखांनी संयुक्त घोषणापत्रावर सह्या केल्या व त्यानुसार संपूर्ण हाँगकाँग प्रदेश १ जुलै १९९७ पासून ब्रिटनने चीनच्या स्वाधीनकेला. चीनच्या राष्ट्रीय पीपल्स काँग्रेसने ४ एप्रिल १९९० रोजी हाँगकाँग-संदर्भात एक पायाभूत कायदा करून १ जुलै १९९७ रोजी हाँगकाँगची विशेष प्रशासकीय विभाग म्हणून स्थापना केली. त्यानंतर चीनने हाँगकाँगची पुनर्बांधणी करून येथील पायाभूत सुविधांचा विकास केला. १९९७ मध्ये हाँगकाँगचा प्रथम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तुंग-ची-हॉची नियुक्ती करण्यात आली.

 

राज्यव्यवस्था : जुलै १९९७ मध्ये हाँगकाँगच्या राजकीय, प्रशासकीय व्यवस्थेविषयी विशेष पायाभूत कायदा करण्यात आला.या कायद्यानुसार ‘एक देश दोन प्रणाली’ ही संकल्पना गृहीत धरून हाँगकाँगची भांडवलशाही अर्थव्यवस्था व राजकीय स्वायत्तता अबाधित राखून (परराष्ट्रीय धोरण व संरक्षण वगळता) ५० वर्षांसाठीची व्यवस्था करण्यात आली. चीन सरकारकडून विशेष पायाभूत कायद्यानुसार हाँगकाँग संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला सर्वोच्च अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. विशेष कायद्यानुसार एका निर्वाचन समितीच्या शिफारशीप्रमाणे केंद्रीय सरकारकडून त्याची नियुक्ती करण्यात येते. कायद्याची अंमलबजावणी करणे, अंदाजपत्रके तयार करणे, सरकारी धोरणे, योजना राबविणे, अध्यादेश निर्गमित करणे इ. प्रशासनासंदर्भांतील जबाबदाऱ्या त्याच्याकडे असतात. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमवेत प्रशासकीय कार्य करण्यासाठी तसेच योग्य धोरण ठरविण्यास सल्ला देण्यासाठी एक कार्यकारी समिती असते. या समितीत २९ सदस्यअसतात. त्यांतील १५ सदस्य शासकीय, तर १४ सदस्य अशासकीय असतात. या सर्व सदस्यांची नेमणूक मुख्य कार्यकारी अधिकारी करतो.

 

हाँगकाँग या मुख्य प्रशासकीय क्षेत्रासाठी कायदे आणि धोरणे बनविण्यासाठी ७० सदस्यीय वैधानिक समिती येथे कार्यरत आहे. या समितीतील ३५ सदस्य निर्वाचन क्षेत्रातून प्रत्यक्ष निवडले जातात, तर उर्वरितांची निवड विशिष्ट कार्यक्षेत्रानुसार शासनामार्फत केली जाते. ही समिती शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या ध्येयधोरणांची समीक्षाकरते आणि शासनास त्यासंदर्भात योग्य ते मार्गदर्शन करते. जिल्हा पातळीवर कार्य करण्यासाठी येथे जिल्हा समित्या कार्यरत आहेत.

 

पायाभूत कायद्यानुसार येथील न्यायालयीन व्यवस्थेची संरचना केली गेली आहे. न्यायव्यवस्थेत सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असते. त्यानंतर उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय आणि विशिष्ट न्यायालये अशी न्यायव्यवस्थेची संरचना आहे. केंद्र सरकारच्या शिफारशीनुसारमुख्य कार्यकारी अधिकारी हा मुख्य न्यायाधीशांची नेमणूक करतो.


 

आर्थिक स्थिती : मर्यादित नैसर्गिक स्रोत असलेला हाँगकाँग हा विभाग कच्चा माल, अन्नपदार्थ व इतर उपभोग्य वस्तू , भांडवली वस्तू , इंधन इ. सर्व गरजांसाठी आयातीवर अवलंबून आहे. हाँगकाँग क्षेत्रातील व्यापारावर १९६० पर्यंत संयुक्त राष्ट्रसंघाचे निर्बंध होते. हे निर्बंध हटल्यानंतर हाँगकाँगमध्ये लघुउद्योगांचा विकास झाला. नंतरच्या काळात सरकारच्या उदार धोरणामुळे औद्योगिकीकरणास चालना मिळाली. त्यामुळेच हाँगकाँग आर्थिकदृष्टीने एक प्रादेशिक वित्तीय केंद्र आणि चीनच्या आधुनिकीकरणासाठी चीनचा एक महत्त्वाचा प्रतिनिधी म्हणून विकसित झाला. जागतिक बँकेच्या अंदाजाप्रमाणे २०१० मध्ये हाँगकाँगचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न २,३१,६५८ द. ल. अमेरिकी डॉलर होते. देशांतर्गत उत्पादनात याच्या सेवाक्षेत्राचे (९२·९%) योगदान असून त्याखालोखाल उद्योगाचा (९%) क्रमांक होता (२०१०). वस्त्र व कापड उद्योग, पर्यटन, बँकिंग, सागरी वाहतूक, इलेक्ट्रॉनिकी, प्लॅस्टिक खेळणी व विविध प्रकारची घड्याळे निर्मिती इ. प्रमुख उद्योग हाँगकाँगमध्ये विकसित झाले आहेत. हाँगकाँगमधील उत्पादित मालाची निर्यात मुख्यत्वे देशांतर्गत (५४·१%) व यांशिवाय अमेरिकेची संयुक्त संस्थाने (९·९%) आणि जपान (४·२%) यांमध्ये, तर आयात चीनच्या अन्य भागांतून (४६·९%), तर जपान (८·४%), तैवान (७·५%) आणि दक्षिण कोरिया (५·०%) या देशांतून केली जाते.

 

येथे शेतीव्यवसायाचा देशाच्या आर्थिक उत्पादनात नगण्य स्थानआहे. मुक्त व्यापार धोरणामुळे हाँगकाँग हे जगातील एक विशाल व्यापारी केंद्र म्हणून उदयास आले आहे. सुगंधी द्रव्ये, मोटार वाहने, मादक पेयेव तंबाखू यांसारख्या चैनीच्या वस्तूंचा अपवाद वगळता हाँगकाँगमध्ये आयातीवर कर आकारला जात नाही. येथे सर्व प्रकारच्या वाहतूक सुविधा असून बहुतांश लोक सार्वजनिक वाहतूक सुविधांचा वापर करतात.

 

हाँगकाँग डॉलर हे येथील विनिमयाचे चलन असून आंतरराष्ट्रीय चलनांची देवाणघेवाणही येथे मोठ्या प्रमाणात होते. १०० सेंटचा १ हाँगकाँग डॉलर असून १०० हाँगकाँग डॉलर = १२·८६ अमेरिकन डॉलर असा विनिमय दर होता (२०११). चलनविषयक धोरणावर येथील प्रादेशिक सरकारच्या वित्तीय प्राधिकरणाचे नियंत्रण असते. हाँगकाँग हे आंतरराष्ट्रीय बँकिंग क्षेत्रातील प्रमुख जागतिक केंद्र समजले जाते. जगातील ३० देशांमध्ये हाँगकाँग बँकेच्या २५० पेक्षा जास्त शाखा आहेत.

 

पर्यटन : पर्यटन हा व्यवसाय हाँगकाँगच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे. येथे जास्तीत जास्त पर्यटक चीनच्या मुख्य भूमीमधून येतात. स्वच्छ सूर्यप्रकाश, सुसह्य व आल्हाददायक तापमान आणि उच्चतम व अत्याधुनिक दर्जाची विश्रामगृहे यांमुळे हाँगकाँगमध्ये पर्यटकांची खूपगर्दी असते.

 

लोक व समाजजीवन : हाँगकाँगमध्ये सुमारे ९५% लोक चिनी वंशाचे असून त्यात ताइशानीज, चाउचाऊ, हाक्का व इतर कँटनी वंशांच्या लोकांचा समावेश होतो. उर्वरितांमध्ये दक्षिण आशियाई, अमेरिकन, कॅनेडियन, ब्रिटिश व ऑस्ट्रेलियन लोकांचा समावेश होतो. येथीलबहुसंख्य लोक बौद्ध धर्मीय व ताओ पंथी आहेत. येथील लोकांचा पेहराव चिनी व पाश्चात्त्य पद्धतीचा आहे. जगातील दाट लोकसंख्येचा प्रदेश म्हणून हाँगकाँगची ओळख आहे. येथे लोकसंख्येची घनता दर चौ. किमी.स ६,६२० इतकी आहे. येथील पुरुषांचे सरासरी आयुर्मान ७९ वर्षे, तर स्त्रियांचे ८५ वर्षे आहे. जननदर हजारी १२·५ व मृत्युदर ६ होता, तर प्रती स्त्री जननक्षमता १·१ होती (२०१०). चिनी व इंग्रजी या दोन्ही भाषा व्यवहारात वापरल्या जातात. यांशिवाय सर्वसामान्यांच्यात ‘कँटनीज’ बोली बोलल्या जातात.

 

शिक्षण : हाँगकाँगमध्ये ब्रिटनच्या शिक्षणप्रणालीचा अवलंब केलेला दिसून येतो. येथे कँटनीज भाषेतून शिक्षण दिले जाते. तसेच चिनी वइंग्रजी भाषांचाही अवलंब केला जातो. येथे प्राथमिक शिक्षण सक्तीचेआहे. शिक्षणसंस्थांना सरकारचे भरपूर अनुदान मिळते. हाँगकाँग विद्यापीठ (१९११), चिनी विद्यापीठ (१९६३) हाँगकाँग बाप्टिस्ट विद्यापीठ (१९५६), सिटी युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग या विद्यापीठांद्वारे येथे उच्च शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. यांशिवाय अनेक व्यावसायिक, तांत्रिक व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांद्वारा विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण दिले जाते.

 

हाँगकाँगमध्ये पाश्चिमात्य आणि पौर्वात्य असे दोन्ही प्रकारचे सण- समारंभ साजरे केले जातात. येथील ड्रॅगन बोट, दि मिड ऑटम, चिनी नववर्षदिन इ. उत्सव महत्त्वाचे आहेत. नृत्य, संगीत, नाटक व तंत्रकला इत्यादींचे प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था हाँगकाँगमध्ये कार्यरत आहेत. येथे फुटबॉल, बास्केटबॉल, जलतरण, बॅडमिंटन, टेबलटेनिस, सायकल शर्यती इ. खेळ लोकप्रिय आहेत.

 

महत्त्वाची स्थळे : हाँगकाँगमधील प्रमुख शहरे व महत्त्वाची स्थळे प्रामुख्याने समुद्र किनारपट्टीच्या प्रदेशात आणि औद्योगिक क्षेत्रात विकसित झाली आहेत. त्यांत प्रामुख्याने कौलून, हाँगकाँग, त्सूएन वान, शातिन, तूएन मून, त्सेयुंग क्वॉन ओ, ॲबर्डीन, ताइपो, तिनशुइवॉइ, यूएन लाँगव नॉर्थ लानडाऊ या शहरांचा समावेश होतो. येथील व्हिक्टोरियाशिखर, हाँगकाँग डिझ्नेलँड, वेस्टर्न मार्केट, पोलीस वस्तुसंग्रहालय, स्टॅच्यू स्क्वेअर, हाँगकाँग विज्ञान वस्तुसंग्रहालय इ. ठिकाणे पर्यटकांची प्रमुख आकर्षणकेंद्रे बनली आहेत.

कुंभार, दौलत शेनू