दर्यापूर: (बनोसा). अमरावती जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या २०,०५४ (१९७१). क्षेत्रफळ २·५९ चौ. किमी. हे चंद्रभागा नदीवर वसले असून, अचलपूर—मुर्तिजापूर या अरुंदमापी लोहमार्गावरील स्थानक आहे. अमरावतीशी हे सडकेने जोडले आहे. अमरावती जिल्ह्यातील हे कपाशीच्या व्यापाराचे मुख्य केंद्र आहे. दर्या इमादशाह या वऱ्‍हाडच्या राजाने सोळाव्या शतकात हे वसविले असून त्याचे नाव यास दिले आहे. येथे १९३७ पासून नगरपालिका आहे. शहरास तीन माध्यमिक शाळा व एक महाविद्यालय असून साक्षरतेचे प्रमाण ४३% आहे. येथे हातमाग, सरकी काढणे व कापसाचे गट्ठे बांधणे हे प्रमुख उद्योग आहेत.

कांबळे, य. रा.