साऊँ टोमे : आफ्रिकेच्या पश्चिममध्य किनाऱ्यावरील गिनीच्या आखातातील साऊँ टोमे ई प्रीन्सिपे या देशाच्या राजधानीचे ठिकाण तसेच देशातील सर्वांत मोठे शहर व बंदर. लोकसंख्या ६०,००० (२०१०). देशाच्या साऊँ टोमे व (ई) प्रीन्सिपे या दोन प्रमुख बेटांपैकी साऊँ टोमे या बेटाच्या ईशान्य किनाऱ्यावर हे शहर वसले आहे. इ. स. १४७० मध्ये पोर्तुगीजांनी साऊँ टोमे बेटाचा शोध लावून त्यावर इ. स. १५०० च्या सुारास साऊँ टोमे शहराची स्थापना केली. इ. स. १५३४ पासून हे रोमन कॅथलिक बिशपचे केंद्र आहे. देशातील कोको, पामतेल व इतर ताड उत्पादने, कॉफी, खोबरे इ. उत्पादनांच्या व्यापाराचे व निर्यातीचे हे प्रमुख केंद्र आहे. देशातील एकमेव विमानतळ शहराच्या जवळच आहे.

देशपांडे, सु. र.