अवशिष्ट शैल : सभोवतीच्या विस्तीर्ण, सपाट, मैदानी प्रदेशात एकला पडलेला आणि एकदम उठून दिसणारा उंच खडक. यालाच अमेरिकन भूगोलशास्त्रज्ञ विल्यम डेव्हिस याने प्रथम ‘मोनॅडनॉक’ (म्हणजेच अवशिष्ट शैल) असे नाव दिले. एखाद्या डोंगराळ, पठारी किंवा मैदानी प्रदेशाची अनेक कारणांनी झीज होऊन शेवटी तो स्थलीप्राय बनतो. काही वेळा तो भूकवचाच्या हालचालींमुळे पुन्हा वर उचलला जातो आणि पुन्हा त्याची झीज होते. झिजेचे हे कार्य चालू असताना तेथील टणक खडकाचा काही भाग तसाच शिल्लक राहतो.

स्थलीप्राय प्रदेशातील अवशिष्ट शैल.

अमेरिकेच्या न्यू हँपयर संस्थानाच्या आग्नेय भागात, चेशायर कौंटीत सु. ९६५ मी. उंचीचा मोनॅडनॉक नावाचा असा एक डोंगर आहे. त्याची लांबी सु. ८ किमी. व रुंदी सु. ५ किमी. आहे. वारा, पाऊस, विदारण, नदी इ. क्षरणकारकांस विरोध करणार्‍या कठीण खडकांचा तो बनलेला आहे. अशा प्रकारच्या सर्व डोंगरांस किंवा टेकड्यांस आता ‘अवशिष्ट शैल’ ही संज्ञा वापरतात. काही शास्त्रज्ञांच्या मते या अवस्थेत इतक्या तीव्र उताराचा उंचवटा शिल्लक राहणे शक्य नाही तथापि सामान्यतः बहुतेक लेखक डेव्हिसने योजिलेली संज्ञा त्याला अभिप्रेत असलेल्या अर्थानेच वापरतात. भारतात आंध्र प्रदेशात याची काही उदाहरणे सापडतात.

कुमठेकर, ज. व.