मापूतो: (लोरेंसू मरकेश). आफ्रिकेतील मोझँबीक देशाची राजधानी व प्रमुख नैसर्गिक बंदर. लोकसंख्या ७,८५,५१२ (१९८१ अंदाज). हे हिंदी महासागराच्या डिलागोआ उपसागराच्या किनारी वसलेले असून मोझँबीकचे प्रमुख प्रशासकीय, सांस्कृतिक, व्यापार व दळणवळणाचे केंद्र आहे. मोझँबीक स्वतंत्र होण्यापूर्वी पूर्व आफ्रिकेतील एक महत्त्वाचे व्यापारी बंदर म्हणून हे ओळखले जात होते. खनिज पदार्थांच्या खाणींनी समृद्ध अशा दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताकातील ट्रान्सव्हालशी आणि स्वाझीलँडशी हे लोहमार्गाने व रस्त्यांनी जोडलेले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात या देशांशी असलेल्या राजकीय मतभेदांमुळे या बंदराच्या व्यापारावर विपरीत परिणाम झाला. येथे विमानतळही आहे.

पोर्तुगीज प्रवासी लोरेंसू मरकेश याने या भागाचे १५४४ मध्ये समन्वेषण केले व नंतर पोर्तुगीजांनी किल्ला बांधून येथे व्यापाराचे ठाणे उघडले. त्यास लोरेंसू मरकेश हे नाव पडले. १७८७ च्या सुमारास किल्ल्याच्या परिसरात लोकवस्ती होऊन १८८७ मध्ये यास शहराचा दर्जा प्राप्त झाला. १८९५ मध्ये द. आफ्रिकेतील खनिजसमृद्ध अशा ट्रान्सव्हालशी लोहमार्गाने हे जोडले गेल्याने याची झपाट्याने वाढ झाली. १९०७ मध्ये पोर्तुगीज पूर्व आफ्रिकेची व स्वतंत्र मोझँबीकचीही राजधानी येथेच करण्यात आली. मात्र १९७६ मध्ये याचे ‘मापूतो’ असे नामकरण करण्यात आले.

येथे सिमेंट, अन्न व तंबाखू प्रक्रिया, रबर, कातडी वस्तू, लाकूडकाम, खनिज तेलशुद्धीकरण इ. उद्योग विकास पावले आहेत. येथून प्रामुख्याने कोळसा, कापूस, साखर, क्रोम खनिज, सिसाल, खोबरे, कठीण लाकूड इत्यादींची निर्यात होते. येथे मोझँबीक विद्यापीठ (स्था. १९६३) आहे. येथील आरोग्यवर्धक हवामान, सुंदर पुळणी, आधुनिक सुंदर वास्तू. निसर्गेतिहास संग्रहालय, सैनिकी संग्रहालय, ‘अवर लेडी ऑफ फातिमा’ हे रोमन कॅथलिक कॅथीड्रल इ. पर्यटकांची आकर्षणे आहेत.

गाडे, ना. स.