वॉरिक : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी ऱ्होड आयलंड राज्यामधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर. लोकसंख्या ८५,४२७ (१९९०). प्रॉव्हिडन्सच्या दक्षिणेस सु. १५ किमी. वर ते नॅरागँसिट उपसागर व पॉटकसट नदीवर वसले आहे. येथे प्रारंभी शाओमेट इंडियनांची वस्ती होती. सॅम्युएल गॉर्टन (१५९२-१६७७) या धार्मिक नेत्याने इंडियनांकडून जमीन खरेदी करून तेथे शाओमेट या नावानेच वसाहत स्थापन केली (१६४२). पुढे त्यास इंग्लंडमधील वॉरिकच्या सरदाराच्या स्मरणार्थ वॉरिक हे नाव देण्यता आले. न्यूपोर्ट, प्रॉव्हिडन्स, पोर्टस्मथ आणि वॉरिक या चार गावांचा १६४७ च्या सनदेने एक संघ स्थापण्यात आला. १९१२ च्या सुमारास शहराचे विभाजन होऊन नवीन शहराला पश्चिम वॉरिक हे नाव देण्यात आले हा भाग प्रामुख्याने औद्योगिक होता. पुढे या सर्व भागात १९३१ च्या सनदेने शहराचा दर्जा प्राप्त झाला. वॉरिकमध्ये १७९४ पासून वस्त्रोद्योग चालतो. हा तेथील प्रमुख उद्योग असून ॲल्युमिनियम उत्पादने, यंत्रसामग्री, नळ, मत्स्योद्योग, दूधउद्योग हे इतर व्यवसायही आहेत. फळे व भाजीपाला यांकरिता वॉरिक प्रसिद्ध आहे.

वॉरिक हे निवासी शहर म्हणूनच विकसित झाले. शहरात अवर लेडी ऑफ प्रॉव्हिडन्स ही रोमन कॅथलिक पंथीय पाठशाळा, या गावी जन्मलेले अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धातील प्रसिद्ध सेनानी नाथान्येल ग्रीन (१७४२-८६) यांची जतन केलेली स्मारक-वास्तू, वसाहतवाल्यांनी ‘गॅस्पी’ हे ब्रिटिश जहाज १७७२ मध्ये जेथे जाळले, तो ‘गॅस्पी पॉइंट’, समुद्रपर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला रॉकी पॉइंट, थीओडोर फ्रान्सिस ग्रीन स्टेट विमानतळ, राज्य उद्यान इ. येथील प्रमुख प्रेक्षणीय स्थळे होत. उपसागरात नौकानयनाच्या सुविधेमुळे छोट्या प्रवासी बोटींचा ताफा आढळतो. वॉरिक संगीत सभागृहाची जगातील भव्य गृहांत गणना होते. नॅरागँसिट हे थंड हवेचे ठिकाण या शहराजवळच आहे, त्यामुळे हे पर्यटकांचे आकर्षण बनले आहे.

पंडित, भाग्यश्री.