सॅलमिस : सायप्रसमधील एक प्राचीन बंदर व पुरातत्त्वीय अवशेषांचे स्थळ. या स्थानाविषयी सनीय माहिती उपलब्ध नाही. ते सॅलमिस सायप्रस बेटावरील पूर्व किनाऱ्यावर आधुनिक फामागूस्टा या शहराच्या उत्तरेस सु. १० किमी.वर वसले आहे. मायसीनी संस्कृतीच्या काळात येथे वस्ती असावी, असा तज्ज्ञांचा कयास आहे. त्याचा उल्लेख होमरलिखित इलिअड या महाकाव्यात आढळतो. ट्रोजनांचे गीकांबरोबर झालेले युद्घ, हा या महाकाव्याचा प्रमुख विषय आहे. या युद्घातील एक प्रमुख सेनापती आणि धनुर्धारी टॉयसर (Teucer) याने ते वसविले, असे महाकाव्यातील परंपरा सांगते. टॉयसर हा ग्रीक सॅलमिस बंदरातून आला होता. टॉयसर म्हणजे ईजिप्शियन वृत्तांतात (बखरीत) उल्लेख केलेला टिजेक्कर (Tjekkar) असावा, असेही काही इतिहासकारांचे मत आहे. या परंपरागत संदर्भावरून त्याच्या नेतृत्वाखालील दर्यावदी सैन्याने सायप्रसवर इ. स. पू. ११९३ मध्ये हल्ला करून ते ताब्यात घेतले आणि सॅलमिस येथे वसाहत केली. पुढे या नैसर्गिक बंदराचा विकास व वाढ झाली आणि या बहिर्द्वारातून (बंदरातून) सायप्रसचे फिनिशिया, ईजिप्त आणि आशिया मायनरमधील प्राचीन सिलिशिया या भूप्रदेशांशी व्यापारी संबंध प्रस्थापित झाले. इराणने त्यावर स्वारी करून इ. स. पू. ५२५ मध्ये ताबा मिळविला. पुढे मॅसिडोनचा सम्राट पहिला डिमीट्रिअस पॉलिऑसीट्रीझ (कार. इ. स. पू. २९४– २८३) या राजाने अटीतटीच्या घनघोर नाविक युद्घात ईजिप्तच्या पहिल्या टॉलेमीचा (कार. इ. स. पू. ३२२–२८४) पराभव केला. त्याने तिथे काही वास्तूंचे बांधकाम केले. या काळात तिथे ज्यू लोकांनी तेथील स्थानिक प्रशासन आणि लोक यांविरुद्घ बंड केले. एवढेच नव्हे, तर कत्तल करून अनेक लोकांना कंठस्नान घातले आणि अखेर इ. स. ११५–११७ दरम्यान ते उद्ध्वस्त केले. याशिवाय या काळात वारंवार बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांनी तेथील घरांची पडझड झाली होती. पुढे पूर्व रोमन साम्राज्याचा सम्राट दुसरा कॉन्स्टॅशिअस (कार. ३३७ – ३६१) याने शहराची पुनर्बांधणी केली आणि त्यास कॉन्स्टॅनशिया हे नाव दिले. त्याच्या काळात ते ख्रिस्ती धर्माचे एक प्रमुख धर्मपीठ (बिशपचे निवासस्थान) म्हणून सायप्रसमध्ये प्रसिद्घ होते. रोमनांनी या ठिकाणी काही प्रार्थनामंदिरे बांधली. इ. स. पू. सु. २०० पासून या बंदरात गाळ साचण्यास सुरुवात होऊन पुढे या बंदराचे महत्त्व कमी झाले. अरब सेनानी मुआवियाच्या नेतृत्वाखालील अरबांनी ते इ. स. ६४८ मध्ये लुटले आणि नामशेष केले. त्यानंतर ते ओसाड पडले आणि पुढे त्यास पूर्वीचे वैभव प्राप्त झाले नाही.

विसाव्या शतकात या स्थळी झालेल्या उत्खननात काही प्राचीन अवशेष उपलब्ध झाले असून त्यांतील रोमनकालीन न्यायमंदिर आणि कृत्रिम जलसेतू इ. अवशेष वैशिष्ट्य पूर्ण आहेत.

देशपांडे, सु. र.