मेलानीशिया : पॅसिफिक महासागरातील ओशिॲनियांतर्गत द्वीपविभागांपैकी एक विभाग. क्षेत्रफळ सु. ५,७०,००० चौ. किमी., लोकसंख्या पापुआ न्यू गिनीसह ४०,००,००० (१९८१). नैर्ऋत्य पॅसिफिक महासागरात विषुववृत्ताच्या दक्षिणेस व ऑस्ट्रेलियाच्या ईशान्येस सु. ५,६०० किमी. पसरलेल्या या विभागात न्यू गिनी, न्यू कॅलेडोनिया, फिजी, लॉयल्टी, न्यू हेब्रिडीझ, सॉलोमन, सांताक्रू झ, ॲडमिरॅल्टी, लूईझीॲद, बिस्मार्क, डँट्रकास्टो इ. द्वीपसमूहांचा समावेश होत होता. १९६३ मध्ये न्यू गिनी बेट ऑस्ट्रेलिया इंडोनेशियात समाविष्ट झाले आहे. यांच्या पूर्वेस ओशिॲनियातील पॉलिनीशिया व उत्तरेस मायक्रोनीशिया हे दोन विभाग आहेत. (वरील प्रमुख द्वीपसमू हावर मराठी विश्वकोशात यथास्थळी स्वतंत्र नोंदी करण्यात आल्या आहेत).

मेलानीशिया हे नाव येथील मूळच्या कृष्णवर्णीयांमुळे, ‘मेलस नेसॉई’ (काळी बेटे) या ग्री क शब्दावरून आले असावे. या विभागातील बहुतेक मोठी बेटे ज्वालामुखीजन्य, डोंगराळ असून लहानलहान बेटे प्रवाळांनी बनलेली आहेत. बेटांवर बऱ्याच वेळा भूकंप व ज्वालामुखी उद्रेक होतात. उत्तरेकडील न्यू ब्रिटन व दक्षिणेकडील न्यू हेब्रिडीझ यांदरम्यान महासागराची खोली सु. ९,१०० मी. असून मेलानीशियातील मोठ्या बेटांवरच फक्त मोठ्या नद्या व नैसर्गिक जलाशय आढळतात. न्यू गिनी, फिजी बेटांच्या किनारी प्रदेशात थोडीफार मैदाने दिसून येतात. स्थान, विस्तार व सस.पासूनचीउंची यांच्या विविधतेमुळे येथील उत्तर व दक्षिणेकडील बेटांवरील हवामानात फरक आढळतो. उत्तर भागात विषुववृत्तीय प्रकारचे उष्ण हवामान असून दक्षिण भागात उपविषुववृत्तीय हवामान आढळते. येथील मासिक सरासरी तापमान २५° ते २८° से. असून सस. पासून कमी उंचीच्या भागात वर्षभर तापमान जास्त असते तर उंच डोंगराळ प्रदेशात त्या मानाने थंड असते. न्यू गिनीमधील काही शिखरे सतत बर्फाच्छादित असतात. या भागात पावसाचे प्रमाण भरपूर असून तो प्रामुख्याने डिसेंबर ते एप्रिल या काळत पडतो. येथील सरासरी पर्जन्यमान ७०० ते ९७० सेमीं. आहे. विषुववृत्ताजवळील काही बेटांवर बऱ्याच वेळा हरिकेन वादळे येतात.

हवामान, जमीन व सस.पासूनच्या उंचीतील फरकानुसार येथील वनस्पितप्रकारांतही विविधता आढळते. विषुववृत्तीय अरण्यप्रदेशातील वनस्पति प्रकारांपासून ओसाड प्रदेशातील खुरट्या वनस्पतीपर्यंतचे सर्व प्रकार या भागात आहे. आशिया व ऑस्ट्रलियातील बहुतेक सर्व वनस्पति प्रकार येथे विकसित झालेले दिसतात. जास्त पावसाच्या उत्तरेकडील बेटांवर ताड वृक्ष, नेचे, वेली व अनेक कठीण लाकडाचे वृक्ष आढळतात. उच्च प्रदेशांत ओक, पाईन, ऑस्ट्रेलियन यूकॅलिप्टससारखे अनेक वृक्षप्रकार आहेत. काही प्रवाळ बेटांवर व किनारी प्रदेशांत नारळाची झाडे व केतकी गणातील वेगवेगळ्या वनस्पती दिसून येतात. किनारी प्रदेशांतील दलदलींमध्ये कच्छ वनश्री आहेत.

या विभागातील प्रमुख बेटांवर प्रामुख्याने कांगारू, मुंगीखाऊ, ससे, उंदीर, हरणे, रानडुकरे, मगरी-सुसरी, विविध प्रकारचे सरडे व कासव तसेच सर्प आहेत. बहुतेक बेटांवर सुंदर तुरे आणि पिसे असेलेले तसेच शहामृग, काककुवा यांसारखे पक्षीही विपु ल आहेत.

मेलानीशियाचा इतिहास फार प्राचीन असून, तो येथील मूळ रहिवाशांच्या परंपरागत दंतकथांमधून पहावयास मिळतो. काही वर्षांपूर्वी आग्नेय आशियातून अनेक प्रवासी पश्चिम मेलानीशियात येऊन गेल्याचे खात्रीला यक सांगितले जाते. सोळाव्या शतकात स्पॅनिश व पोतुर्गीज दर्यावर्दीनी या बेटांना प्रथम भेट दिली आणि सॉलोमन बेटांवर वसाहती स्थापन केल्या. त्यानंतरच्या काळात मात्र ब्रिटिशांनी येथील बेटांचा शोध लावला. सतराव्या शतकात डचांनी पश्चिम भागातील बेटावंर आपला हक्क प्रस्थापित करण्यास सुरुवात केली. १८२८ मध्ये त्यांनी न्यू गिनी बेटाच्या सांप्रतच्या ईरीआन भागावर ताबा मिळविला. एकोणिसाव्या शतकात अनेक युरोपीय धर्म-प्रसारकांनी मेलानिशियातील बऱ्याच भागात कायम स्वरूपाच्या वसाहती स्थापन केल्या. १८५३ मध्ये फ्रेंचांनी न्यू कॅलेडोनियाच्या कबजा घेतला तर ब्रिटिशांनी १८७४ मध्ये फिजी बेटांवर हक्क सांगितला. १८८४ मध्ये ब्रिटिशांनी पापुआवर ताबा मिळविला, तर जर्मनीने न्यू गिनीचा ईशान्य भाग व बिस्मार्क द्वीपसमूह ताब्यात घेतला. १८९३ मध्ये ब्रिटनने सॉलोमन बेटे हा आपला संरक्षित प्रदेश म्हणून जाहीर केला. १९०६ मध्ये त्यांनी पापुआ भाग ऑस्ट्रेलियाला दिला. पहिल्या महायुद्धकाळात ऑस्ट्रेलियाने जर्मनीच्या ताब्यातील न्यू गिनीचा ईशान्य भाग व बिस्मार्क द्वीपसमूह आपल्या ताब्यात घेतला. विसाव्या शतकाच्या मध्यापासून मात्र मेलानिशियाच्या राजकीय भूगोलात बरेच बदल होत गेले काही जुन्या वसाहती स्वतंत्र झाल्या तर काही वसाहतींचा शेजारच्या देशांत समावेश झाला.

यूरोपीयांच्या आगमनापूर्वी येथील लोक बेटांवर फिरती शेती करत होते. याशिवाय शिका र, मासेमारी, कंदमुळे यांवर त्यांचा उदारनिर्वाह चालत असे. मातीची भांडी तसेच इतर वस्तू हाताने बनवून त्यांची आपापसांत देवाणघेवाण करीत असत. यूरोपीयांच्या आगमनानंतर मात्र येथील चंदनाचा व त्याचबरोबर गुलामांचा व्यापार सुरू झाला. तसेच शेती व खनिज उत्पादनांमध्येही खूपच प्रगती करण्यात आली. विसाव्या शतकात या भागातून प्रामुख्याने नारळ, सुके खोबरे यांची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. फिजी व इतर काही बेटांवर ऊस उत्पादनही मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. याशिवाय काकाओ, कॉफी, चहा, कापूस, रबर इत्यादींच्या लागवडीचेही प्रयोग बऱ्याच बेटांवर यशस्वी होत आहे. केळी, संत्री, अननस, टॅपिओका, भात, भुईमूग, तंबाखू ही शेती उत्पादनेही बऱ्याच प्रमाणात घेतली जात आहे. गुरे व दुग्धोत्पादन, शेळ्या-मेंढ्या, डुकरे तसेच कोंबड्या पाळण्याचा शेतीला पूरक उद्योगही येथे विकसित होत आहे.

न्यू गिनी, फिजी, बिस्मार्क इ. बेटांवर सोन्याच्या व तांब्याच्या खाणी आहेत. न्यू कॅलेडोनिया निकेल व कोबाल्ट तसेच क्रोम यांच्या उत्पादनातही जगात प्रसिद्ध आहे. बॉक्साइट, मँगॅ नीज, लोह, शिसे, जस्त, फॉस्फेट, खनिज तेल यांच्या उत्पादनात पश्चिम मेलानिशियाचा भाग अग्रेसर आहे. बांधकामासाठी लागणारी वाळू, वालुकाश्म, चुनखडक इत्यादींच्या उत्पादनाच्या दृष्टीनेही ही बेटे महत्त्वाची आहेत. येथे अवजड वस्तुनिर्मिती उद्योग मात्र फारसे नाहीत. नावा बांधणे, मासेमारी, जंगल उत्पादने गोळा करणे इ. लहान व ग्राहकोपयोगी वस्तुनिर्मितीचे उद्योग येथे चालतात. पर्यटन व त्याच्याशी संबंधित उद्योग मात्र झपाट्याने वाढत आहेत.

वाहतुकीच्या दृष्टीने मोठ्या बेटांवर चांगल्या प्रतीचे रस्ते, विमानतळ, बंदरे यांचा विकास झाला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर पर्यटन व्यवसायाच्या वाढीमुळे या बेटांवरील हवाई वाहतुकीत खूपच प्रगती करण्यात आली आहे.

चौंडे, मा. ल.