मिशिगन सरोवर : उत्तर अमेरिकेतील पंच महासरोवरांपैकी पूर्णपणे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत असलेले गोड्या पाण्याचे सरोवर. व्याप्तीने पंच महासरोवरांत याचा तिसरा क्रमांक लागतो मात्र देशातील हे सर्वांत मोठे सरोवर होय. जास्तीत जास्त लांबी सु. ४९४ किमी रुंदी सु. १९० किमी. क्षेत्रफळ ५८,०१६ चौ. किमी. या सरोवराची कमाल खोली २८१ मी. असून ते सस. पासून सु. १७७ मी. उंचीवर आहे. या सरोवराची खोली दक्षिण भागात कमी आहे. तेथे कमाल खोली १४६ मी. आढळते. उत्तरेकडील भागात किनाऱ्यानजीक काही बेटे आहेत. ‘ग्रीन बे’ हे लहान आखात वायव्येकडे असून, सरोवराच्या पाणलोट प्रदेशात लहानलहान नद्यांनी निःसरण केले जाते. मिशिगन सरोवराचे पाणी मॅकिनॅक या लहान सामुद्रधुनीतून ह्यूरन सरोवरात वाहत जाते.

या सरोवराचा उद्‍गम हिमयुग काळातील असून, हिम-जलक्षरण क्रियेतून झालेली भूरचना आणि हिमत्यक्त दगडांचे लांबच लांब बांध यांमुळे ते निर्माण झाले. तत्पूर्वी उत्तर अमेरिकेचा हा प्रदेश मिसिसिपी नदीच्या पाणलोटाचा भाग होता. बांधांनी उत्तरेकडून वाहत येणारे पाणी अडविले गेले आणि ही सरोवरे निर्माण झाली व त्यांच्या पाण्याचा प्रवाह सध्याच्या सेंट लॉरेन्स नदीकडे वळला.

हे सरोवर निकॉले या फ्रेंच वसाहतकाराने १६३४ मध्ये पहिल्यांदा पाहिले. जसजसे फ्रेंचांचे या भागात वसाहतीकरण वाढू लागले, तसतसा त्यांचा राजकीय व धार्मिक प्रभाव वाढू लागला. धर्मप्रसार, स्थानिक इंडियन जमातींशी मुकाबला करून वसाहतीसाठी प्रदेश बळकाविणे व व्यापार वाढविणे यांसाठी सरोवराच्या किनाऱ्यावर मोर्चाची ठाणी, गढ्या इ. उभारण्यात आल्या. त्यांपैकी शिकागो हे शहर होते. कालांतराने इंग्लिश वसाहतकारांनी फ्रेंचांचा पाडाव करून आपला राजकीय व आर्थिक अंमल या भागावर बसविला (१७६३). सरोवराच्या नैर्ऋत्य व पश्चिम भागांत शिकागो, पोर्ट गरी व मिलवॉकी यांसारख्या औद्योगिक शहरांची वाढ झाली. या वाढीचे मुख्य कारण म्हणजे, कच्चा माल व तयार केलेला उत्पादित माल यांची पंच महासरोवर ने-आण करण्याची सुलभता, हे होय. १९५९ मध्ये पूर्ण केलेल्या सेंट लॉरेन्सच्या अधिक खोल व सुधारलेल्या आखाती मार्गामुळे, या सरोवराकाठच्या कित्येक बंदरांना आंतरराष्ट्रीय व्यापारी महत्त्व प्राप्त झाले आहे. सरोवराच्या उत्तर भागात जंगले असल्याने लोकवस्ती विरळ आहे. दक्षिण भाग उद्योगदृष्ट्या प्रगत आणि दाट नागरी वस्तीचा आहे. सरोवराचा पूर्व भाग फळांच्या उत्पादनासाठी व पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे.

मिशिगन सरोवरीय बंदरांतून मुख्यत्वे लोह, तांबे यांची खनिजे व लाकूड, लाकडाचा लगदा अशा कच्च्या मालाची आणि लोखंड, पोलाद, मोटारी व इतर यांत्रिक उपकरणांची ने-आण होते. हिवाळ्यातील बर्फवृष्टीमुळे डिसेंबर ते एप्रिलपर्यंत ही वाहतूक जवळजवळ बंद असते. अलीकडे ‘शिकागो सॅनिटरी अँड शिप कनॅल’ द्वारा मिशिगन सरोवरातील काही पाणी मिसिसिपी नदीत सोडले जाते. शहरांतील प्रचंड औद्योगिकीकरणामुळे मिशिगन सरोवरात जलप्रदूषणाची भीषण समस्या निर्माण झाली आहे.

देशपांडे, चं. धुं.