मर्ग्वी : ब्रम्हदेशातील मर्ग्वी जिल्ह्याचे मुख्यालय व तेनासरीम किनाऱ्‍यावरील प्रमुख बंदर. लोकसंख्या ३३,६९७ (१९५३). मर्ग्वी नदीमुखापाशी असलेल्या उंच भूशिखरावर हे वसले आहे. आसमंतातील तांदूळ, रबर,मीठ, मासे, नारळ इत्यादींची ही व्यापारपेठ आहे. मर्ग्वीच्या दक्षिणेकडील व थायलंडच्या सीमेलगतच्या प्रदेशात असलेल्या समृद्ध नाम्यिन खाणींमधून उत्पादित होणाऱ्‍या कथिल व टंगस्टन यांच्या धातुकांची निर्यात याच बंदरातून केली जाते. मर्ग्वी द्वीपसमूहापैकी किनारापार द्वीपांचा भाग हा मोती उत्पादन व खोल सागरातील मासेमारी यांकरिता प्रसिद्ध असून जपानी कंपन्यांच्या सहकार्याने या दोन्ही उद्योगांच्या विकासकार्यात ब्रह्मी शासन गुंतलेले आहे. दुसऱ्‍या महायुद्धकाळात १८ जानेवारी १९४२ पासून युद्ध समाप्तीपर्यंत मर्ग्वी बंदर जपानच्या ताब्यात होते.

 

गद्रे, वि.रा.