पावागढ : गुजरात राज्यातील पंचमहाल जिल्ह्याच्या हालोल तालुक्यातील डोंगरी किल्ला व यात्रास्थान. हे बडोद्याच्या पूर्वेस सु. ४७ किमी. समुद्रसपाटीपासून ८५३ मी. असून. पायथ्याशी चांपानेर हे ऐतिहासिक ठिकाण आहे. याच्या सभोवतालचा भाग सपाट मैदानी असून पूर्वेकडील वनाच्छादित व पश्चिमेकडील वृक्षरहित आहे. जुन्या शिलालेखात याचा ‘पावकगड’ असा उल्लेख आढळतो. याचा पहिला ऐतिहासिक उल्लेख बाराव्या शतकातील मिळतो. यावर अनेक सत्तांतरे झाली. मारुती द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असता त्या पर्वताचा खाली पडलेला तुकडा म्हणजे पावागढ, अशी येथील स्थानिक संकल्पना आहे. डोंगराच्या उत्तर टोकाच्या पूर्व बाजूवर जैन देवालयांचे अवशेष, तर पश्चिम बाजूवर अर्वाचीन मुसलमानी इमारती आहेत. दक्षिणेकडील ७६ मी. उंचीच्या शिखरावरील महाकालीचे मंदिर या भागातील जागृत देवस्थान समजले जाते. दरवर्षी चैत्र शुद्ध अष्टमीला येथे मोठी यात्रा भरते. किल्ल्यास तीन मोठे दरवाजे आहेत. खननकार्यामुळे या किल्ल्याचे मूळ स्वरूप बरेच बदलले आहे. येथे तीन तलाव असून विश्वामित्री नदीचा उगम या डोंगरातूनच होतो. किल्ल्यावरील भुयारे, मंदिरे व त्यांवरील शिल्पकला, खापरा जव्हेरी या लुटारूची हवेली इ. उल्लेखनीय आहेत.

चौधरी, वसंत.