पंपा: कर्नाटक राज्याच्या रायचूर जिल्ह्यातील एक छोटे पुराणप्रसिद्ध सरोवर. हे तुंगभद्रा नदीच्या डाव्या बाजूस, अनेगुंदी गावाच्या पश्चिमेस सु. ३ किमी.वर असून, याच्या काठचा प्रदेश निसर्गरम्य आहे. याच्या जवळच तुंगभद्रेच्या उजव्या बाजूस असलेले विजयानगर (हंपी) म्हणजेच जुने ‘पंपाक्षेत्र’ असे म्हणतात व यावरूनच हंपीच्या विरूपाक्ष देवाला पंपापती असेही म्हणतात. या सरोवराजवळच बेल्लारी जिल्ह्यातील ऋष्यमूक पर्वतावर हनुमान व सुग्रीव यांची रामाबरोबर पहिली भेट झाली, असा समज आहे. रावण सीताहरण करून जाताना त्याला हे सरोवर पार करावे लागले व याच सरोवराकाठी मतंग ऋषींचा आश्रम होता, असा रामायणात उल्लेख आहे. याच्या जवळच्या पर्वतावर शबरी गुंफेचे व मंदिराचे भग्नावशेष आहेत. हे सरोवर बेल्लारी जिल्ह्यात आहे, असे काहींचे मत आहे.

खरे. ग. ह.