हिमानी क्रियेने ड्रमलिनची निर्मिती

हिमनदांच्या संचयन कार्याने तयार झालेले टेकडीसारखे भूस्वरूप. याचा आकार चहाच्या उपड्या चमच्यासारखा लांबटगोल एका बाजूला निमुळता असतो. ड्रमलिन हिमनदांनी वाहून आणलेल्या रेताड गाळाने निर्माण झालेल्या असतात व त्यांचा मोठा आस हिमनदांच्या वाहण्याच्या दिशेत असतो. त्यांचा उतार सुरुवातीच्या बाजूला काहीसा तीव्र असून दुसऱ्या बाजूला मंद असतो. त्या प्रथम रुंद व नंतर हळूहळू निमुळत्या होत जातात. या सामान्यपणे अंत्य–हिमोढाच्या पाठीमागे आढळतात. ज्या वेळी पर्वतीय भागातील हिमनद मैदानात उतरल्यामुळे पसरतो, त्या वेळी त्यातील हिमसंचयाची जाडी कमी होते व त्यामुळे हिमनदाची वाहकशक्ती कमी होते. हिमनदाच्या तळाशी असलेला गाळ व जमीन यांमधील घर्षणामुळे गाळ साचण्यास सुरुवात होते. संचयित द्रव्याच्या किंवा एखाद्या क्षुल्लकशा अडथळ्यामुळे त्यावर गाळाची पुटावर पुटे गिलाव्याप्रमाणे साचतात आणि

सलव्हनजवळील ड्रमलिन, विस्कॉन्सिन, अमेरिका

ड्रमलिन निर्माण होतात. लहानात लहान ड्रमलिन लहानशा ढिगाएवढ्या असून मोठ्यात मोठ्या ड्रमलिनांची लांबी २ किमी. अगर जास्त आणि उंची १०० मी. इतकी असू शकते. ड्रमलिनांच्या रांगा एकमेकींना समांतर असतात.

उत्तर आयर्लंड, स्कॉटलंडमधील मिडलँडचा भाग, इंग्लंडचा उत्तर भाग, दक्षिण जर्मनी, स्वित्झर्लंड इ. यूरोपीय देशांत ड्रमलिन आढळतात. उत्तर अमेरिकेत त्या पंचमहासरोवरांच्या आसपासच्या भागांत आढळतात

काही ड्रमलिनांचा गाभा खडकांचा असून संचयित द्रव्याचा थर पातळ असतो. त्यांना भ्रामक ड्रमलिन म्हणतात.

फडके, वि. शं.