नीतेरॉय : ब्राझीलमधील रीओ दे जानेरो राज्याची राजधानी. लोकसंख्या २,९१,९७० (१९७०). हे रीओ दे जानेरो शहराच्या समोर ग्वनबार उपसागराच्या आग्नेय किनाऱ्यावर वसले असून रीओ दे जानेरोचे उपनगर असाही याचा उल्लेख केला जातो. १८३५ मध्ये यास राजधानीचा दर्जा, तर १८३६ मध्ये शहराचा दर्जा आणि सध्याचे नाव मिळाले. हे उद्योगधंद्यांचे व वाहतुकीचे केंद्र असून जहाजबांधणी व दुरुस्ती, लाकडी सामान, आगपेट्या, कापड, साखर, काच, अन्नप्रक्रिया, औषधे, रसायने, तंबाखू, मादक पेये, सिमेंट, धातुसामान इत्यादींचे कारखाने येथे आहेत. हे लोहमार्गाचे अंतिम स्थानक असून येथून रीओ दे जानेरोशी रस्ते, लोहमार्ग व फेरी यांनी वाहतूक चालते. सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून इंडियनांची वसती असलेल्या या शहराचे नावही इंडियन संज्ञा ‘नीतेरॉय’ (गुप्त पाणी) यावरून पडले. १९६१ मध्ये स्थापन झालेले फ्लूमिनेन्स विद्यापीठ येथे असून औषधनिर्मिती, दंतशास्त्र, पशुवैद्यकीय औषध, वाणिज्य इत्यादींच्या उच्च शिक्षणाच्या सोयीही येथे उपलब्ध आहेत. आसपासची विस्तीर्ण पुळणे व राहण्याच्या उत्तम सुखसोयी यांबद्दल हे प्रसिद्ध आहे.

शहाणे, मो. ज्ञा.