महाराष्ट्र राज्य :

शिवछत्रपतींचा पुतळा, गेटवे ऑफ इंडिया, मुंबई

भारतीय संघराज्यातील २२ राज्यां पैकी एक प्रमुख राज्य. क्षेत्रफळ ३,०७,७६२ चौ. किमी. लोकसंख्या ६,२७,१५,३०० (१९८१). क्षेत्रफळाच्या बाबतीत मध्य प्रदेश व राजस्थान राज्यांखालोखाल आणि लोकसंख्येच्या बाबतीत उत्तर प्रदेश व बिहार या राज्याखालोखाल महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. भारताच्या ९.३७% क्षेत्रफळ महाराष्ट्राने व्यापले असून लोकसंख्याही देशाच्या एकूण लोकसंख्येच्या ९.१६% आहे. अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे १५° ४८’ उ. ते २२° ६’ उ. व ७२° ३६’ पू. ते ८०° ५४’ पू. यादरम्यान आहे. भारतीय द्वीपकल्पाचा बराच मोठा भाग महाराष्टाने व्यापलेला आहे. राज्याच्या पश्चिमेस अरबी   समुद्र, वायव्येस गुजरात राज्य आणि दाद्रा व नगरहवेली हा केंद्रशासित प्रदेश, उत्तरेस व पूर्वेस मध्य प्रदेश, अग्नेयीस आंध्र प्रदेश, दक्षिणेस कर्नाटक ही राज्ये व गोवा केंद्रशासित प्रदेश आहे. राज्याचा आकार अनियमित असला, तरी तो साधारणपणे काटकोन त्रिकोणी असल्याचे दिसते. पश्चिमेकडील उत्तर-दक्षिण असा ७२० किमी. लांबीचा समुद्रकिनारा म्हणजे काटकोन त्रिकोणाचा पाया असून येथून पूर्वेस ८०० किमी. अंतरावरील राज्याचे पूर्व टोक म्हणजे या काटकोन त्रिकोणाचा शिरोबिंदू होय.

महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी झाली. ⇨मुंबई (लोकसंख्या ८२,२७,३३३-१९८१) ही राज्याची राजधानी असून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ⇨नागपूर शहरी भरते. देशातील कृषी व औद्योगिक उत्पादन, व्यापार, वाहतूक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रगती इ. बाबतींत महाराष्ट्र राज्य अग्रेसर समजले जाते.

चौधरी, वसंत

या नोंदीत महाराष्ट्र राज्यासंबंधीची माहिती पुढील प्रमुख विषयानुक्रमाने दिली आहे व आवश्यक तेथे उप आणि उपउपविषय अंतर्भूत केले आहेत : (१) ‘महाराष्ट्र’ या नावाची व्युत्पत्ती व अर्थ, (२) भूवैज्ञानिक इतिहास, (३) भूवर्णन, (४) मृदा, (५) नैसर्गिक साधनसंपत्ती, (६) जलवायुमान, (७) वनश्री, (८) प्राणिजात, (९) इतिहास, (१०) राजकीय स्थिती, (११) विधी व न्यायव्यवस्था, (१२) आर्थिक स्थिती, (१३) लोक व समाजजीवन, (१४) शिक्षण, (१५) भाषा व साहित्य, (१६) वृत्तपत्रसृष्टी, (१७) ग्रंथालय, (१८) ग्रंथप्रकाशन, (१९) कला, (२०) हस्तव्यवसाय, (२१) संग्रहालये, (२२) रंगभूमी, (२३) चित्रपट, (२४) खेळ व मनोरंजन आणि (२५) महत्त्वाची स्थळे.

वरील प्रमुख विषयांच्या विवेचनात अनेक ठिकाणी बाणांकने करून,तसेच चौकटी कंसांतील पूरक संदर्भ देऊन महाराष्ट्रासंबंधी विश्वकोशाच्या एकूण १७ खंडांत, स्वतंत्र नोंदींच्या रुपाने आलेले विषय दाखविले आहेत. ‘भारत’ आणि ‘महाराष्ट्र’ यासंबंधीची जास्तीतजास्त सर्वांगीण व अद्ययावत् माहिती आवश्यक त्या त्या नोंदीखाली देण्याचाविश्वकोशात प्रयत्न केलेला आहे. पिके, उद्योगधंदे, शक्तिसाधने, नैसर्गिक साधनसंपत्ती, ललित कला, रंगभूमी, चित्रपट, खेळ यांसारख्या विषयांवरील स्वतंत्र नोंदींतून, कधीकधी स्वतंत्र उपविषय करूनही, महाराष्ट्रासंबंधी अधिक माहिती दिली आहे. एवढेच नव्हे, तर भारतातील इतर राज्यांच्या तुलनेने ‘महाराष्ट्र राज्या’ वरील नोंद अधिक विस्ताराने दिलेली आहे.

जिज्ञासू वाचकाला महाराष्ट्रासंबंधी अधिक माहिती विश्वकोशातील पुढी निर्देशिलेल्या विषयांच्या इतर नोंदींतूनही मिळू शकेल.

(१) महाराष्ट्रातील सर्व जिल्हे, जिल्ह्यांची प्रमुख ठिकाणे तसेच ऐतिहासिक-राजकीय-सांस्कृतिक-औद्योगिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाची स्थळे कोकण, मराठवाडा, विदर्भ इ. विभाग महत्त्वाच्या नद्या, पर्वत, शिखरे, सरोवरे, धरणे इत्यादी.

(२) सातवाहन, राष्ट्रकूट, यादव, बहमनी, मराठा इत्यादींच्या राजवटी मराठ्यांची युद्धपद्धती, भोसले घराणे, पेशवे, खर्ड्याची लढाई यांसारखे इतिहासदृष्ट्या महत्त्वाचे विषय छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक इ. महत्त्वाच्या व्यक्ती मराठा रेजिमेंट, महार रेजिमेंट, कोल्हापूर संस्थान, इतिहास-प्रसिद्ध किल्ले व पुरातत्त्वीय उत्खनन स्थळे (उदा., तेर, दायमाबाद, नेवासे इ.) इत्यादी.


(३) महाराष्ट्र राज्य शासनाचे महत्त्वाचे निगम किंवा महामंडळे औद्योगिक क्षेत्रातील किर्लोस्कर घराणे महत्त्वाचे प्रकल्प इत्यादी.

(४) महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आदिवासी जमाती धार्मिक पंथोपपंथ, महत्त्वाचे सण, उत्सव, यात्रा, देवदेवता सत्यशोधक समाज, प्रार्थनासमाज, मुस्लिम सत्यशोधक समाज इ. सामाजिक चळवळी.

(५) महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठे महत्त्वाच्या शैक्षणिक व संशोधनपर संस्था (गोखले अर्थशास्त्र संस्था, भांडारकर प्राच्याविद्या संशोधन मंदिर) इत्यादी.

(६) याच खंडात ‘मराठी साहित्य’ या विषयावर स्वतंत्र विस्तृत नोंद आहे, त्यामुळे महाराष्ट्रावरील या नोंदीत हा विषय पुनरावृत्त करण्याचे टाळले आहे. कोकणी आणि हिंदी या भाषांतील महाराष्ट्रातील साहित्यनिर्मिती थोडक्यात दिली आहे. महाराष्ट्रातील भाषा हाही विषय थोडक्यात दिला आहे. महत्त्वाचे मराठी साहित्यिक, वैशिष्ट्यपूर्ण साहित्यप्रकार-उदा., पोवाडा, भारूड, लावणी, बखरमहानुभाव, वारकरी इ. महत्त्वाचे संप्रदाय, मराठी साहित्यसंमेलने इत्यादींवर अकारविल्हे स्वतंत्र नोंदी आहेत.

(७) नाट्यसंगीत, कीर्तन, भजन यांसारखे संगीतप्रकार दख्खनी कला अजिंठा, वेरूळ, कार्ले-भाजे इ. लेणी हेमाडपंती वास्तुशैली संगीत-नाट्य-चित्रपट क्षेत्रांतील प्रख्यात व्यक्ती दशावतारी खेळ, तमाशा, बहुरूप खेळ इ. लोकरंजनप्रकार प्रभात फिल्म कंपनी, महाराष्ट्र फिल्म कंपनी इ. चित्रपटसृष्टीतील संस्था.

(८) मल्लखांब, लेझीम, कबड्डी, खोखो, गंजीफा इ. खेळांचे प्रकार, शिवछत्रपती पुरस्कार इत्यादी.

महाराष्ट्रासंबंधी सर्वांगीण माहिती मिळण्यासाठी प्रस्तुत नोंदीबरोबरच स्थूलमानाने वर दिग्दर्शित केलेल्या इतरही अनेक नोंदीचा अभ्यासू वाचकाला उपयोग होऊ शकेल.

व्युत्पत्ती व अर्थ 

‘महाराष्ट्र’ या शब्दाची व्युत्पत्ती आणि त्याचा अर्थ यांबद्दल विद्वानांत एकमत नाही. प्राचीन भारतीय वाङ्मयामध्ये दक्षिणापथ या संज्ञेचा वापर जास्त आढळून येत असून नर्मदेचा दक्षिण तीर ते कन्याकुमारी एवढ्या मोठ्या भागाचा दक्षिणापथ असा निर्देश केला जात असे. सातवाहनांच्या शिलालेखांत दक्षिणापथाचा उल्लेख येतो. यावरून असे दिसते की, महाराष्ट्र या संज्ञेचा वापर नंतरच्या काळामध्ये सुरू झाला असावा. इसवी सनाच्या पाचव्या-सहाव्या शतकांमध्ये महाराष्ट्र या संज्ञेचा आढळ पहिल्यांदा दिसून येतो. ‘महाराठी   ’ या शब्दाचा वापर सातवाहनांच्या लेखांत, त्याचप्रमाणे त्यांच्या उत्तरकाळातील काही नाण्यांवर आढळून येतो. महावंस या बौद्धग्रंथात ‘महारठ्ठ’ या शब्दाचा उल्लेख आहे. या ग्रंथातील निर्देशानुसार बौद्ध भिक्षू मोगली पुत्र तिस्स याने इ.स.पू. तिसऱ्या शतकात महिसमंडळ, बनवासी, अपरांतक, महारठ्ठ येथे बौद्ध धर्मोप्रदेशक पाठविले होते. यावरून महारठ्ठ हे नाव इ.स.पू. तिसऱ्या शतकापासून रूढ असावे. रविकीर्तीच्या लेखात चालुक्यवंशीय दुसरा पुलकेशी हा तीन महाराष्ट्रकांवर राज्य करीत होता, असे उल्लेखिलेले आहे. ऐहोळे शिलालेखात (इ.स. ६३४) उल्लेखिलेली ही तीन महाराष्ट्रके कोणती याबद्दल निश्चित उलगडा होत नाही. काही विद्वानांच्या मते विदर्भ, ⇨कुंतल आणि महाराष्ट्र अशी तीन वेगवेगळी महाराष्ट्रके असू शकतील. या तीन भागांपैकी विदर्भाचा उल्लेख सर्वात  प्राचीन आहे. रेय ब्राह्मणया ग्रंथानुसार जंगले आणि भयानक कुत्र्यांसाठी विदर्भ प्रसिद्ध होता. विदर्भाचे यानंतरचे उल्लेख बृहदारण्यक आणि जैमिनीयोपनिषद ब्राह्मण यांमध्ये आलेले आहेत. जैन, बौद्ध आणि ब्राह्मणी वाङ्मयांत, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील प्राचीन उत्कीर्ण लेखांत ऋषिक, अश्मक, दण्डक, कुंतल, ⇨अपरांत आणि मूलक इ. विभागांचा दक्षिणापथाच्या संदर्भात उल्लेख आलेला आहे. विदर्भात नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ या सध्याच्या जिल्ह्यांचा समावेश होत होता. अपरांतामध्ये सर्वसाधारणपणे सध्याच्या उत्तर कोकण आणि दक्षिण गुजरात यांचा समावेश होता, तर राहिलेले इतर विभाग गोदावरीच्या खोऱ्यामध्ये सर्वसाधारणपणे सामावलेले होते. [⟶कोकण, मराठवाडा, विदर्भ].

देव, शां. भा.

जॉन विल्सन यांनी मोल्सवर्थच्या कोशात महाराष्ट्र म्हणजे महार+राष्ट्र = महारांचे राष्ट्र अशी एक लोकवाचक व्युत्पत्ती सुचविली आहे. महाराष्ट्रात महार वस्ती पुष्कळ असल्याने हे नाव पडले असावे. ओपर्ट हेही ह्या व्युत्पत्तीशी सहमत दिसतात. मात्र येथे महार शब्दाच्या व्युत्पत्तीचे विश्लेषण दिलेले नाही. लोकांच्या नावावरून प्रदेशास नाव दिल्याची अनेक उदाहरणे आहेत. टॉलेमीने महारांना ‘परवारी’ असे म्हटले आहे. ते आर्य संस्कृतीच्या कक्षेबाहेरचे असून तेसुद्धा मराठ्यांना आर्य म्हणून ओळखतात. आर्यला कानडीमध्ये ‘आरे’ असे संबोधले जाई. यावरून ‘अरिअके’ असे या प्रदेशाला म्हटले असावे. एरियन याने आपल्या इंडिका ग्रंथात मराठ्यांच्या प्रदेशास अरियके असे संबोधले आहे.


ओपर्ट यांनी ‘भारतवर्षातील मूळ रहिवासी’ या शीर्षकार्थाच्या ग्रंथात महाराष्ट्रालाच मल्लराष्ट्र (मल्ल लोकांचे राष्ट्र) असे म्हटले आहे. मल्ल म्हणजेच मार आणि मार लोकांनाच म्हार म्हणतात. मार या शब्दाचे हळूहळू म्हार-महार असे रूप बनले असावे. मराठीत ही दोन्ही रूपे आढळतात. तेव्हा मल्लराष्ट्र व महाराष्ट्र हे एकाच अर्थाचे दोन शब्द प्रचारात होते. महाराष्ट्रात आज तरी मल्ल लोकांचा संदर्भ लागतनाही.मात्र पूर्वी मल्ल जातीचे लोक महाराष्ट्राच्या आसपास असावेत. वि. का. राजवाडे यांनी नमूद केलेल्या मळवली, मालेगाव, मल्याण, मळसर, मळगाव, मलांजन, मळखेडे, मळवाण, मलोणी या मल्लराष्ट्र जातिसंबद्ध गावांचा याला आधार मिळतो.

महाराष्ट्र शब्दाचा उल्लेख वररुचीच्या प्राकृतप्रकाश नावाच्या व्याकरण ग्रंथात आणि वात्स्यायन, भरतमुनी यांच्या ग्रंथामध्येही आलेला आहे. मार्कंडेयपुराण, वायुपुराण व ब्रह्मपुराणातही महाराष्ट्र नाव सापडते. श्रीधर वर्म्याची सेनापती सत्यनाग याच्या इ.स. ३६५ मधील शिलालेखात त्याने स्वतःला महाराष्ट्र-प्रमुख असे म्हटले असून महाराष्ट्र देशाचा उल्लेख असलेला हा आद्य कोरीव लेख सागर जिल्ह्यातील एरण गावी आहे. वराहमिहिर, दंडी व राजशेखर यांच्या संस्कृत ग्रंथांमध्येही महाराष्ट्राचा उल्लेख अनेकदा आलेला दिसतो.

चि. वि. वैद्य यांच्या मते इ. स. पू. ६०० च्या सुमारास आर्य लोक दक्षिणेत आले आणि गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र, पांडुराष्ट्र इ. वसाहती करून स्थायिक झाले. अशोकाच्या शिलालेखात जो ‘रास्टिक’ लोकांचा उल्लेख आढळतो, ते हेच लोक होत. आंध्रभृत्य म्हणजेच सातवाहन यांच्या साम्राज्यात ते एका सत्तेखाली येऊन त्यांचे एक मोठे राष्ट्र निर्माण झाले व या मोठ्या राष्ट्रालाच महाराष्ट्र असे नाव पडले.

अशोकाच्या शिलालेखात दक्षिणेतील रट्ट लोकांनाच रास्टिक असे म्हटले असून त्याचेच संस्कृत रूप ‘राष्ट्रिक’ झाले, असे रा. गो. भांडारकर यांनी आपल्या अर्ली हिस्टरी ऑफ द डेक्कन या दख्खनच्या प्राचीन इतिहासविषयक ग्रंथात म्हटले आहे. अशोकाच्या शिलालेखात एके ठिकाणी ‘महाभोज’ असा उल्लेख आहे. जसे भोज लोक स्वतःला महाभोज म्हणवून घेत, तसेच या प्रदेशात रहाणाऱ्या राष्ट्रिकांनी स्वतःला महाराष्ट्रिक किंवा ‘महारट्ट’ असे म्हणवून घेतले आणि ते ज्या देशात रहात, त्या देशाला महारट्ट व संस्कृतमध्ये महाराष्ट्र असे नाव पडले.

राजारामशास्त्री भागवत यांच्या मते संस्कृत नाटकांमध्ये येणारा ‘मरहठ्ठ’ हा जनवाचक शब्द ‘मऱ्हाठा’ शब्दाची प्रकृती दिसतो. ‘मऱ्हाठा’ म्हणजे ‘मरता तब हटता’ (मरतो तेव्हा हटतो) अशी त्यांनी मरहठ्ठ शब्दाची लोकगुणवाचक व्यत्पत्ती सांगितली आहे. त्यांच्या मते मराठ्यांचा वीरश्री संदर्भ घेतला, तर ही व्युत्पत्ती खरी वाटते. परंतु मराठ्यांचा गनिमी कावा लक्षात घेता, ही व्युत्पत्ती वस्तुस्थितीला धरू न आहे असे वाटत नाही. वि. का. राजवाडे हे आपल्या महाराष्ट्राचा वसाहतकाल या प्रबंधात महाराष्ट्र शब्दाची व्युत्पत्ती रट्ट शब्दावरून झाल्याचे सुचवितात. मात्र रट्ट लोकांविषयी ते कोण, कोठले, त्यांचा वर्ण, जाती यांबद्दल कसलीच माहिती मिळत नाही. रट्ट या शब्दाचे संस्कृत रूप राष्ट्रिक म्हणजे राष्ट्रात अधिकाराचे काम करणारा मनुष्य. वर्णाने क्षत्रिय व पिढीजात पेशाने देशाधिकारी असा या राष्ट्रिकांचा किंवा रट्टांचा दर्जा असे. देसाई−देशमुखांच्याहून थोर अधिकाऱ्याला शे-दीडशे वर्षांपूर्वी सरदेसाई−सरदेशमुख असे म्हणत. तसेच हजार-बाराशे वर्षापूर्वी राष्ट्रिकाहून उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांना महाराष्ट्रिक किंवा महारट्ट म्हणत. मोठा किंवा महत्तर प्रांत (मोठे राष्ट्र) म्हणजे महाराष्ट्र. या महत्तर राष्ट्रावरील (प्रांतावरील) जो अधिकारी तो महाराष्ट्रिक. महाराष्ट्रिकचा अपभ्रंश महारट्ट व महारट्टचा अपभ्रंश मऱ्हाट. अशा प्रकारे राजवाडे यांनी रट्ट, महारट्ट, राष्ट्रिक व महाराष्ट्रिक यांपासून महाराष्ट्र आणि मराठे असा संदर्भ दर्शविला आहे. परंतु रट्ट लोक उत्तरेकडून दक्षिणेकडे वसाहतीस आल्याचा सबळ पुरावा मिळत नाही.

ज्ञानकोशकार केतकर ‘महाराष्ट्र’ या शब्दाची व्युत्पत्ती सांगताना महार आणि रट्ट यांच्या एकीकरणाची कल्पना मांडतात. त्यावरून केतकरांनाही ही लोकवाचक संज्ञा मान्य असल्याचे दिसते.

म. म. पां. वा. काणे यांच्या मते ‘महान राष्ट्र’ यावरून महाराष्ट्र या शब्दाची व्युत्पत्ती झाली आहे. महाराष्ट्र हे नाव कोणत्याही वंशावरून किंवा जातीवरून पडलेले नसून ते देशाच्या विस्तारावरून पडले असावे. प्राचीन काळापासून दख्खनच्या मधोमध एक प्रचंड अरण्य होते. त्याचा महाकांतार, महाटवि, दण्डकारण्य असा नामोल्लेख प्राचीन ग्रंथांत आढळतो. परंतु आर्यानी हा जंगलभाग साफ करून तेथे सर्वत्र गावे, नगरे बसवून आर्य संस्कृतीचा विस्तार केला. अशा प्रकारे पूर्वीच्या महाकांतार किंवा महारण्याच्या ठिकाणी विस्तृत असे राष्ट्र झाल्याने त्याला महाराष्ट्र असे संबोधले जाऊ लागले. मात्र या परिवर्तनास अनेक शतके लोटली. साधारणपणे इ. स. पू. ३०० च्या सुमारास महाराष्ट्र हे नाव पडले असावे. तसेच प्राचीन काळी देशाच्या विस्तारावरून त्या प्रदेशाला तशी नावे पडल्याची उदाहरणेही मिळतात. ही व्युत्पत्ती अधिक ग्राह्य मानली जाते.

या प्रदेशाला महाराष्ट्र हे नाव पडण्यापूर्वी याचे विदर्भ, ⇨अश्मक, कुंतल, अपरांत, गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र, पांडुराष्ट्र असे घटक विभाग असून त्यांचे उल्लेख प्राचीन संस्कृत वाङ्मयात वारंवार आलेले आढळतात. बृहदारण्यकोपनिषद, रामायणमहाभारत यांतून विदर्भाचा उल्लेख अनेक वेळा आलेला आहे. गोदावरी नदीच्या तीरावरील प्रदेश तो अश्मक (राजधानी प्रतिष्ठान किंवा पैठण), कृष्णेच्या उगमाजवळचा अथवा त्याच्या पश्चिमेचा तो अपरांत म्हणजे कोकण, गोपराष्ट्र म्हणजे नासिकभोवतालचा प्रदेश व त्याच्या दक्षिणेचा प्रदेश तो मल्लराष्ट्र असे मानले जाते. या सर्व प्रदेशांत प्राकृत भाषा प्रचलित होऊन त्या सर्वांचा मिळून एक मोठा प्रदेश निर्माण झाला व त्यालाच महाराष्ट्र असे संबोधले जाऊ लागले, अशीही व्युत्पत्ती दिली जाते.


महाराष्ट्र-महारठ्ठ-रठ्ठ या नामचिकित्सेवरून या प्रदेशात ‘रट्ट’ लोकांनी मूळ वसाहत केली असे दिसते. येथील मूळ लोकांचे मूळ नाव मरहट्टे-मऱ्हाटे-मराठी असे असावे. ‘मरहट्ट’ हा शब्द कानडी असून ‘झाडीमंडळ’ असा प्रदेशवाचक एक अर्थ व झाडीमंडळातील ‘हट्टीजन’ (पशुपालन करणारे धनगर-गवळी) असा दुसरा लोकवाचक अर्थ होता.

‘महाराष्ट्र म्हणजे महंत राष्ट्र म्हणोन महाराष्ट्र’ असा उल्लेख महानुभावी ग्रंथकारांच्या आचारमहाभाष्यातही मिळतो.

चौधरी, वसंत

भूवैज्ञानिक इतिहास 

भारतीय उपखंडाचे जे तीन प्राकृतिक विभाग आहेत, त्यांपैकी द्वीपकल्प ह्या विभागात महाराष्ट्र राज्य येते. साहजिकच भूवैज्ञानिक संरचना, भूमिरूपविज्ञान (भूमिरुपांची वैशिष्ट्ये, उत्पत्ती व विकास ह्यांचे अध्ययन) व भूवैज्ञानिक इतिहास ह्या संबंधात भारतीय द्वीपकल्पाची असणारी सारी वैशिष्ट्ये महाराष्ट्रातसुद्धा दिसून येतात [⟶भारत (भूवैज्ञानिक इतिहास)]. तथापि महाराष्ट्राचा बराचसा भूभाग हा ज्वालामुखींपासून बनलेल्या बेसाल्टी लाव्ह्यांच्या थरांनी-काळ्या पत्थरांनी-व्यापलेला असून ते महाराष्ट्राचे खास भूवैज्ञानिक वैशिष्ट्य आहे. निरनिराळ्या भूवैज्ञानिक कालखंडांमद्ये निर्माण झालेले खडक कोठे कोठे सापडतात व त्यांच्या अभ्यासातून कोणकोणते भूवैज्ञानिक निष्कर्ष निघतात, ह्याचा अभ्यास म्हणजेच एखाद्या भागाचा भूवैज्ञानिक इतिहास होय. आर्कीयन (आर्ष) महाकल्पात तयार झालेले खडक महाराष्ट्रात फारच थोड्या क्षेत्रात सापडतात. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दक्षिणेकडील अगदी थोडासा भाग ह्या महाकल्पात निर्माण झालेल्या खडकांनी व्यापलेले असून नागपूर−भंडारा जिल्ह्यांमध्येही काही भागांत आर्कीयन काळातील खडक सापडतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडणारे खडक हे धारवाडी संघाच्या गोव्यामध्ये आढळणाऱ्या कॅसलरॉक पट्ट्याचे उत्तरेकडील टोक असूनअलीकडेच त्यांना ‘बांदा माला’ असे नाव देण्यात आले आहे, तर विदर्भातील नागपूर-भंडारा भागामध्ये सापडणारे खडक मध्य प्रदेशातील चिल्पी घाट पट्ट्याचा पश्चिमेकडील विस्तार आहे. याचे महाराष्ट्रामध्ये आल्यावर विभाजन होते व नागपूरकडील पट्ट्यास ‘सौसर माला’, तर भंडाऱ्याकडील पट्ट्यास ‘साकोली माला’ असे नाव आहे. बांदा, सौसर आणि साकोली या मालांमध्ये रुपांतरित (दाब व तापमान यांमुळे बदल घडून आलेले) खडक सापडतात. यांमध्ये मुख्यत्वेकरून फायलाइट, क्वॉर्ट्झाइट, अभ्रकी सुमाजा (सहज भंगणारा खडक) इ. खडकांचा समावेश आहे. मुळातले अवसादी (गाळाचे) खडक सागरी क्षेत्रात तयार झालेले असल्याने आर्कीयन कालखंडातील सागरी क्षेत्राचा विस्तार कोठपर्यंत झाला असावा, ही कल्पना येण्यास ह्या खडकांचा उपयोग होतो. या खडकांची निर्मिती होताना भूकवच आजच्याइतके जाड नव्हते त्यामुळे ह्या अवसादी खडकांमध्ये अनेक वेळा लाव्ह्याचे अंतःस्तरण झाले (थरांमध्ये थर तयार झाले). अवसादी खडकांचे रूपांतर होताना लाव्ह्यापासून निर्माण झालेल्या खडकांचेही रूपांतरण होऊन मेटॅडोलेराइट, अँफिबोलाइट इ. खडकांची निर्मिती झाली. हे खडक शेवटी गिरिजनक (पर्वतनिर्मितीच्या) हालचालींमुळे उचलले जाऊन त्यांचे घड्यांचे पर्वत बनले व त्यांचे सागरी क्षेत्रातून जमिनीत परिवर्तन झाले पण ह्याचमुळे त्यांची रचना अतिशय गुंतागुंतीची झाली व त्यांत शिलारसाची अंतर्वेशने (घुसण्याच्या क्रिया) होऊन ग्रॅनाइट, गॅब्रो इ. अग्नज खडकांची निर्मिती झाली. बांदा, सौसर व साकोली मालांमधील खडकांमध्ये लोह व मँगॅनीज ह्यांच्या धातुकांचे (कच्च्या रुपातील धातूंचे) साठे सापडतात. [⟶आर्कीयन धारवाडी संघ].

यवतमाळ जिल्ह्याच्या आग्नेय भागात व नांदेड जिल्ह्याच्या पूर्व भागामध्येही ह्याच कालखंडामध्ये तयार झालेले ग्रॅनाइट व पट्टिताश्म अस्तित्वात आहेत.

सुपुराकल्पामध्ये [आर्कीयननंतर ते सु. ६० कोटी वर्षांपूर्वीपर्यंतच्या काळामध्ये ⟶ अल्गाँक्वियन] तयार झालेले खडकही असेच अगदी फार लहान क्षेत्रात आढळतात. कोल्हापूर जिल्ह्याच्या राधानगरी भागात व फोंडा घाट भागात पिंडाश्म, वालुकाश्म, शेल इ. खडकांनी बनलेला भाग आहे. कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यात आढळणाऱ्या कलादगी मालेचेच हे भाग आहेत. असे मानतात. आंध्र प्रदेशातील ⇨कडप्पा संघाचे हे खडक समतुल्य आहेत. ह्यांचेच समतुल्य खडक म्हणजे आंध्र प्रदेशातील पाखाल मालेचे खडक होत. पाखाल मालेच्या खडकांपैकी काहींनी आंध्र प्रदेशालगतच्या सिरोंचा भागातील थोडे क्षेत्र व्यापले आहे. यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यांत अगदी लहान क्षेत्रात चुनखडी, वालुकाश्म, शेल इ. खडकांनी बनलेल्या शैलसमूहास ‘सुलावाई माला’ असे नामाभिधान आहे. ही माला सुपुराकल्पातील पण ⇨विंध्य संघाशी समतुल्य आहे, असे मानतात पण हेही खडक पाखाल मालेतीलच असावेत, असा तर्क काही भूवैज्ञानिकांनी अलीकडच्या काळामध्ये केला आहे.

पुराजीव महाकल्पाच्या (सु. ६० ते २४.५ कोटी वर्षांपूर्वीच्या कालाच्या) फार मोठ्या कालखंडामध्ये भारतीय द्वीपकल्पामध्ये खडकांची निर्मिती फारशी झालीच नाही, असे म्हटले तरी चालेल. पर्मियन (सु. २७ ते २४.५ कोटी वर्षापूर्वीच्या) कालखंडाच्या सुरुवातीला एक फार मोठे हिमयुग होऊन गेले व त्या वेळच्या हिमनद्यांच्या तोंडाशी हिमानी अवसाद (गाळ) सापडतात. त्यांचे दृश्यांश (भूपृष्ठावर उघडे पडलेले भाग) इतरत्र खूप असले, तरी महाराष्ट्रात त्यांचा आढळ केवळ कामठी कोळसा क्षेत्राच्या परिसरातील फक्त तीन छोट्या दृश्यांशांच्या रुपात अपवादात्मक रीतीनेच होतो.


ह्या हिमानीअवसादांच्या निर्मितीनंतर काही विशिष्ट क्षेत्रात खचदऱ्या [खंदकासारख्या आकाराच्या दऱ्या ⟶ खचदरी] निर्माण होऊन त्यांत नादेय व सरोवरी (नदीमुळे व सरोवरात बनलेल्या) अवसादांचे शैलसमूह तयार झाले. हिमानी अवसाद व त्यानंतर येणारे हे नादेय आणि सरोवी अवसाद ह्यांच्या शैलसमूहास ⇨गोंडवनी संघ असे नाव आहे. गोंडवनी संघाची कालमर्यादा बरीच मोठी म्हणजे पर्मियनपासून पूर्व क्रिटेशसपर्यंत (सु. २७ ते १४ कोटी वर्षांपूर्वीपर्यंत) आहे. गोंडवनी संघाचे खडक महाराष्ट्रात नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांत असून त्यांमध्ये दगडी कोळशांचे साठे सापडतात.

मध्यजीव महाकल्पातील (सु. २३ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) क्रिटेशस कालखंड हा सागरी अतिक्रमणांचा कालखंड म्हणून प्रसिद्ध आहे. नर्मदा नदीच्या खोऱ्यात मध्य प्रदेश व गुजरात ह्या राज्यांत नर्मदेच्या उत्तरेस अशा अतिक्रमणांमुळे तयार झालेले सागरी खडक सापडतात व त्यास ⇨बाघ थर म्हणतात. बाघ थरांचे काही दृश्यांश नर्मदा नदीच्या दक्षिणेस धुळे जिल्ह्यातील अक्कलकुआ भागामध्ये सापडतात.

बाघ थरांच्या निर्मितीनंतर, परंतु क्रिटेशस कालखंडामध्येच विदर्भ आणि लगतच्या मध्य प्रदेशाच्या भागामध्ये विस्तृत अशा सपाट, मैदानी प्रदेशाची निर्मिती झाली व तेथे गोड्या पाण्यातील वालुकामय चुनखडकांची निर्मिती झाली. हे चुनखडक महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरात येथे आढळतात व त्यांना ⇨लॅमटा माला म्हणतात. लॅमेटा मालेच्या खडकांमध्ये जबलपूर व पिसदुरा (जि. चंद्रपूर) येथे सापडणाऱ्या डायनोसॉर या प्रचंड सरपटणाऱ्या प्राण्यांच्या जीवाश्मांचे (शिळारूप अवशेषांचे) साम्य ब्राझील व मॅलॅगॅसी येथे सापडणाऱ्या तत्कालीन खडकांच्या जीवाश्मांशी असल्याने ⇨खंडविप्लषाच्या कल्पनेस पुष्टी मिळते. लॅमेटा मालेतील खडकांचे दृश्यांश मात्र त्यावर येणाऱ्या दक्षिण ट्रॅपच्या भूभागाच्या सीमेपुरते मर्यादित आहेत.

मध्यजीव महाकल्पाच्या शेवटी शेवटी द्वीपकल्पातील जमिनीस लांबच लांब अशा भेगा पडून त्यांमधून बेसाल्टी लाव्ह्यांची उद्गिरणे झाली. लाव्ह्यांचे हे थर बहुधा क्षितिजसमांतर आहेत. पायऱ्या−पायऱ्यांप्रमाणे दिसणाऱ्या या खडकांना स्विडीश ट्रॅपन या शब्दावरून ट्रॅप हे नाव पडले आहे व हे भारतीय उपखंडाच्या दक्षिणेकडे सापडतात म्हणून त्यांना ⇨दक्षिण ट्रॅप अशी संज्ञा आहे. ह्याच थरांमध्ये कोठे कोठे अंतःस्तरित असे गोड्या पाण्यातील अवसादी खडक सापडतात. त्यांस ⇨अंतरा-ट्रॅपी थर असे म्हणतात. महाराष्ट्रात असे थर विदर्भात (टाकळी, नागपूरमधील सिताबर्डी टेकडी) व मुंबई शहरात आढळतात. या थरांमध्ये गोड्या पाण्यातील जीवसृष्टीचे अवशेष आढळतात. विदर्भातील अंतरा-ट्रॅपी थर हे क्रिटेशस कालखंडातील असून मुंबईतील अंतरा-ट्रॅपी थर पॅलिओसीन (सु. ६.५ ते ५.५ कोटी वर्षांपूर्वीच्या) कालातील आहेत. असे त्यांत आढळणाऱ्या जीवाश्मांवरून वाटते. त्यामुळे मध्यजीव महाकल्पाच्या शेवटी शेवटी सुरू झालेला भूवैज्ञानिक इतिहासातील हा लाव्ह्यांच्या उद्गिरणांचा अध्याय नवजीव महाकल्पाच्या (गेल्या सु. ६.५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळाच्या) आरंभीच्या काळापर्यंत सुरूच होता, असे म्हटले पाहिजे.

या काळाच्या शेवटी भारतीय द्वीपकल्पाच्या हवामानामध्ये झालेला बदल जांभ्या दगडांच्या निर्मितीस पोषक ठरला. जांभा दगड कोकण पट्टीत सर्वत्र, सातारा व कोल्हापूर ह्या जिल्ह्यांच्या पश्चिम भागांत विपुल सापडतो. [⟶जांभा−२].

महाराष्ट्रात अभिनव (गेल्या सु. ११ हजार वर्षांच्या) कालखंडामध्ये तापी, गोदावरी, पैनगंगा, वैनगंगा इ. नद्या व त्यांच्या काही उपनद्यांच्या पात्रांच्या दोन्ही बाजूंस जलोढाने (गाळाने) तयारझालेली जमीन आहे. ह्याच कालखंडामध्ये सागर किनारा उचलला गेल्याने कोकण किनाऱ्यावर सागरी चुनखडकांची निर्मिती झाली. चुनखडकाच्या या थरांची जाडी फारच कमी (५ मी. पेक्षाही कमी) आहे. ह्या चुनखडकांस कोकणातील लोक ‘करळ’ असे म्हणतात.

बोरकर, वि. द.

संदर्भ :

सर्वसाधारण :

1. Bhagwat, A. K. Ed., Maharashtra-A Profile (Vishnu Sakharam Khandekar Felicitation Volume), Kolhapur, 1977.

2. Director-General of Information and   Public Relations,Government of Maharashtra, Maharashtra 1975-76, Bombay, 1977.

3. Director of Publicity, Government of Maharashtra, Handbook of Maharashtra   State, Bombay, 1960.

4. The Directorate- General of Information and Public Relation,  Mahashtra State,  Maharashtra At A Glance, Bombay,   1982.

5. Government of India Tourist Division,  Bombay State. Delhi, 1958.

6. Government of India, Department of Tourism, Maharashtra and Gujrat Delhi, 1962.

7. Government of Maharshtr,  Portrait of Maharashtra, Bombay, 1970.

8. Rao, Binod,  Maharashtra Epitome of India, Bombay.

9. Tata Economic   Consultancy Services,  Second Maharashtra by 2005- A Study    of Futurology, Bombay, 1977.

१०. अग्निहोत्री, द. ह.  महाराष्ट्र संस्कृतीचे तात्त्विक अधिष्ठान पुणे,  १९७७.

११. कमतनूरकर, सरोजिनी, अनु.  महाराष्ट्र-जीवनप्रभात, मुंबई,१९७४.

१२. कर्वे,इरावती,महाराष्ट्र एक अभ्यास,पुणे, १९७१.

१३. कर्वे, चिं. ग. जोगळेकर,स. आ. जोशी, य. गो., संपा. महाराष्ट्र परिचय : अर्थात संयुक्त महाराष्ट्राचा ज्ञानकोश, २ खंड, पुणे, १९५४.

१४. कुलकर्णी, कृ. पा. महाराष्ट्र गाथा,मुंबई,१९६०.

१५. कुलकर्णी,भीमराव,संपा. अस्मिता महाराष्ट्राची,मुंबई, १९७१.

१६. केतकर,श्री. व्यं.  प्राचीन महाराष्ट्र,२ भाग, पुणे,१९३५,१९६३.

१७. खैरे,विश्र्वनाथ,द्रविड महाराष्ट्रपुणे, १९७७.

१८. गोखले, शरच्चं द्र खेर, भा. द. संपा. केसरी (वैचारिक संदर्भ आणि वाटचालशताब्दि ग्रंथ), पुणे, १९८१.

१९. जोशी, महादेवशास्त्री, महाराष्ट्राची धारातीर्थे, २. भाग, पुणे, १९७५.

२०. जोशी, शं. बा.संपा. जोशी, वसंत स. मऱ्हाटी संस्कृति काही समस्या, पुणे, १९८०.

२१. टिकेकर, श्री. रा. महाराष्ट्र, दिल्ली, १९७४.

२२.डिस्कळकर,द. व. महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास आणि संस्कृती, पुणे, १९६४.

२३. दांडेकर, विश्व नाथ पांडुरंग, महाराष्ट्र बडोदे,१९४७.

२४. पाध्ये,प्रभाकर टिकेकर, श्री. रा. आजकालचा महाराष्ट्र मुंबई, १९३५.

२५. पाध्ये, यशवंत, उद्योगी महाराष्ट्र, खंड १ मुंबई, १९६९.

२६. पेंडसे, लालजी, महाराष्ट्राचे महामन्थन, मुंबई, १९६५.

२७. पेंडसे, शं. दा. महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास, नागपूर, १९६५.

२८. प्रसिद्धी विभाग, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य परिचय, मुंबई, १९६०,

२९. प्रसिद्धी संचालनालय,महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र १९६१, मुंबई, १९७०.


३०. ब्रह्मे, सुलभा, संपा. ध. रा. गाडगीळ लेखसंग्रह, खंड १, पुणे, १९७४.

३१. भारत-दर्शन माला, महाराष्ट्र, दिल्ली,१९७३.

३२. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र १९७१-७२, मुंबई, १९७३.

३३. मुणगेकर, श्री. ग. संपा. परिवर्तनाचे प्रवाह महाराष्ट्र: १९३१ ते १९८१,पुणे, १९८२.

३४. मोटे, ह. वि. संपा विश्रब्ध शारदाखंड १ व २, मुंबई, १९७२-७५.

३५. शेख, एम्. ए. संपा. त्रिदल : (बॅ. पी. जी. पाटील व सौ. सुमतिबाई पाटील गौरव ग्रंथ), कोल्हापूर, १९८१.

३६. शेणोलीकर, ह. श्री. देशपांडे, प्र. न. महाराष्ट्र संस्कृती(घडण आणि विकास), कोल्हापूर, १९७२.

३७. सरदार, गं. बा. संपा. महाराष्ट्र जीवन, परंपरा, प्रगती आणि समस्या, २ खंड, पुणे,१९६०.

३८. सहस्त्रबुद्धे, पु .ग. महाराष्ट्र संस्कृति,पुणे, १९८०.

३९. सुराणा, पन्नालाल, आपला महाराष्ट्र, पुणे, १९६०.

४०. सोवनी, म. वि. महाराष्ट्राच्या कालमुद्रा, पुणे, १९८३.