अल्जीरिया : आकारमानाने आफ्रिकेतील दुसऱ्या क्रमांकाचे राष्ट्र. क्षेत्रफळ २३,८१,७४३ चौ. किमी. लोकसंख्या १,३५,४७,००० (१९७०). विस्तार दक्षिणोत्तर अंदाजे २,०९२ किमी. म्हणजे १९° ते ३७° उ. अक्षांश व पूर्वपश्चिम अंदाजे २,४१४ किमी. म्हणजे ८°३०’ प. ते १२°२०’ पू. रेखांश. देशाला उत्तरेकडे सु. १,०४६ किमी. लांब भूमध्यसागराची किनारपट्टी असून पूर्वेकडे ट्युनिशिया व लिबिया, पश्चिमेकडे मोरोक्को व दक्षिणेकडे नायजर, माली, मॉरिटेनिया व स्पॅनिश सहारा हे देश आहेत.
भूवर्णन : अल्जीरियाचे दोन स्पष्ट भाग पडतात : उत्तरेकडील ॲटलास पर्वताचा व दक्षिणेकडील विस्तीर्ण सहारा मरुभूमीचा. ॲटलासच्या रांगा किनाऱ्याला समांतर आहेत. त्यांत उत्तरेकडील टेल ॲटलास व त्याच्या शाखा आणि दक्षिणेकडील सहारा ॲटलास यांच्यामध्ये सु. १,००० मी. उंचीचा पठारी प्रदेश असून त्यात शॉट ॲश शर्गी, शॉट एल् गार्बी इ. अनेक खारी सरोवरे (प्लाया) आहेत. ती उन्हाळ्यात जवळजवळ कोरडीच. हा अंतर्देशीय जलोत्सारणाचा प्रदेश आहे. उत्तरेकडील टेल ॲटलासच्या दोन रांगा असून त्यांची जास्तीत जास्त उंची २,३०८ मी. आहे. यांचे दक्षिणोत्तर फाटे सागरतटापर्यंत गेलेले असून त्यांच्या दरम्यान अल्जिअर्सजवळ मीतीजा मैदानासारखे सुपीक मैदानी प्रदेश आहेत. येथेच बहुतेक शेतीची जमीन व ९० टक्क्यांपेक्षा अधिक लोकवस्ती आहे. सागरतट बहुधा खडकाळ असून त्यावर सोयीस्कर बंदरे थोडीच आहेत. सहारान ॲटलास हा तुटक तुटक रांगांचा बनलेला असून त्याचे सर्वोच्च शिखर जेबेल चेलिया (सु. २,३३० मी.) ईशान्य भागात आहे. याच्या भोवतीचा प्रदेश उंच पर्वतशिखरे आणि खोल दऱ्या ह्यांनी युक्त आहे. सहारा मरुभूमीत अहॅग्गर व टूरॉक पठारांसारख्या स्फटिक-खडकांच्या प्रदेशात अनेक निद्रिस्त ज्वालामुखी आहेत. शेष मरुभूमीत स्थानांतरणशील वाळूच्या टेकड्या व ‘वाड्या’ आहेत. अल्जीरियातील मुख्य नदी शेलीफ (६९० किमी.) व आणखी काही नद्या पठारी भागात उगम पावून पर्वतातून वाट काढून भूमध्यसमुद्राला जाऊन मिळतात. त्यांना फक्त हिवाळ्यातच भरपूर पाणी असते. उन्हाळ्यात त्या जवळजवळ कोरड्या पडतात. सहारातील नद्या स्वल्पायू व आंतरवाहिनी आहेत. पावसाचे दुर्भिक्ष्य आणि सच्छिद्र खडक यांमुळे पृष्ठभागावरून वाहणारे प्रवाह क्वचितच दिसतात. चुनखडकांच्या पठारी भागात काही ठिकाणी पृष्ठभागाखालील थरात पाणी आढळते.
अल्जीरिया खनिजसंपन्न असून फॉस्फरसविरहित लोखंड हे टेल व टींडूफ भागात, फॉस्फेट हे तेबेस पर्वत व इतरत्र आणि तेलखाणी एदजेले, हासी मसाउद, इलगासी, एनजेफ्त व मसीला येथे आहेत. नैसर्गिक वायूचेही प्रचंड साठे सापडले आहेत. याशिवाय शिसे, जास्त, तांबे, पारा, चांदी, अँटिमनी यांची खनिजे व संगमवरी दगड येथे सापडतात.
भूमध्यसागरी हवामान असलेल्या उत्तर तटावर उन्हाळ्यात २६·७° से. व हिवाळ्यात १०°-१२° से. तपमान असते. अंतर्भागात हीच सरासरी अनुक्रमे २६·७° से. व ३·९° से. ते ६·१° से. आहे. पूर्वपश्चिम पसरलेल्या ॲटलास पर्वतामुळे भूमध्यसागरी हवामान अल्जीरियाच्या उत्तर भागापुरतेच मर्यादित राहते. ॲटलासच्या दक्षिणेकडिल सहारा प्रदेश अत्यंत विषम हवामानाचा आहे. तेथे दिवसाचे कमाल तपमान ५७·७°से. असले तरी वाळूचे तपमान ७६·६° से. पर्यंत असते. रात्र त्या मानाने खूपच थंड असते. हवेतील आर्द्रतेमुळे उन्हाळ्यातसुद्धा रात्री दव पडते. भूमध्यसागरावरील आवर्तापासून हिवाळ्यात पाऊस मिळतो. तटवर्ती भागात पाऊस जास्त पडतो व दक्षिणेकडे कमी कमी होतो. किनाऱ्यावरील अल्जिअर्स व बोन शहरांदरम्यान ७६·२ सेंमी. पेक्षा अधिक व ॲटलासच्या दक्षिणेकडील बिस्क्रा येथे १७·८ सेंमी. वार्षिक सरासरी पर्जन्यमान आहे. सहारामध्ये पाऊस जवळजवळ नाहीच. क्वचित पडणाऱ्या जोरदार पावसामुळे फार मोठ्या प्रमाणात माती वाहून जात असल्यामुळे एक समस्याच निर्माण झाली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला धुळीच्या ‘सिरोको’ उष्ण वाऱ्यांमुळे सहारासदृश उष्णता व शुष्कता निर्माण होते.
येथील नैसर्गिक वनस्पती आफ्रिका खंडातील वनस्पतींपेक्षा वेगळ्या प्रकारच्या व यूरोपातील वनस्पतींना जवळच्या आहेत. वनस्पती प्रामुख्याने जलाभावसहिष्णू असून बुचाची झाडे व सदाहरित ओक वेगवेगळ्या उंचीवर व पावसाच्या भागांत सापडतात. याशिवाय ऑलिव्ह, अलेप्पो पाइन, सीडार, आरगन, थूया, ज्यूनिपर, देवदार, माकी झुडुपे, पठारावर अल्फाल्फा गवत व सरोवरांच्या भागात क्षारप्रिय वनस्पती उगवतात. मरुभूमीत मरुज वनस्पती विरळ असल्या, तरी येथील खजूर वृक्ष लोकांचा जीवनाधार आहे. येथील हत्ती, वाघ व सिंह लुप्त झाले असून अस्वल, लांडगा, ससा, कोल्हा, माकड, डुक्कर, हरिण, तरस हे प्राणी, तसेच स्नाइप, प्लोव्हर, करकोचा, गरुड, गिधाड, ससाणा हे पक्षी व यूरोपीय माशांच्या जाती येथे सापडतात. प्राणी बहुविध असले तरी विरळच आहेत.
इतिहास : अल्जीरियाचा इतिहास म्हणजे क्रमाक्रमाचे कार्थेजियन, रोमन, बायझंटिन, व्हँडॉल, अरब, तुर्क व फ्रेंचांच्या आक्रमणांचा इतिहास आहे. इ.स.पू. बाराव्या शतकातील फिनिशियन आधिपत्यापासून हा इतिहास सुरू होतो. इ.स.पू. आठव्या शतकात कार्थेजची सत्ता आली त्यामुळे प्यूनिक भाषा व संस्कृतीचा परिणाम झाला. इ.स.पू. १४६ मध्ये रोमची अधिसत्ता सुरू झाली. त्यांनी रोमनांची आवक वाढवून आदिवासींशी लग्ने केली आणि आपली वस्ती दृढमूल केली. सु. ४०० वर्षांच्या रोमन काळात संपन्न शहरे, चांगले रस्ते, उत्कृष्ट साहित्य व कृषिविकास झाला. तथापि संपूर्ण अर्वाचीन अल्जीरियावर त्यांचे आधिपत्य नव्हते. दुसऱ्या शतकानंतर व्हँडॉल व त्यानंतर अल्पकाळ टिकलेल्या बायझंटिन साम्राज्यानंतर सातव्या शतकात अरबांचे आक्रमण झाले. त्यांच्यातील हिलाल व सालीम जातींनी शक्तीने व हिंसेने इस्लाम धर्म व अरबी भाषा यांचा येथे प्रसार केला. अरबांच्या अल्मोराविद व आल्मोहद या राजवंशांची कारकीर्द महत्त्वाची झाली परंतु पुढे आपसातील भांडणामुळे हे साम्राज्य शक्तिहीन झाले व याची परिणती अराजकता पसरण्यात झाली. सोळाव्या शतकात स्पेन, पोर्तुगाल व तुर्कस्तान यांच्यात साम्राज्यस्थापनेसाठी चुरस सुरू झाली. १५०९ व १५१० मध्ये ओरान व अल्जिअर्स अनुक्रमे स्पेनच्या व पोर्तुगालच्या ताब्यात गेल्यामुळे अल्जीरियनांनी तुर्कस्तानची मदत घेतली, पण याचे पर्यवसान पारतंत्र्यात झाले. अल्जीरिया तुर्कस्तानचे मांडलिक बनले व त्याला तुर्कस्तानला कर द्यावे लागले. याच्या मोबदल्यात तुर्कस्तानच्या सुलतानाने येथील प्रमुखाला ‘बेलीरबे’ ही उपाधी बहाल केली. याच काळात पेनान बेटाचा मुख्य भूमीशी संपर्क साधून आधुनिक अल्जियर्स बंदराची निर्मिती झाली. हे बंदर १८३० पर्यंत मुस्लिमांचे शक्तिशाली केंद्र होते. या काळात तुर्कस्तानच्या जुलमी शासनापासून स्वातंत्र्य मिळविण्याचे लोकांनी प्रयत्न केले. येथे असलेले तुर्कस्तानातील सैनिक हे खरे शासक असून त्यांनी देशाला बर्बर या समुद्री डाकू व ठगांचे केंद्र केले. हे बर्बर-टोळीवाले भूमध्यसमुद्रातून जा-ये करणाऱ्या ब्रिटिश, स्पॅनिश, फ्रेंच व इतर जहाजांना हैराण करीत. या चाचेगिरीवर उपाय म्हणून ब्रिटन व स्पेन ह्यांनी अल्जीरियावर आक्रमणे केली. परंतु ती असफल झाली. फ्रान्सने जून १८३० मध्ये ३७ हजार सैनिक आणून अवघ्या २१ दिवसांत अल्जीरियाचा कब्जा घेतला. अहमद बे व अबुल कादिर यांच्या नेतृत्वाखाली बराच काळ लढा चालल्यानंतर शेवटी १८४८ मध्ये समस्त देशावर आधिपत्य स्थापण्यात फ्रान्सला यश आले. फ्रेंचांनी येथे वसाहती करण्यास सुरुवात केली. १८५० ते ७१ पर्यंत काही कबायली लोकांनी व १८८१ आणि १९०१ मध्ये ओरान विभागातील लोकांनी फ्रेंचांविरुद्ध उठाव केला. परंतु तो टिकला नाही. या काळात फ्रेंचांनी अल्जीरियाच्या आर्थिक विकासाचे खूप प्रयत्न केले. पहिल्या महायुद्धात स्वातंत्र्याच्या हक्काची कल्पना उदयास आली व ती अमीर खालंदच्या १९२१ सालच्या स्वातंत्र्याच्या घोषणेत प्रगट झाली. अल्जीरियन राष्ट्रवादाच्या पुरस्काराला मेस्साली हाजची कामगार-संघटना, फेरहत अब्बास व फ्रेंच उदारमतवाद्यांच्या मागची जनशक्ती व उलेमांची संघटना ह्या तीन शक्तींची साथ होती. मेस्साली हाजच्या नेतृत्वाखाली १९२५ मध्ये स्वातंत्र्यासाठी राजकीय पक्षाची स्थापना झाली. या पक्षाने निरनिराळ्या नावांखाली विद्यार्थी-व कामगारसंघटना उभारल्या. शासनाकडून यांवर बंदी घालण्यात आल्यानंतर सैनिकी धर्तीवर कार्य करण्यात आले. १९३६ साली फेरहत अब्बासने दुसरा पक्ष स्थापला. दुसऱ्या महायुद्ध-काळात ब्रिटिश व अमेरिकन सैनिकांचे येथे तळ होते. द गॉलने अल्जिअर्स ही काही काळ फ्रेंच निर्वासित सरकारची राजधानी केली होती. महायुद्धानंतर लोकांनी पुन्हा स्वातंत्र्याची मागणी केली. १९४५ साली झालेल्या उठावाचा पराभव झाला. १९४६ साली दोन्ही पक्षांचे एकत्रीकरण होऊन या संयुक्त पक्षाने त्याच वर्षी राष्ट्रीय सभेसाठी झालेल्या निवडणुकीत १५ पैकी ५ जागा जिंकल्या. १९४७ साली फ्रेंचांना व मुसलमानांना समान अधिकार मिळाले, तरी स्वातंत्र्यसंग्राम चालूच होता. १९५० साली पोलिसांकरवी पक्षांना दडपून टाकण्यात आले. १९४७ साली बेनबेलाच्या नेतृत्वाखाली फ्रेंचांविरुद्ध सशस्त्र उठाव करण्याच्या उद्देशाने गुप्त संघटना उभारण्यात आली होती १९५० साली तिलाही दडपण्यात आले. यानंतरच्या काळात बरेच नेते कैरोला गेले व तेथे त्यांनी प्रतिसरकारची स्थापना केली. देशात नवयुवकांनी राष्ट्रीय मुक्ती आघाडी पक्ष स्थापन केला. मेस्साली हाजशिवाय सर्वजण या पक्षाला मिळाले. या मुक्ती आघाडीने गनिमी युद्ध पुकारले. १९५४ साली अल्जीरियात उठाव झाला परंतु तो दडपण्यात आला. १९५७ मध्ये अल्जीरियाच्या पाच नेत्यांना अटक झाली म्हणून पुन्हा उठाव झाला. १९५८ साली कैरो येथे स्वतंत्र अल्जीरियन सरकार स्थापन झाले. १९६१ मधील स्वयंनिर्णयाच्या प्रश्नाबाबत जनमतकौलात स्वातंत्र्यास अनुकूल मत स्पष्ट झाले असले तरी फ्रेंच लोकांच्या गुप्त संघटनांकडून घातपाती कृत्ये चालूच होती. या स्वातंत्र्यसंग्रामात कुटुंबामागे कमीतकमी एक तरी माणूस दगावला किंवा कैद झाला अगर धाकदपटशाला बळी पडला. अखेर राष्ट्रीय नेते व फ्रेंच सरकार यांमध्ये समझोता होऊन ३ जुलै १९६२ रोजी अल्जीरिया स्वतंत्र झाला. सप्टेंबर १९६२ मध्ये राष्ट्रीय सभेने फेरहत अब्बास यांना अध्यक्ष व बेनबेला यांना प्रधानमंत्री नेमले पण एक वर्षानंतरच पुन्हा जनमतकौल होऊन बेनबेला अध्यक्ष झाले. १९ जून १९६५ ला लष्करी क्रांती होऊन बेनबेलाचे सरकार पदच्युत झाले आणि क्रांतिकारी मंडळाकडून पूर्वीचे उपाध्यक्ष व संरक्षणमंत्री बोमेदानी प्रधानमंत्री झाले व नंतर अध्यक्ष झाले.
राजकीय स्थिती : अल्जीरिया लोकतंत्रीय गणराज्य असले तरी स्वातंत्र्यानंतरच्या अल्पकाळात तेथे स्थिर सरकार स्थापन झाले नाही. २६ सप्टेंबर १९६२ मध्ये शेकडा ८० टक्के लोकांनी विधानसभेचे १९६ सदस्य निवडून दिले. यांपैकी ५६ यूरोपीय होते. १९६३ मध्ये सार्वमताने मान्य झालेल्या संविधानानुसार अल्जीरिया हे लोकशाही प्रजासत्ताक अरब आफ्रिकेचा व अरब जगताचा भाग असून इस्लाम हा त्याचा अधिकृत धर्म व अरबी ही अधिकृत भाषा आहे प्रजासत्ताकाची मुख्य ध्येये राष्ट्रीय स्वातंत्र्याचा व ऐक्याचा सांभाळ आणि समाजवादी राज्याची रचना करणे आणि मानवी हक्कांचे संरक्षण करून शांततेसाठी झटणे अशी आहेत. ८ ऑक्टोबर १९६२ पासून अल्जीरिया हे संयुक्त राष्ट्रांचे सभासद झाले. राज्यकारभाराच्या सोयीसाठी १९५६ पासून देशाचे १५ विभाग, ८१ उपविभाग व १,५७८ कम्यून पाडण्यात आले आहेत. यांपैकी सहाराचे २ विभाग, ५ उपविभाग व ६३ कम्यून आहेत. अल्जिअर्स, कॉन्स्टँटीन व ओरान येथे अपील न्यायालये व प्रत्येक उपविभागात एक याप्रमाणे प्रथम श्रेणीची न्यायालये आहेत. यांशिवाय वाणिज्य- व शांति-न्यायालये असून त्यांना विस्तृत अधिकार आहेत. फ्रान्समधील संहितेचा आधार घेऊन दंडसंहिता निर्माण करण्यात आली आहे. देशातील सर्वोच्च न्यायालय म्हणजे, अपील उच्च न्यायालय व राज्यमंडळ ही होत. मुक्तिसेनेतून सैनिक भरती करून सेना उभारण्यात येत आहे. अल्जीरियाची सेना ६०,००० आहे. ईजिप्तकडून काही जहाजे व रशियाकडून मिग जेट विमाने घेऊन नौसेना व वायुसेना यांच्या उभारणीला सुरुवात झाली. ईजिप्त प्रशिक्षणाची सोय करीत आहे. कोणत्याही प्रकारच्या बाँबफेकी विमानांना प्रतिकार करण्याच्या सिद्धतेत आफ्रिकेत ईजिप्तनंतर अल्जीरियाचा क्रमांक लागतो.
आर्थिक स्थिती : अल्जीरियात पशुपालन व कृषी यांना महत्त्व आहे. देशातील २/३ लोकसंख्येचे उपजीविकेचे साधन जरी शेती असले, तरी देशाच्या एकूण उत्पन्नापैकी १/३ उत्पन्नच शेतीपासून मिळते. औद्योगिक उत्पादनापासून आणखी १/३ उत्पन्नाची भर पडते. अलीकडे खनिज तेल व नैसर्गिक वायू यांचे उत्पन्न महत्त्वाचे ठरत आहे. टेल ॲटलासच्या उत्तरेकडील भागात शेती व दक्षिणेकडे पशुपालन हे महत्त्वाचे उद्योग आहेत. एकूण जमिनीपैकी २·६ टक्के जमीन शेतीयोग्य असून ४ टक्के चराऊ व १·५ टक्के जंगलमय आहे. १९५७ साली देशाची अधिकांश उत्कृष्ट जमीन यूरोपीयांच्या ताब्यात होती. स्वातंत्र्यानंतर बरेच यूरोपीय जमीन सोडून गेले आहेत. शेतीची मुख्य समस्या मातीची धूप थांबविण्याची आहे. दर वर्षी एकरी १५ ते १८ घनमीटर माती जलविभाजक प्रदेशातून वाहून जाते व हे असेच चालू राहिले तर एका शतकात तेथून मातीचे आवरण नष्ट होण्याचा संभव आहे. यूरोपीय भागात शेती यांत्रिक व आधुनिक पद्धतीने व अरब भागात प्राचीन व निर्वाह-पद्धतीने करण्यात येत असे. मुख्य पिके गहू, बार्ली असून ओट, मका, बटाटे, तंबाखू, भाजी व ऑलिव्ह तेल यांचेही उत्पन्न महत्त्वाचे आहे. मद्य ही महत्त्वाची निर्यातवस्तू असून एके काळी याचे उत्पादन फ्रान्समधील एकूण उत्पादनाच्या १/३ ते १/२ होते. वाळवंटातील मरूद्यानात खजुराचे उत्पादन उल्लेखनीय आहे. अल्जीरियाच्या बहुतेक भागात पाण्याचा अभाव जाणवतो. १९५८ साली १३ बांध-योजना आखून सु. १,५५,००० हेक्टर जागा ओलीत करण्यात आली. पाण्याच्या सोयी उपलब्ध करून पठार व मरुभूमीत पशुपालन-उद्योगाला, विशेषेकरून दूधदुभत्याला प्रोत्साहन दिले जात आहे. देशातील पशुधनापैकी ८३·३% शेळ्यामेंढ्या व ७% गुरे आहेत. १९६० साली ५,९०० टन लोकर उत्पन्न झाली. ग्रामीण उद्योगांपैकी गालीचे, मातीची भांडी व धातुकला यांसाठी अल्जीरिया जगप्रसिद्ध आहे. १९६८ साली १३·०५ लक्ष किवॉ. तास विद्युत्-उत्पादन झाले. देशात अल्पसा कोळसा आहे (१९६४ : ३५,००० टन उत्पादन). दुसऱ्या महायुद्धाच्या काळात प्रचंड तेलसाठा सापडल्यामुळे देशाच्या
आर्थिक उभारणीचा पायाच रचला गेला. १९६९ साली ४,३८,०६,००० टन तेल-उत्पादन झाले. तेल भूमध्यसागराकाठच्या बंदरांपर्यंत नळांनी नेले जाते. येथील फॉस्फरसविरहित लोखंड पोलादनिर्मितीसाठी उपयुक्त आहे. फॉस्फेटचे १९६२ साली ३,९०,००० टन उत्पादन झाले. जंगलातून बुचाचे उत्पादन होते. निरनिराळ्या प्रकारचे ताड व इतर वृक्ष जळणाच्या व औद्योगिक गरजा भागवितात. फ्रेंचांनी जाळलेल्या वनसंपत्तीची उणीव भरून काढण्यासाठी जंगलसेवा-विभागातर्फे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण मोहीम सुरू करण्यात आली आहे. भूमध्यसमुद्रात मच्छीमारी चालते. १९५९ साली ३,६७२ टन मासे डबाबंद करण्यात आले. देशात सिमेंट, रसायने, विजेचे साहित्य, शेतीची अवजारे, अन्नपदार्थ, तेल, साबण, कापड, तंबाखू, आगपेट्या, तारायंत्री तारा, दूरध्वनियंत्रे इ. निर्माण करण्याचे कारखाने आहेत. औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक १९५३ साली १०० पासून १९६० साली १६३ वर गेला. १९७० साली येथील सरकारने पहिली चार-वर्षीय योजना अंमलात आणली. ही योजना ५२८ अब्ज डॉलरची असून दरवर्षीचे राष्ट्रीय उत्पन्न ९%वाढविण्याची योजना आहे.
अल्जीरियातील मुक्ती आघाडी या राजकीय पक्षाने उभारलेल्या कामगार-संघटनेची सदस्यसंख्या सर्वांत मोठी आहे. याच्या खालोखाल इतर संघटना आहेत. नोकऱ्यांच्या अभावी बरेच अल्जीरियन फ्रान्समध्ये नोकरी करीत असून ते अल्जीरियातील स्वतःच्या सु. पाचपट लोकांना पोसतात. देशासमोर मोठा प्रश्न बेरोजगारांचा व फ्रान्स आणि अल्जीरियामधील लोकसंख्येच्या अदलाबदलीचा आहे.
देशातील तेल, नैसर्गिक वायू, फॉस्फेट, लोखंड, भाजी, अल्फाल्फा, बूच, मद्य व फळे यांची निर्यात होत असून कापड, साखर व यांत्रिक साहित्य इत्यादींची आयात होते. १९६८ मध्ये निर्यात ४,०९,७८,९१,००० दिनार व आयात ४,०२,२६,७५,००० दिनार होती. १९६८ मध्ये फ्रान्सकडून ५७%, पश्चिम जर्मनीकडून ६%, इटलीकडून ६% व अमेरिकेकडून ८% आयात होती, तर फ्रान्सकडे ५५%, प. जर्मनीकडे १३%, इटलीकडे ६%, इंग्लंडकडे ५% निर्यात होती. निर्यातीत क्रूड तेल ६९%, मद्य ९% व लिंबूजातीची फळे ५% होती.
ग्रामीण भागात अजूनही स्थानिक बाजारांतून व मेळ्यांतून व्यापार वस्तुविनिमयाच्या स्वरूपात चालतो. बँक ऑफ अल्जीरिया या स्वतंत्र बँकेचे १७ मे १९४६ रोजी राष्ट्रीयीकरण झाले. शहरांतून अनेक मोठ्या बँका व सरकारी अनुदानावर चालणाऱ्या अनेक सहकारी शेतकी बँका कार्य करीत असतात. फ्रेंच फ्रँक व दिनार ही दोन्ही चलने असून ती सममूल्य आहेत. याचे सुवर्ण-सममूल्य १८० मिग्रॅ. ठरले आहे. एक दिनार = ०·२०,२५५ डॉलर (किंवा १ डॉलर = ४·९३,७०६ दिनार व १ दिनार = १·१,८७·२२२ रुपये) हा विनिमयदर आहे.
१९६९ साली अंदाजपत्रकात जमा व खर्च ३·८९ अब्ज दिनार दाखविण्यात आला आहे. यात जकात, इतर कर व फ्रान्सकडून मिळालेले अनुदान या प्रमुख उत्पन्नाच्या बाबी आहेत. अंदाजपत्रकातील तूट भरून काढण्यासाठी देण्यात येणारी फ्रेंच मदत दर वर्षी कमी होत आहे. १९६६ मध्ये ही मदत ४८ कोटी ८० लक्ष दिनार होती. १९६३ साली विकासासाठी रशियाकडून २·५ टक्के व्याजावर ३,६०,००,००० पौंड व चीनकडून बिनव्याजी १,८०,००,००० पौंड कर्ज घेण्यात आले.
अल्जीरियात १९५९ साली ४४ राष्ट्रीय मार्ग असून त्यांची लांबी ८,७९० किमी. होती. याशिवाय १३,५०० किमी. विभागीय, १३,७३० किमी. स्थानिक, १९,३२० किमी. ग्रामीण रस्ते व १३,३५० किमी. लांबीच्या मरुभूमीतील वाटा होत्या. १९६४ साली देशात २,९७,५०० (पैकी ९२,५०० व्यापारी) मोटार-वाहने होती. १९६४ मध्ये ४,२९७ किमी. लांबीचे लोहमार्ग होते. अल्जिअर्स येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून देशात इतरत्र दीडशेवर विमानतळ आहेत. अल्जिअर्स, बोन व ओरान या तीन बंदरांतून देशातील ३/४ जलवाहतूक चालते. १९६४ साली राष्ट्रीय जलसेवा-संस्था स्थापन करण्यात आली. १९५९ साली देशात ९०० टपाल कचेऱ्या व १,७८,००० दूरध्वनी होते. १८ नभोवाणी-केंद्रांपैकी सात अल्जिअर्समध्येच आहेत. ध्वनिक्षेपण अरेबिक, फ्रेंच व काबिलिया भाषांतून होते. १९६७साली देशात ६,५०,००० रेडिओ व १,००,००० दूरचित्रवाणी-संच होते. अल्जीरिया रेडिओ-टेलिफोन फ्रान्स, ट्युनिशिया, मोरोक्को व सहारा यांच्याशी जोडलेला आहे.
लोक व समाजजीवन : येथील आदिवासी बर्बर व सेमिटिक वंशाचे आहेत. यांची वैशिष्ट्ये म्हणजे ग्रीकांसारखा उंच बांधा, सरळ नासिका, काळसर पिंगट डोळे, आकुंचित हनुवटी, गौरवर्ण, डोक्यावरील व चेहऱ्यावरील काळे व तपकिरी रंगाचे केस ही होत. त्यामुळे आशियातील अफगाणांशी त्यांचे सादृश्य दिसते. बर्बरांत अनेक जमाती आहेत. काबिलिया जमात प्रामुख्याने शेतकरी असून ती अल्जिअर्स व कॉन्स्टँटीन शहरांच्या दरम्यान असलेल्या पर्वतमय भागात राहते. शाविय्याह जमात पूर्वेकडील आउरेस पर्वतीय भागात व खजूर उत्पादन करणारी एमजाब जमात उद भागात राहते. मरुभूमीत राहणाऱ्या समूहात ट्यूराग, टूअट व बिस्केरा जमाती उल्लेखनीय आहेत. १९३७ साली ७३,३०,००० असलेली अल्जीरियाची लोकसंख्या १९६० साली १,२०,९३,२०३ झाली. सुमारे ९०% लोकसंख्या उत्तरेकडील १/८ सुपीक भागात राहते. लोकसंख्येची सरासरी घनता दर चौ.किमी.ला ४ असली तरी ती उत्तरेकडे सुमारे ६०, पर्वतमय भागात सु. १० असून मरुभूमीचा बराच भाग निर्जन आहे. १९६१ मध्ये येथे फ्रेंच अंदाजावरून यूरोपीय लोक १०,७०,००० (पण अल्जीरियाच्या यादीप्रमाणे ८,५०,०००) होते. ही लोकसंख्या प्रामुख्याने कॉर्सिकन, स्पॅनिश, इटालियन व माल्टीज वंशातील लोकांची आहे. देशातील ज्यूंची लोकसंख्या १,५०,००० असून यांपैकी निम्मे धर्मपरिवर्तन केलेले बर्बर आहेत. तसेच बरेच जण १४९२ मध्ये स्थानांतर केलेल्या स्पॅनिश ज्यूंच्या वंशातील आहेत. १९०० साली शेकडा १८ असलेले नागरी वस्तीचे प्रमाण, १९६० साली शेकडा ३० झाले. या शहरीकरणामुळे उद्भवलेली गृहसमस्या सोडविण्यासाठी १९५४—५९ या काळात १,००,००० घरे व १९६३ साली कॉन्स्टँटीन योजनेनुसार २,१०,००० घरे बांधण्यात आली. शहरातील गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने उपनगरांची स्थापना व फ्रेंचांनी उध्वस्त केलेल्या गावांच्या पुनर्रचनायोजना कार्यान्वित होत आहेत. शेकडा ६५ मुस्लिमांचे दरडोई वार्षिक उत्पन्न सु. ४१३ रु. म्हणजे येथील यूरोपीयांच्या राहणीमानाच्या मानाने किती तरी कमी आहे. १९५९ साली मुस्लिमांचे अशोधित जननमान व मृत्युमान अनुक्रमे हजारी ४७ व ११ यूरोपीयांचे हेच प्रमाण अनुक्रमे हजारी २१ व ८·८ होते.
बहुसंख्य मुसलमान सुन्नी पंथाच्या मलिकी शाखेचे असले, तरी देशात धार्मिक स्वातंत्र्य आहे. अल्पसंख्य मुसलमान हनफी शाखेचे आहेत. येथील वैशिष्ट्य म्हणजे फकीर व मेराबाउट भ्रातृसमाज व त्यांच्या चालत आलेल्या परंपरा आहेत. या परंपरांचा परिणाम शहरांतून कमी असला, तरी ग्रामीण जीवनावर अद्यापही बराच आहे. या भ्रातृसमाजांपैकी पूर्व अल्जीरियात रेहमानिया, ओरान भागात तय्यबिया, अल्जिअर्स विभागात शाधिलिया, कॉन्स्टँटीन भागात टिड्जनिया, इतरत्र कादिरिया असे अनेक समाज अस्तित्वात आहेत. येथील इस्लामी लोकांत रूढाचार कसोशीने पाळण्यात येतात. रमजानसारखे उपवास सर्वत्र पाळले जातात. बऱ्याच भागांत इस्लामपूर्वीचे, जादूटोणा इत्यादिकांसारखे प्रकार अजून प्रचारात आहेत. इस्लामला संमत असलेली बहुपत्नीकत्वाची प्रथा विशेषेकरून शहरांतून प्रचारात नाही. १९४९ साली निवडक शहरांना व कृषिकामगारांना सामाजिक सुरक्षापद्धती लागू करण्यात आली. व्यावसायिक आधारावर संघटित झालेल्या समाज-विमापद्धतीचा लाभ व्यापार, उद्योग व शासकीय सेवा-श्रमिकांना अपघात, अपंगत्व, मृत्यू व प्रसूती अशा प्रसंगी मिळतो. वृद्धांना वार्षिक भत्ता तसेच गरजू, अंध व अपंगांना विशेष भत्ता देण्याची सोय आहे. १९६२ साली १४६ रुग्णालयांतून ४०,००० खाटांची सोय होती. सहारात १५ रुग्णालयांतून ९०० खाटांची सोय आहे. मलेरिया व महामारी यांवर नियंत्रणाचे प्रयत्न चालू आहेत. देशात टायफॉइड व देवीचा प्रसार खूप असून नेत्ररोग व सामान्य कुपोषण या समस्या आहेत.
भाषा व साहित्य : बोलीतील विविधता असलेली अरबी ही बहुसंख्य लोकांची भाषा आहे. तथापि बरेच मुस्लिम फ्रेंच भाषा वापरतात. बर्बर भाषा १/३ मुस्लिम बोलतात (तिच्यात जिल्ह्याजिल्ह्यांतून विभिन्नता आढळते). बर्बर भाषा ही हॅमिटिक भाषासमूहाची एक शाखा असून प्राचीन काळी न्यूमिडियनांनी तिला लिपिबद्ध केले. फ्रेंच भाषेचा वापर शासनास व शिक्षित समाजात खूप होतो. या देशात सुप्रसिद्ध साहित्यिकांपैकी जूल्झ रॉय (१९०७ — ) लेखक व नाटककार असून तो प्रवासवर्णनासाठीही प्रसिद्ध आहे. आल्बेअर काम्यू (१९१३—६१) नोबेल पारितोषिक विजेता होता. अल्जीरियाचा भूगोल व हॅनिबालवर नाटक लिहिणारा अहमद तेवफिक मदानी आणि धार्मिक व अरबी पंडित अब्दुल हमीद बेन बादिस महत्त्वाचे नेते आहेत. बादिसने १९३५ साली उलेमा मंडळाची स्थापना केली. या मंडळाने अरबी शिक्षण देऊन फ्रेंच भाषा व संस्कृतीचे क्रमशः उन्मूलन करण्यात बरे यश संपादन केले. अल्जीरियात १९६८ साली ४ दैनिके, ६ साप्ताहिके व ८ नियतकालिके होती. अल्जीरियात सर्वांत मोठे ग्रंथालय (५,००,००० ग्रंथ) अल्जीरियन विद्यापीठात असून राष्ट्रीय ग्रंथालय (५,००,००० ग्रंथ), पाश्चर संस्थेतील विशेष ग्रंथालय (४०,००० ग्रंथ) तसेच ओरान आणि कॉन्स्टँटीन येथील ग्रंथालये प्रसिद्ध आहेत.
शिक्षण, कला, क्रीडा इ. : अल्जीरियाच्या शिक्षणपद्धतीचे वैशिष्ट्य स्वतंत्र शाळांतून इस्लाम धर्म, संस्कृती व आचारांचे शिक्षण देणे हे होय. यासाठी व फ्रेंच गेल्यामुळे झालेली शिक्षकांची उणीव भरून काढण्यासाठी ईजिप्तमधून शिक्षक आणण्यात आले. १९४९ साली फ्रेंच व मुस्लिम शाळांचे एकत्रीकरण झाले. १९६६-६७ साली प्राथमिक शाळांत १३,५०,२२० विद्यार्थी, माध्यमिक शाळांत ९६,८४५ विद्यार्थी, तांत्रिक शाळांत ३४,४३९ विद्यार्थी, शिक्षण-प्रशिक्षण शाळांत ४,०५२ विद्यार्थी व उच्च शिक्षण घेणारे १,६६९ विद्यार्थी होते. अल्जिअर्स विद्यापीठ १८७९ साली स्थापन झाले असून उच्च शिक्षण देणारी देशात ही एकमेव संस्था आहे. १९६२-६३ साली १,३५९ विद्यार्थी परदेशात शिक्षण घेत होते. देशासमोर महत्त्वाचा प्रश्न निरक्षरता दूर करण्याचा आहे. वस्तुसंग्रहालयांपैकी बोर्जे येथील प्रागैतिहास व मानवजातिविज्ञान यांविषयीचे व अल्जिअर्स येथील ललितकलांचे वस्तुसंग्रहालयही प्रसिद्ध आहेत. पुरातत्त्व व इस्लामी कलेचे स्टेफेन-जीसेल राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय, नीग्रो कलेचे सावोर्गनान-द-ब्राझा वस्तुसंग्रहालय, तसेच कॉन्स्टँटीन, ओरान व टेमसिनीन येथील वस्तुसंग्रहालये उल्लेखनीय आहेत. बहुतेक मशिदी वास्तुशिल्पाने परिपूर्ण असून मुस्लिम जीवनाची केंद्रे आहेत. त्यांतून मूरिशं कलेच्या नमुन्याबरोबर ऑटोमन पद्धतीच्या कलेचे संमिश्र स्वरूप दिसते. याच्या खालोखाल महाल, समाधी, किल्ले, स्मारके व प्रासादांतून वास्तुशिल्पाचे नमुने झळकतात. बूझी येथील प्राचीन मशीद अबू नासिर याने ख्रिस्तोत्तर १०६८ साली उभारली. बूझीच्या हम्माडाइटांचा राजमहाल सजावट व सुंदर नमुन्यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय उत्कृष्ट शिल्पकला असलेल्या एका प्रासादात आहे. अल्जीरियातील प्राचीन चिनीमातीच्या वस्तूंनी अभ्यासाच्या दृष्टीने एक आकर्षण निर्माण केले आहे. या कलाकृतींचा नवाश्मयुगातील किंवा प्राचीन ईजिप्तमधील चिनी मातीच्या वस्तूंशी संबंध असावा. अल्जीरियातील गालिचे नयनरम्य नमुन्यांसाठी जगप्रसिद्ध आहेत. संगीताच्या दृष्टीने नोउबा संगीत व नृत्य, तसेच काबिलिया गीते प्रसिद्ध आहेत. बर्बर लोकगीते व रूढाचारातील अनेक विषय शास्त्रीय अभ्यासाला प्रेरणा देत आहेत. अरब संगीताचा प्रख्यात अभ्यासक फ्रांसिस साल्व्हदोर (१८३१—?) हा फ्रेंच होता याने काबिलिया गीत, अरब वाद्यसंगीत इत्यादींचा अभ्यास करून बरेच लिखाण केले आहे.
⇨अल्जिअर्स हे राजधानीचे शहर व प्रमुख बंदर आहे. शहर पूर्वाभिमुख असून येथे मूरिश व दक्षिण यूरोपीय पद्धतीची घरे प्रामुख्याने दृष्टोत्पत्तीस येतात. दुसरी महत्त्वाची शहरे कॉन्स्टँटीन (२,५५,०००), अन्नाबॉन (बोन, १,६५,०००) व ओरान (३,२५,०००) आहेत. १०,००० वर लोकसंख्या असलेली ५६ शहरे इतरत्र आहेत.
किनाऱ्यावरील प्रदेशातील भूमध्यसागरी हवामान, टेल ॲटलास पर्वताची शिखरे व दऱ्याखोरी आणि तेथील विलोभनीय सृष्टिसौंदर्य, अल्जिअर्स, कॉन्स्टँटीन वगैरे शहरे यांमुळे अलीकडे हौशी प्रवाशांनाही अल्जीरियाचे आकर्षण वाटू लागले आहे.
संदर्भ : 1. Legum, Colin, Ed. Africa-A Hand Book to the Continent, New Delhi, 1962.
2. Stamp, L. Dudley,Africa-A Study in Tropical Development, New York, 1964.
खांडवे, म. अ.
“