गोकुळ : उत्तर प्रदेश राज्यातील श्रीकृष्णकालीन प्रसिद्ध क्षेत्र. हे मथुरेच्या समोर सु. १० किमी.वर यमुनेच्या दुसऱ्या तीरावर असून पुलाने जोडलेले आहे. श्रीकृष्णाचे बालपण येथे गेले. पूतनावध, यमलार्जुन उद्धार, गोपगोपींसह क्रीडा इ. श्रीकृष्णलीला येथेच घडल्या. सर्व वैष्णव संतांना गोकुळ हे प्रियधाम म्हणून अत्यंत प्रिय आहे. अजूनही गोकुळाष्टमीचा उत्सव येथे मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. गोकुळ हे वल्लभ संप्रदायाचे एक प्रमुख केंद्र असून औरंगजेबाच्या काळापर्यंत या संप्रदायाचे सर्व पूज्य ठाकूर येथेच राहत असत. सध्या येथे या संप्रदायाच्या २४ हवेल्या असून वल्लभाचार्यांची बैठक, गोकुळनाथाची बैठक, गोविंदघाट, वल्लभघाट, व्रजराजमंदिर, गोकुळनाथमंदिर, रमणरेती आणि ब्रह्मांडतीर्थ ही तीर्थे, ही येथील प्रसिद्ध स्थळे आहेत. प्राण्यांची चांदीची चित्रे येथे बनविली जात. 

कांबळे, य. रा.