किलिमांजारो : आफ्रिका खंडातील अत्युच्च गिरिपिंड. हा केन्याच्या सीमेवर आणि टांगानिकाच्या वायव्येस आहे.  पूर्वपश्चिम ८० किमी. पसरलेल्या ह्या गिरिपिंडावर तीन प्रमुख ज्वालामुखे आहेत. कीबो हे सर्वांत उंच ज्वालामुख ५,८९५ मी. उंच असून त्यालाच जोडून ११ किमी. पूर्वेस मावेन्झी हे ५,३५३ मी. उंचीचे ज्वालामुख आहे. यांच्या पश्चिमेस शिरा रिज हे ४,००४ मी. उंचीचे तिसरे ज्वालामुख आहे. डॉ. हान्स मायर याने ऑक्टोबर १८८९ मध्ये कीबोवर प्रथम पाय ठेवला आणि फिट्‌स क्लूट १९१२ मध्ये मावेन्झीवर प्रथम पोहोचला.

हिमाच्छादित किलिमांजारो पर्वत

पर्वतपायथ्याच्या व उतारावरील घनदाट जंगलातील वन्य पशुपक्ष्यांचे जीवन बघण्यासाठी जगाच्या कोनाकोपऱ्यांतून अनेक हौशी प्रवासी किलिमांजारोला भेट देतात. ७०० मी. उंचीखालील प्रदेशात ज्वालामुखीनिर्मित वस्त्रगाळ धूळ आढळते व येथे उष्ण कटिबंधीय त्याचप्रमाणे समशीतोष्ण कटिबंधीय जंगले उंचीनुरूप आढळतात.  पुढे ४,५७५ मी. उंचीपर्यंत गवताळ प्रदेश व अल्पाइन जंगले विशेषत्वाने आढळतात. कीबोवर १,८२८ मी. रूंदीचे व १८२ मी. खोलीचे ज्वालामुख असून त्यात ६१ मी. जाडीचा बर्फाचा थर आहे. मावेन्झी मात्र उघडे बोडके व ज्वालामुखी राखेने आणि इतर उद्रेकद्रव्यांनी युक्त आहे. अत्युच्च शिखरप्रदेशात बर्फाची वादळे नेहमीच होतात. पर्वताच्या दक्षिणेकडील पायथ्याशी, मोंबासाच्या ४६७ किमी. पश्चिमेस आणि नैरोबीच्या ३६१ किमी. दक्षिणेस मोशी नावाचे प्रमुख व्यापारी केंद्र असून तेथूनच किलिमांजारोवर चढून जातात.

 

चित्रसंदर्भ : https://www.britannica.com/place/Kilimanjaro

 

खातु, कृ. का.