हाव्हॅना : (ला हावाना ). क्यूबा देशाची राजधानी. लोकसंख्या २१,३५,४९८ (२०१० अंदाज ). कॅरिबियन बेटातील हे सर्वांत मोठे शहर असून क्यूबाचे प्रमुख बंदर व व्यापाराचे मोठे केंद्र आहे. इतिहास, संस्कृती, स्थापत्य, कला, स्मारके यांबाबतीत हे शहर प्रसिद्ध असून त्यावर स्पॅनिश संस्कृतीचा अधिक प्रभाव जाणवतो.

 

स्पॅनिश गव्हर्नर दिएगो व्हेलाक्वेस दे सेऊलर याने १५१९ मध्ये हे शहर वसविले. अमेरिकन नवे जग व पूर्वेकडील यूरोपसह जुने जग यांना जोडणारा दुवा म्हणून या शहराला महत्त्व प्राप्त झाले होते. स्पेनचा राजा दुसरा फिलीप याने इ. स. १५९२ मध्ये या शहराला हाव्हॅना हे नावदिले. हे शहर प्रामुख्याने व्यापारी बंदर म्हणून उदयाला आले पण पुढे समुद्रीचाच्यांच्या सततच्या हल्ल्यामुळे ते त्रस्त होते. अमेरिकन प्रदेशातून यूरोपकडे व विशेषतः स्पेनकडे जाणारी हजारो व्यापारी जहाजे या बंदरात थांबत. त्यामुळे या जहाजावरील लोकांना अटलांटिक महासागराच्या लांब पल्ल्याचा प्रवास पार करताना लागणारे अन्न, पाणी व इतर वस्तू , पदार्थ या शहरातून पुरविले जात असत. त्यामुळे हे शहर ‘नवीन जगाचे प्रवेशद्वार व वेस्ट इंडिजचा संरक्षक तटङ्ख या नावाने ओळखले जाऊ लागले.

 

सतराव्या शतकामध्ये हाव्हॅना शहराचा झपाट्याने विस्तार झाला. इ. स. १७६२ मध्ये ब्रिटिशांनी या शहराचा कब्जा घेतला परंतु पुन्हास्पेनने याचा ताबा घेऊन शहराची मजबूत तटबंदी केली.

 

सुरुवातीच्या काळात साखर व गुलामांच्या व्यापारामुळे हाव्हॅना शहराला समृद्धी प्राप्त झाली. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात कॅरिबियन बेटे व उत्तर अमेरिका यांदरम्यान मोठी व्यापारवृद्धी झाली. त्यामुळे हाव्हॅना हे अधिक समृद्ध व अद्ययावत शहर बनत गेले. १९५९ पर्यंत या शहराने विकासाचे अनेक टप्पे पार केले. फिडेल कास्ट्रोच्या नेतृत्वाखाली क्यूबात झालेल्या १९५९ च्या कम्युनिस्ट क्रांतीनंतर हाव्हॅनाचेही आर्थिक-सामाजिक जीवन बदलत गेले.

 

हाव्हॅनाची अर्थव्यवस्था वैविध्यपूर्ण असून तीमध्ये कारखानदारी, बांधकाम, वाहतूक, दळणवळण या पारंपरिक व्यवसायांबरोबरच जैव-तंत्रज्ञान व पर्यटन या नव्या उद्योगांचाही समावेश झाला आहे. मांसहवाबंद डब्यात भरणे, रसायने, औषधे, अन्नप्रक्रिया उद्योग, जहाज व मोटारबांधणी, कापड, तंबाखू उत्पादने, मासेमारी हे येथील प्रमुख उद्योग आहेत. क्यूबाच्या एकूण आयात-निर्यात व्यापारात हाव्हॅनाचा ५०% वाटा आहे. १९३० नंतरच्या काळात पर्यटन उद्योगाच्या वाढीसाठी शहरात असंख्य हॉटेले, जुगारगृहे, नाईट क्लब्ज बांधले गेले व ते एक नावाजलेले पर्यटन स्थळ बनले. या ऐतिहासिक व आधुनिक शहराला दरवर्षी १० लाखाहून अधिक पर्यटक भेट देतात. गेल्या २० वर्षांपासून आरोग्य पर्यटन स्थळ म्हणूनही हे शहर लोकप्रिय बनले आहे. १९८२ मध्ये युनेस्कोने या शहराला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे.

 

आजगेकर, बी. ए.