ठठ्ठा : पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील ठठ्ठा जिल्ह्याचे ठाणे. लोकसंख्या १२,७८६ (१९६१). हे कराचीच्या पूर्वेस ८८ किमी., सिंधूच्या पश्चिमेस, माकली टोकड्यांच्या पायथ्याशी असून तेथे गहू, तांदूळ, ऊस इत्यादींचा व्यापार चालतो. सुती व रेशमी लुंग्या, हातमाग कापड, मातीची भांडी हे उद्योग आहेत. हे प्राचीन पाताळ शहर असावे असे मानतात. १४४५ मध्ये मुसलमानांनी ते पुन्हा वसविले. अकबर, शहाजहान, नादीरशहा, कल्होर राजे, तालपूरचे मीर वगैरेंच्या सत्ता याने पाहिल्या. पूर्वीची दबगार मशीद व शाहजहानने बांधलेली जामा मशीद तसेच अनेक सुंदर इस्लामी इमारतींचे अवशेष येथे आहेत.

ओक, द. ह.