सूंदा बेटे : आग्नेय आशियातील द. चिनी समुद्र, सेलेबीझ समुद्र आणि हिंदी महासागर यांदरम्यानची इंडोनेशियातील बेटे. ७° उ. ते ११° द. अक्षांश व ९५° पू. ते १२८° पू. रेखांश यांमध्ये पश्चिम-पूर्व सु. ३,५०० किमी. व दक्षिण-उत्तर सु. १,७५० किमी.पर्यंत ही बेटे पसरलेली आहेत. ग्रेटर सूंदा व लेसर सूंदा अशा दोन भागांत या बेटांची विभागणी केलेली आहे. ग्रेटर सूंदामध्ये सुमात्रा, जावा, बोर्निओ, सेलेबीझ व त्यालगतची काही लहान बेटे यांचा समावेश होतो, तर लेसर सूंदामध्ये बाली, लाँबॉक, सूंबावा, सूंबा, फ्लोरेस, तिमोर, आलोर व त्यालगतची काही लहान बेटे यांचा समावेश होतो. लेसर सूंदा बेटांना १९५४ पासून नुसा तेंगारा असे म्हणतात. भूगर्भशास्त्रीय दृष्ट्या बोर्निओ, पूर्व सुमात्रा व त्यालगतचा काही भाग वगळता सूंदा बेटांचा अन्य भाग अस्थिर आहे. बोर्निओ बेटातील उत्तरेकडील सारावाक व साबा हे भाग मलेशियाचे, तर ब्रूनाई हा पूर्वाश्रमीचा ब्रिटिशांकित प्रांत असून तो १९८४ मध्ये स्वतंत्र, स्वायत्त देश झाला. त्या बेटाचा दक्षिणेकडील भाग व अन्य बेटे इंडोनेशियाच्या आधिपत्याखाली आहेत. या प्रदेशात मलेशियन संस्कृती व मलेशियन भाषेचा पगडा आहे.

पहा : इंडोनेशिया मलेशिया.

निगडे, रेखा