फोर्ट वर्थ : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी टेक्सस राज्यातील प्रमुख शहर व टॅरंट काउंटीचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ३,५८,३६४ (१९७५ अंदाज). हे डॅलसच्या पश्चिमेस सु. ५० किमी. ट्रिनिटी नदींकाठी वसले आहे. दळणवळण, व्यापार व उद्योगधंदे यांचे हे केंद्र आहे.

मेजर रिप्ली आर्नल्ड याने १८४९ मध्ये सरहद्दीवरील लष्करी ठाणे म्हणून हे वसविले. यास फोर्ट वर्थ हे नाव टेक्ससमधील अमेरिकन सैन्याचा मेजर जनरल विल्यम जेंकिंझ वर्थ याच्या नावावरून पडले. १८५३ मध्ये येथून सैन्य हलविल्यामुळे या शहराचे महत्त्व कमी झाले परंतु १८५६ नंतर त्याच्या विकासास पुन्हा चालना मिळाली. येथील विमाननिर्मिती उद्योगामुळे आणि जवळच्या कार्सवेल या सैनिकी हवाईतळामुळे यांस लष्करी दृष्ट्या महत्त्व आहे.

फोट वर्थच्या आसमंतात गुरे पाळणे व कृषिउद्योग प्रमुख असून धान्यव्यापारात हे शहर अग्रेसर आहे. येथील ‘जनरल डायनॅमिक्स प्‍लँट’ मध्ये बी-२४, बी-३२, बी-३६, एफ्‌-१११ या प्रकारच्या लढाऊ विमानांची निर्मिती होते. येथेच जगप्रसिद्ध ‘बेल हेलिकॉप्टर कंपनी’ आहे. येथे तेलशुद्धीकरण उद्योगही विकसित झालेला आहे. यांशिवाय मद्यनिर्मिती, मांस डबाबंदीकरण, अन्नप्रक्रिया, कातडी वस्तू, रसायने इ. उद्योगही प्रगत झालेले आहेत.

संगीतक्षेत्रात प्रसिद्ध असलेली आणि दर चार वर्षांनी भरणारी ‘व्हॅन क्लायबर्न आंतरराष्ट्रीय पियानो स्पर्धा’ येथे भरते. येथील ‘फोर्ट वर्थ ऑपेरा’ (१९४७), ‘फोर्ट वर्थ सिंफनी ऑर्केस्ट्रा’ ‘टेक्सस बॉइज क्‍वायर’ यांनाही संगीतक्षेत्रात महत्त्वाचे स्थान आहे. हेरिटिज हॉल, फोर्ट वर्थ म्यूझीयम ऑफ सायन्स अँड हिस्टरी, रेमिंग्टन आणि चार्ल्‌झ रसेल यांच्या चित्रांचा संग्रह असलेले आणि पाश्चात्य कलासंग्रहासाठी विख्यात असलेले अमॉन कार्टर म्यूझीयम नियमितपणे भरणारी व्यापारी-औद्योगिक प्रदर्शने तसेच ‘सिक्स फ्‍लॅग्ज ओव्हर टेक्सस’ हे प्रसिद्ध उद्यान इ. पर्यटकांची आकर्षणे आहेत.

लिमये, दि. ह.