झीज आणि भर : पृथ्वीचा भूभाग सरोवरातील शांत पाण्याच्या पृष्ठासारखा एकसारखा सपाट नाही तो उंचसखल आहे. पृथ्वीच्या एकूण आकारमानाच्या दृष्टीने हा उंचसखलपणा अगदीच क्षुद्र आहे. पृथ्वीचा सरासरी व्यास १२,७३५ किमी., तिच्यावरील सर्वांत उंच पर्वतशिखर मौंट एव्हरेस्ट ८,८४७·६ मी. व सर्वांत खोल सागरी गर्ता मेअरीॲना ट्रेंच ११,०३५ मी. ही लक्षात घेतली आणि पृथ्वीचा नमुना म्हणून १ मी. व्यासाचा गोल बनविला, तर त्यावर वरील सर्वोच्च शिखर व सर्वात खोल गर्ता यांमधील फरक हा जेमतेम १·५ मिमी. म्हणजे या मजकुरातील अक्षरांच्या उंचीपेक्षाही थोडा कमीच भरेल. तथापि भूपृष्ठावर वावरणाऱ्या मानवाच्या दृष्टीने भूपृष्ठाचा उंचसखलपणा चांगलाच जाणवण्याजोगा आहे.

नैसर्गिक क्षरणशिल्पे : ब्राइस कॅन्यन नॅशनल पार्क, उटा, अमेरिका.

भूपृष्ठाचे उंचसखल स्वरूप सतत बदलते आहे. भूपृष्ठ अस्तित्वात आल्यापासून त्याच्या स्वरूपात सतत बदल होत आला आहे. आजही बदलाची ही प्रक्रिया चालू आहे आणि पुढेही चालू राहणार आहे.

हा बदल घडवून आणणारी कारके दोन प्रकारची असतात : एक भूपृष्ठाच्या आतून, खालून कार्य करणारी आणि दुसरी त्याच्या बाहेरून त्याच्यावर कार्य करणारी. खालून कार्य करणारी कारके पृथ्वीच्या त्रिज्येच्या दिशेने किंवा भूपृष्ठ समांतर दिशेने कार्य करतात आणि त्यामुळे भूकवचाच्या खडकांचे वलीकरण, विभंग, ज्वालामुखी, भूकंप इ. आविष्कार झालेले दिसून येतात. भूपृष्ठावर त्याच्या बाहेरून कार्य करणारी कारके त्याची काही ठिकाणी झीज घडवून आणतात, तर काही ठिकाणी ती त्यात भर घालतात. विदारण, वाहते पाणी, घसरते बर्फ, मुरलेले पाणी, समुद्राचे पाणी आणि वारा ही अशी बाह्यकारके आहेत. यांपैकी विदारणामुळे माती, दगड, गोटे, मोठमोठे शिलाखंड इ. रूपांत असणारा खडक फुटतो त्याचे तुकडे किंवा चुरा, भुगा होतो. मृदा तयार होते. बाकीच्यामुळे हे तुकडे, चुरा इ. माल वाहून नेला जातो व वाटेत भूपृष्ठावर ती कारके व हा माल यांचे घर्षण होऊन भूपृष्ठ खरवडले, कोरले, झिजविले जाते या प्रकारच्या कार्याला क्षरण म्हणतात. काही शास्त्रज्ञ विदारणाचाही अंतर्भाव क्षरणातच करतात.

विदारण : हे दोन प्रकारचे असते, कायिक आणि रासायनिक. कायिक विदारण उष्णता, पाणी गोठणे, पाऊस, वारा, प्राणी इत्यादींमुळे घडून येते व रासायनिक विदारण खडकांची घटकद्रव्ये आणि वातावरण, पाणी इत्यादींची घटकद्रव्ये यांचे एकमेकांवर रासायनिक कार्य होऊन घडून येते.

नैसर्गिक क्षरणशिल्पे : ब्राइस कॅन्यन नॅशनल पार्क, उटा, अमेरिका.

कायिक विदारण : खडक फुटताना त्यांचे कणी विघटन (कणकण वेगळे होणे) होते, अपपर्णन (कांद्यासारखे पापुद्रे निघणे) होते, सांध्याच्या भेगा मोठ्या होऊन खडकांचे मोठे ठोकळे अलग होतात किंवा त्यांचा विध्वंस होऊन त्यांचे अणकुचीदार व धारदार तुकडे तुकडे होतात. उष्णतेमुळे खडक तापतात व प्रसरण पावतात. ते निवले म्हणजे आकुंचन पावतात. आकुंचन-प्रसरणाची ही क्रिया वारंवार दीर्घकालपर्यंत होत राहिली म्हणजे खडकांच्या कणाकणांमध्ये ताण व दाब निर्माण होऊन अखेर खडक फुटतो. आलटून पालटून तापण्यानिवण्यामुळे खडक फुटणे, त्याचे लहानमोठे तुकडे होणे व शेवटी त्यांची वाळू बनणे ही क्रिया विशेषतः उष्ण कटिबंधीय मरुप्रदेशांत–वाळवंटांत दिसून येते. तेथे दिवसाच्या व रात्रीच्या तपमानांत मोठा फरक पडतो. खडकाचा बाहेरचा भाग आतल्या भागापेक्षा जास्त तापतो व निवतो, तसेच खडकाच्या घटकद्रव्यांचे प्रसरण-आकुंचनही कमीजास्त प्रमाणात होते. याचा परिणामही त्याच्या कणाकणांत ताण व दाब निर्माण होऊन तो फुटण्यात होतो. खडकाचे कण किंवा लहान मोठे तुकडे त्यापासून अलग होऊन त्याच्या पायथ्याशी साचतात आणि खडकाचा आतील नवीन पृष्ठभाग उघडा पडून त्यावर विदारणाची क्रिया चालू राहते. खडक क्वार्टझाइट किंवा चुनखडक यांसारखा एकजिनसी असला, तर तो याप्रमाणे न फुटता त्यावर फुगवटी येते आणि तापल्यावर त्याचा पातळसा पापुद्रा सुटतो अपपर्णन होते. खडकाचे कणी विघटन, गोलाकार किंवा कांदेपापुद्री विदारण इ. गोष्टी केवळ तापण्यानिवण्यामुळे होत नसून त्याला आर्द्रतेची जोड असावी लागते असे आता दिसून आले आहे कारण भूपृष्ठापासून बऱ्याच खोलवर जेथे सूर्याची उष्णता पोहोचणे शक्य नाही, तेथेही हे प्रकार घडलेले दिसून आले आहेत.

पाणी गोठणे : काही वेळा विशेषतः थंड हवेच्या प्रदेशांत, खडकांच्या भेगांत किंवा जमिनीच्या कणाकणांच्या दरम्यानच्या जागेत शिरलेले पाणी गोठते. गोठणारे पाणी जास्त जागा व्यापते. त्यामुळे भेगेच्या बाजूंवर किंवा मातीच्या कणांवर मोठा दाब पडतो. त्यामुळे भेगा रुंदावतात, जमीन भेगाळते व अखेर खडक फुटतो.


रुक्ष, कोरड्या हवेच्या प्रदेशात दीर्घकालीन अवर्षणकाळात जमिनीखालचे पाणी केशाकर्षणाने पृष्ठभागी येते. पाण्याचे बाष्पीभवन होऊन क्षार उरतात. क्षारांचे स्फटिक बनताना ते बर्फाच्या स्फटिकाप्रमाणेच दाब निर्माण करतात. यामुळे वालुकाश्म प्रदेशात खडकांत लहानमोठे खळगे, कोनाडे, उथळ गुहा इ. प्रकार दिसून येतात. अशा गुहांसारख्या जागांचा उपयोग वन्यप्राण्यांना व माणसांनाही आश्रयस्थाने म्हणून होतो. पावसाळ्यात गाळ व माती पाणी शोषून घेतात व फुगतात. कोरड्या ऋतूत त्या आक्रसतात. हेही कायिक विदारणच होय. चिकणमातीयुक्त गाळखडकात हा प्रकार चांगला दिसून येतो.

विदीर्ण खडकाचा चुरा डबर म्हणून डोंगर-टेकड्यांच्या पायथ्याशी शंकूसारखा साचतो. त्यात आणखी भर पडली म्हणजे काही डबर उतारावरून आणखी खाली घसरते. पुढे ते पावसाच्या पाण्याने किंवा वाऱ्याने दुसरीकडे वाहून जाते.

पाऊस, वारा, वनस्पती, प्राणी : पावसाच्या आणि वाऱ्याच्या माऱ्याने जमिनीचे व खडकाचे कण सैल होऊन अखेर ढासळतात. डोंगराळ प्रदेशांत यामुळे चित्रविचित्र आकारांचे खडक व सुळके उभे राहिलेले दिसतात. वनस्पतींची मुळे जमिनीत व खडकांच्या भेगांत घुसतात तसेच जमिनीतील दानवे किंवा रानात बिळे करून राहणारे प्राणी जमीन उकरतात. मनुष्यही घरे, रस्ते, धरणे, पूल इत्यादींसाठी जमीन व डोंगर खणून काढीत असतो.

जमिनीखालील खडकांवर वरील थरांचे ओझे असते. पाऊस, वारा व क्षरणकारके यांमुळे हे ओझे दूर झाले म्हणजे खालचा दबलेला खडक प्रसरण पावतो. यामुळे त्याचे कपचे सुटतात. मुख्य खडकात आडवे सांधे निर्माण होतात. ते असे दगड खाणीतून काढताना साह्यकारक ठरतात.

रासायनिक विदारण : याचे प्रमुख कारक पाऊस हे आहे. वातावरणातून जमिनीवर पोहोचेपर्यंत हवेतील ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साइड काही प्रमाणात पावसाच्या पाण्यात विरघळतात. जमिनीच्या वरच्या थरातून खाली जाताना वनस्पतींच्या कुजण्यामुळे उत्पन्न झालेला कार्बन डाय-ऑक्साइड काही अंशी या पाण्यात मिसळतो. खडकांच्या फटीत साचलेल्या हवेतील ऑक्सिजनही काही प्रमाणात या पाण्यात विरघळतो. मग ऑक्सिडेशन, हायड्रेशन व कार्बोनेशन या क्रियांमुळे खडकांची काही घटकद्रव्ये या पाण्यात विरघळतात किंवा त्यांवर या पाण्याची रासायनिक क्रिया होऊन तयार झालेले काही पदार्थ विरघळतात. या विरघळण्यामुळे खडकांचे काही कण निघून गेल्यामुळे बाकीचे सैल होतात व खडकांचे विदारण होते. याला खडकाचा अपक्षय किंवा कुजणे असे म्हणतात. मुरुम हे अंशतः अपक्षय झालेल्या खडकाचे उदाहरण होय. पाण्यात कार्बन डाय-ऑक्साइड विरघळून सौम्य कार्बानिक अम्ल तयार होते. चुनखडकावर या अम्लाची क्रिया होऊन कॅल्शियम-बायकार्बोनेट हा संयुग तयार होतो आणि तो पाण्याबरोबर वाहून गेल्यामुळे मूळचा खडक दुर्बल होतो. चुनखडकाच्या प्रदेशात यामुळे खोल घळया निर्माण झालेल्या दिसतात. भूपृष्ठाखालीही या क्रियेमुळे पोकळ्या व गुहा तयार होतात, खडकांतील भेगा रुंदावतात आणि जलप्रवाह विवरात गुप्त होऊन खाली दुसरीकडे पुन्हा प्रगट होतात.

अग्निजन्य खडकांवरही या पाण्याचा परिणाम होतो. ग्रॅनाइट खडकांच्या पोटॅश फेल्डस्पार या घटकावर परिणाम होऊन त्यांचे रूपांतर केओलीनमध्ये–चिनी मातीत होते. ही माती पाण्याने फुगते व खडकाचे अधिकच कणी विघटन करते. प्लेजिओक्लेज फेल्डस्पार व फेरोमॅग्नेशियन खनिजे यांवर जलाभिक्रिया होऊन इलाइट व माँटमॉरिलोनाइट ही द्रव्ये तयार होतात. फेरोमॅग्नेशियन खनिजांतून मुक्त झालेले लोह ऑक्सिजन आणि पाणी यांच्याशी संयुक्त होऊन लिमोनाइट बनते. यामुळे कित्येक खडकांवर मातट पिवळा रंग चढलेला दिसतो. बेसाल्टसारख्या खडकांवर जलाभिक्रिया होऊन अल्प प्रमाणात गोलाकार अपपर्णन होते. नुसत्या ओलसर हवेनेही विदारण झालेले दिसून येते. कोरड्या हवेत शतकानुशतके टिकणारा चुनखडक, संगमरवर अथवा फेल्डस्पारयुक्त अग्निजन्य खडक आर्द्र हवेत मात्र टिकत नाही. इमारती, पुतळे, स्मारके इत्यादींसाठी वापरलेले असे दगड कालांतराने पिवळट पडलेले दिसतात किंवा त्यांवर लहान लहान खड्डे पडलेले दिसतात. काही इमारतींचे दगड सैल झाल्यामुळे त्यांची दुरुस्ती करावी लागते.

वनस्पतींच्या कुजण्यामुळे अनेक प्रकारची सेंद्रिय अम्ले तयार होतात. त्यांची खडकांच्या खनिजांवर रासायनिक क्रिया होऊनही काही प्रमाणात रासायनिक विदारण होते.

विदारणाचे प्रकार व त्याची कारके यांचा वेगवेगळा विचार सोयीसाठी केला, तरी प्रत्यक्षात त्यांची क्रिया एकत्रितच होत असते. विदारणाने तयार झालेले डबर वाहून नेऊन क्षरण कारके भूपृष्ठाची झीज घडवून आणतात आणि झीज होताना तयार झालेल्या डबराचेही ओझे वाहून नेऊन दुसऱ्या ठिकाणी भर टाकण्याचे कार्य करतात.

विस्तृत झीज : मूळ खडक आणि विदारणाने त्यापासून बनलेले डबर उतारावर साचून राहतात. गुरुत्वाकर्षणामुळे ते उतारावरून घसरत, गडगडत, वाहत किंवा एकदम खाली पडत जातात. मूळ खडक वस्तुतः चांगल्या आधारावर घट्ट उभा असतो परंतु त्याच्या पायथ्याचा खडक विदारणाने भुगा होऊन खाली घसरला, तर तीव्र उतारावरून वरचा मूळ खडकही गडगडत जातो. उतारावरील माती व डबर सहजच खाली घसरत असतात. यामुळे कित्येकदा डोंगरावरून मातीचे किंवा चिखलाचे लोंढे खाली दरीत वेगाने आलेले आढळतात. त्यामुळे कधी कधी नुकसान होते. भूकंप व ज्वालामुखींचे स्फोट यांमुळेही माती किंवा चिखल घसरत येतात. काही वेळा डोंगराळ भागात जमिनीत मुरलेले पाणी खालच्या चिकणमातीच्या थरापर्यंत पोहोचले म्हणजे ते आणखी खाली जात नाही. चिकणमातीच्या पृष्ठावरून ते वाहू पाहते आणि हे पृष्ठ गुळगुळीत होऊन त्याच्यावरील जमिनीचा किंवा खडकाचा जलसंपृक्त भाग त्याच्याच वजनाने उतारावरून खाली घसरतो. याला भूमिपात म्हणतात. हिमालयीन प्रदेशात हा प्रकार पुष्कळ वेळा अनुभवास येतो. भूमिपातामुळे दरीतील किंवा उतारावरील गावे, रस्ते वगैरे उद्ध्वस्त होण्याचा संभव असतो. रस्ते, घरे वगैरेंसाठी केलेली खोदाई, झाडी तोडणे , पाण्याचा निचरा योग्य प्रकारे न होणे यांमुळे असे अपघात अधिकच संभवतात. हिमालयातील देवस्थानांच्या यात्रा करणाऱ्या यात्रेकरूंवर यांमुळे कधी कधी कठीण प्रसंग ओढवलेले आहेत. भूमिपाताबरोबर आलेली माती, दगड, धोंडे वगैरेंचे डबर दरीत किंवा जलप्रवाहाच्या मार्गात आल्याने बांध तयार होऊन त्यामागे पाणी साचून सरोवरे निर्माण होतात. हे कच्चे बांध फुटून सरोवरांतील पाण्याचा पूर येऊन अधिकच हानी होते. १९६८ मध्ये हिमालयातील ऋषिगंगा नदीत कडा कोसळून असे सरोवर तयार झाले होते. उतारावरून कमीअधिक वेगाने खाली घसरत जाणाऱ्या माती, डबर, खडक वगैरेंमुळे होणारी जमिनीची झीज ही ‘विस्तृत झीज’ होय.


चुनखडकावरील पाण्याची क्षरणक्रिया

वाहते पाणी : पावसाचे पाणी जमिनीवर पडले म्हणजे त्यातील काही पाण्याचे बाष्पीभवन होऊन ते पुन्हा वातावरणात जाते, काही पाणी जमिनीत मुरते आणि काही पाणी जमिनीवरून उताराकडे वाहू लागते. ते सपाट पृष्ठावरून थराच्या स्वरूपात खाली येऊ लागते किंवा लहानलहान प्रवाहांतून मोठ्या प्रवाहात येऊन विशिष्ट मार्गाने नदीच्या स्वरूपात वाहू लागते. ते शेवटी समुद्राला मिळावयाचे असते. पावसाचे पाणी जमिनीवर पोहोचण्याच्या आधी गवतावर किंवा झाडाझुडपांवर पडले, तर त्याचा जोर कमी होऊन ते जमिनीवर ठिबकते. गवतावर पडलेले पाणी त्याच्या काड्यापात्यांमधून वाट काढून हळूहळू खाली येते. उघड्या जमिनीवर पडलेले पावसाचे थेंब मात्र आपल्या जोराने मातीचे कण ढळवितात आणि त्यांना बरोबर घेऊन पाणी वाहू लागते. जोरदार वादळी पावसामुळे एक हेक्टर जमिनीवरील सु. सव्वादोनशे मेट्रिक टन माती याप्रमाणे ढळविली जाते. मातीचे हे कण जमिनीची नैसर्गिक छिद्रे बुजवितात व पाणी न मुरता अधिकच वाहू लागते आणि जमिनीची अधिकच झीज करते. उतार जितका अधिक तीव्र तितकी ही झीज जास्त होते. मातीचे कण उताराच्या पायथ्याशी येऊन तेथे किंवा दरीच्या तळावर साचून राहतात. हे मिश्र डबर किंवा बारीक कणांचा गाळ म्हणजे या ठिकाणी पडलेली भर होय. यात वाळूचे कण जास्त असले, तर ते शेतीला अपायकारक ठरतात. तसेच लहान प्रवाहांच्या मार्गावर गाळ साचून पाणी आजूबाजूला पसरण्याचा संभव असतो. उतार तीव्र आणि वाहणारे पाणी पुष्कळ असेल, तर अनेक छोट्या, जवळजवळ समांतर ओहोळांनी पाणी खाली येते. हे ओहोळ जमीन झिजवून अधिकाधिक खोल होत जातात, शेजारशेजारचे ओहोळ एक होतात आणि मग उतारावर नाळी व घळया पडू लागतात. नंतर प्रदेशाला उत्खातभूमीचे स्वरूप येऊ लागते. यामुळे शेती उद्ध्वस्त होऊ नये म्हणून उतारावर बांध घालून रुंद पायऱ्या तयार करतात, माती धुपून जाऊ नये म्हणून झाडेझुडपे लावतात व घळयांची तोंडे बंद करून त्या गाळाने भरून येऊ देतात. शेतात ताली घालून बांधबंदिस्ती याचसाठी करतात.

तीव्र उताराच्या डोंगराळ भागांत अनेक प्रवाह एकत्र येऊन एक मोठा प्रवाह बनला आणि तो दोन काठांमधून ठराविक मार्गाने वाहू लागला, म्हणजे त्याला ⇨नदी  म्हणतात. ज्या मूळ प्रवाहामुळे नदी बनते, ते तिचे शीर्ष प्रवाह किंवा उगम प्रवाह होत. कधी कधी नदी एखाद्या सरोवरातून, झऱ्यातून, हिमनदीतूनही उगम पावते व उताराकडे वाहत जाते. ती दुसऱ्या नदीलाच किंवा एखाद्या सरोवराला किंवा शेवटी समुद्राला जाऊन मिळते तेथे तिचे मुख असते. वाहून आणलेले पदार्थ तेथे टाकून नदी त्या ठिकाणी भर घालते.

नदीचे विविध कार्य : नदीच्या पाण्याने व त्याबरोबर आलेल्या खडकाच्या लहानमोठ्या तुकड्यांनी तिच्या पात्राच्या तळाचे व बाजूचे अपघर्षण व क्षरण होते. यामुळे तयार झालेला माल पाण्याबरोबर वाहत जातो आणि पुढे योग्य ठिकाणी त्याची भर पडते. तथापि अपघर्षण किंवा क्षरण होण्यास आधी थोडे वहन व्हावे लागते आणि वहनाची परिणती अखेर अवसादनात म्हणजे भरीत किंवा स्थापनात व्हावयाची असते. या दृष्टीने क्षरण, वहन व भरण मिळून एकच संलग्न क्रिया मानता येईल. नदीच्या पाण्याच्या आघाताने आणि वाहत्या पाण्याच्या ओढीमुळे पात्राच्या तळावरील सेंद्रिय द्रव्ये, गाळ, माती, खडे इ. खरडून काढून वाहून नेले जातात. ही जलीय क्रिया होय. खडकांचे तुकडे पाण्याबरोबर वाहताना तळावर व बाजूवर घासून त्यांचे टवके काढतात. पाण्याबरोबर घरंघळत जाणारे दगडगोटे मोठ्या कणांना रगडून बारीक करतात.

याप्रमाणे होणारी झीज अपघर्षणाने होते. याच्या जोडीला रासायनिक क्रियाही होत असते. पाण्यात किंवा ऑक्सिजन अथवा कार्बन डाय-ऑक्साइड विरघळलेल्या पाण्यात तळखडकांचा किंवा बाजूच्या खडकांचा काही भाग विरघळून किंवा रासायनिक क्रियेने अलग होऊन खडकांचे क्षरण होते. अपघर्षणात फक्त कायिक क्रिया अभिप्रेत आहेत, तर क्षरणात कायिक व रासायनिक दोन्ही क्रियांचा समावेश आहे.

नदीबरोबर वाहत जाणाऱ्या पदार्थांपैकी काही तिच्या पाण्यात विरघळलेले असतात, तर काही पाण्यात तरंगत असतात. त्यामुळे पाणी गढूळ दिसते आणि दगडगोटे, खडे इ. जडपदार्थ तिच्या तळावरून घसरत, घरंगळत जात असतात. त्यांच्यामुळे तळाची झीज होऊन पात्र खोलखोल होत जाते.

नदीमार्गांचे तीन टप्पे : उगमापासून मुखापर्यंत नदीचे सामान्यपणे तीन टप्पे मानता येतात. डोंगराळ प्रदेशातून तीव्र उतारावरून सौम्य उताराच्या मैदानी प्रदेशात येईपर्यंत तिचा पहिला किंवा वरचा टप्पा होतो. सौम्य उताराच्या मैदानी प्रदेशातील तिचा मार्ग हा दुसरा किंवा मधला टप्पा होय आणि मुखाजवळचा अगदी सपाटीचा, अतिसौम्य उताराचा मार्ग हा तिचा तिसरा किंवा खालचा टप्पा होय. काही वेळा उगमापासून मुखापर्यंत नदीचे जीवन मानून त्याच्या युवा, प्रौढ, वृद्ध इ. अवस्था मानतात. पहिल्या टप्प्यात बाल्य व तारुण्य या अवस्था, मधल्या टप्प्यात पूर्वप्रौढ व उत्तरप्रौढ अवस्था आणि तिसऱ्या टप्प्यात उत्तरप्रौढ आणि वृद्ध अवस्था मानता येतील. भूपृष्ठावरील नदीकार्याचे अंतिम ध्येय ते भूपृष्ठ समुद्रसपाटीला आणणे हे असते.

वरच्या टप्प्यात नदीचा वेग मोठा असतो आणि तिचे कार्य मुख्यतः क्षरणाचे व वाहनाचे असते. या टप्प्यात भरण किंवा अवसादन दिसून येत नाही. मधल्या टप्प्यात वेग कमी होतो. क्षरण, वहन व भरण ही तिन्ही कार्ये होतात. तिसऱ्या टप्प्यात क्षरण बहुतेक थांबते, वहन अतिशय संथ असते आणि अवसादनाचे कार्य प्रमुख असते. पहिल्या टप्प्यात लहानमोठी डबकी आणि सरोवरे, ⇨ धबधबे व द्रुतवाह, ⇨ कुंभगर्त, निदऱ्या या गोष्टी दिसून येतात. येथे नदीखोरे अरुंद ‘व्ही’ आकाराचे असते. मधल्या टप्प्यात पुराचे वेळी पाणी व गाळ नदीकाठावर दूरवर पसरतात. पूर ओसरताना गाळाचे थर तेथेच साचून निर्माण झालेली छोटी पूरमैदाने बनू लागतात व नदीखोरे थोडे पसरट होते परंतु ते व्ही आकाराचेच राहते. खालच्या टप्प्यात प्रत्येक पुराचे वेळी काठावर प्रथम भरड खडे वगैरे, मग त्यापलीकडे अगदी बारीक कणांचा गाळ पसरत जातो. दर वेळेला अगदी लांबपर्यंत गाळ पसरला गेला नाही, तरी पाण्याच्या कडेला दर वेळी भर पडून तयार झालेले नैसर्गिक बांध किंवा पूरतट अगदी सपाट भागातून जाताना वाटेतील एखाद्या क्षुल्लक अडथळ्यामुळेही मार्ग बदलतो. त्यामुळे प्रवाहाला आलेले वळण त्याच्या अंतर्वक्र भागाची होणारी झीज व बहिर्वक्र भागावर पडणारी भर, यांमुळे वळणाची वक्रता वाढते. अनेक नागमोडी वळणे बनणे आणि तीव्र वळणाची टोके जवळ येऊन एकमेंकाना मिळून मधला भाग तुटून त्याची झालेली नालाकृती सरोवरे, ⇨ त्रिभुज प्रदेश इ. वैशिष्टे दिसून येतात. नदीखोरे अगदी पसरट व्ही आकाराचे होते. पूरतट, पूरमैदाने, त्रिभुज प्रदेश ही नदीच्या अवसादन (भर) कार्याची उदाहरणे होत.


क्षरणचक्र : एखादा भूप्रदेश नदीने झिजवून झिजवून जवळजवळ सपाट बनविला म्हणजे त्याला प्रायःसमतल म्हणतात. अशा प्रायःसमतलाचे पुन्हा उत्थान झाले, की त्यावर पुन्हा क्षरणकार्य सुरू होते. पूर्वीच्या रुंद खोऱ्यातील नद्या पुन्हा तळाची खोलवर झीज करून अरुंद दऱ्या बनवितात. सपाट भाग पुन्हा डोंगराळ, उंचसखल दिसू लागतो आणि नदीच्या क्षरणकार्याची पुनरावृत्ती होऊन क्षरणचक्र पूर्ण होते.

घसरते बर्फ : हिमवाह [⟶ हिमनदी]. अतिउंच पर्वतांवर किंवा अतिथंड हवेच्या प्रदेशांत विशेषतः हिवाळ्यात हिमवृष्टी होते. हिमक्षयन म्हणजे बाष्पीभवनाने किंवा वितळण्यामुळे हिम नाहीसे न झाल्यास ते साचून राहते. वर्षानुवर्षे असे हिम साचले म्हणजे त्याचा जाड थर तयार होतो. त्याचा बाहेरचा भाग वितळतो, पुन्हा थिजतो आणि बर्फाचे कण तयार होतात. हे कण वरच्या दाबाने एकत्र घट्ट होऊन स्फटिकयुक्त घट्ट बर्फ तयार होतो. त्याच्या वरच्या थरांचा दाब खालच्या थरांवर पडून तेथे बर्फाचा विलय बिंदू कमी होऊन ते वितळते आणि त्यामुळे साचलेले हिम अधिक मोठ्या पृष्ठावर पसरते किंवा उतारावरून हिमवाह किंवा हिमनदी या रूपाने घसरू लागते. आधीच्या नदीखोऱ्यातून किंवा दरीतून खाली वाहत जाणाऱ्या हिमनदीमुळे भूपृष्ठावर झीज व भर होते. आर्क्टिक किंवा ध्रुव प्रदेशात निर्माण झालेले बर्फाचे थर हिमकाळात सभोवती पसरून मार्गातील भूस्वरूपांसही झाकून टाकतात. हजारो चौ. किमी. विस्ताराचा व शेकडो मीटर जाडीचा हा बर्फथर म्हणजे भूखंड हिमनदी होय. भूखंड हिमनदीमुळेही भूपृष्ठाची झीज व भर होते.

हिमनदीत भूपृष्ठावरील माती, दगडगोटे, अणकुचीदार व धारदार खडकांचे तुकडे अडकतात आणि हिमनदी वाहू लागली म्हणजे भूपृष्ठावर त्यांचे घर्षण होते. घर्षणाने हिमनदीला मिळालेले पदार्थही पुन्हा घर्षणाची हत्यारे म्हणून कार्य करतात. काही शास्त्रज्ञांच्या मते हिमनदीमुळे होणारी झीज साध्या नदीमुळे होणाऱ्या झिजेपेक्षा अधिक असते.

हिमनदीच्या मार्गातील लहानमोठे दगडधोंडे व खडक तिच्या जोरामुळे उचकटून निघतात, त्या जागी खोलगट भाग तयार होतात. उखडलेले व बरोबर आलेले दगडधोंडे वगैरे दुसऱ्या जागी जाऊन पडतात.

हिमयुगाच्या काळात पृथ्वीच्या मोठ्या भागावर बर्फाचे थर साचले होते. पुढे हिमयुगाच्या अखेरीस हे थर वितळू लागले आणि हिमथर ध्रुवांकडे हटू लागले. तेव्हा हिमथराबरोबर आलेली धोंडमाती आणि विदेशज किंवा पाहुणे खडक मूळच्यापेक्षा वेगळ्याच प्रदेशात पसरले गेले आणि खोलगट प्रदेशात पाणी साचून सरोवरे बनली. बर्फाच्या घसरण्यामुळे खडकांवर खोबणी आणि चरे उमटले. आता त्यांच्या अभ्यासाने बर्फ वाहण्याची दिशा ठरविता येते.

विदारण, विस्तृत झीज, वाहत्या पाण्याचे कार्य इत्यादींचा परिणाम झालेल्या डोंगराळ भागात बर्फ साठले, तर उंचावरील भागात प्रथम त्याचा साठा होतो. तेथील खडकांवर त्या बर्फाच्या हालचालीचा व हिमन विध्वंसाचा परिणाम होऊन ⇨ हिमगव्हरे तयार होतात. त्यांच्या अतितीव्र उताराच्या, जवळजवळ उभ्या बांजूवरून खळग्यात साठलेले बर्फ नंतर तोंडावरून खाली घसरते व हिमनदी सुरू होते. तीव्र उतारावरून कोसळणाऱ्या हिमप्रपाताबरोबरही दगडगोटे, खडक इत्यादींचा लोंढा येतो आणि पुढच्या प्रदेशात त्याची भर पडते. डोंगरउतारावरील बर्फाचा थरच्या थर कधी कधी खाली कोसळतो. बंदुकींच्या किंवा विमानांच्या आवाजांमुळेही असे थर कधी कधी कोसळतात. यासाठी गिर्यारोहक हिमाच्छादित गिरिशिखरे चढून जात असताना असे मोठे आवाज न होतील, अशी दक्षता शक्य तो घेतली जाते. हिमगव्हराच्या बाजूंवरील फटींतून साठलेल्या बर्फाच्या वितळण्या-गोठण्यामुळे खडकांचे अणकुचीदार तुकडे सुटून बर्फात मिसळतात. ते हिमनदीबरोबर नंतरच्या खडकांवर घासून त्यांना झिजवितात आणि त्यांचे तुकडे करतात. शेजारशेजारच्या हिमगव्हरांच्या बाजू त्यांवरून घसरणाऱ्या बर्फामुळे झिजून तीक्ष्ण धारेच्या हत्यारांसारख्या ⇨ प्रशिखा निर्माण होतात. हिमगव्हराची पाठही झिजत असतेच. एकमेकांस लागून असलेल्या तीन किंवा अधिक हिमगव्हरांच्या पाठी मागेमागे झिजत जाऊन त्यांच्या प्रशिखांमुळे शृंग तयार होते. पाठीला लावून उभ्या असलेल्या हिमगव्हरांच्या पाठी झिजेमुळे एक होऊन ग्रीवाखिंड तयार होते. हिमनदी घसरताना तळावरील खडक उखडते आणि आधीच्या व्ही आकाराच्या दरीतून खाली घसरताना तिचा तळ व बाजू झिजवते. झिजवून काढलेल्या मालाची ती ⇨ हीमोढ म्हणून दरीच्या तळावर, हिमनदीच्या काठावर, दोन हिमनद्यांच्या मीलनरेषेवर आणि शेवटी हिमनदी वितळून संपते तेथे भर टाकते. पाण्यापेक्षा बर्फ घट्ट असल्यामुळे हिमनदी दरीचा व्ही आकार बदलून तिला यू आकार देते. तिला मिळणाऱ्या हिमनद्यांसह ही हिमनदी वितळून जाऊन ⇨ दरी  बर्फमुक्त झाली म्हणजे दरीचा हा यू आकार दिसून येतो. मिळणाऱ्या उपनद्या जेथे मूळ नदीला मिळत असत, त्यापेक्षा हिमनदीने मुख्य दरी अधिक खोलवर झिजवल्यामुळे त्यांच्या दऱ्या यू दरीच्या काठावर लोंबल्यासारख्या दिसतात. त्यांना ‘लोंबत्या दऱ्या’ म्हणतात. त्याही यू आकाराच्या असतात. त्यांतून नंतर वाहणारी नदी मुख्य यू दरीत धबधबा म्हणून कोसळते. तिने आणलेले डबर धबधब्याच्या तळाशी शंकूच्या आकाराच्या राशीत साचते. हिमनदीने आणलेले डबर सपाट प्रदेशात पुष्कळदा ⇨ एस्कर  किंवा ⇨ ड्रमलिन  यांच्या रूपाने साठलेले आढळते.

भूमिगत पाणी : जमिनीत झिरपून जाणाऱ्या पाण्याचे कार्य भूपृष्ठावर सहसा दिसून येत नाही परंतु चुनखडी असलेल्या कार्स्ट प्रदेशात, कार्बानिक अम्लयुक्त पाण्यात चुनखडीचा अंश विरघळून विवरे तयार होतात आणि त्यांत जलप्रवाह लुप्त होतात. ते पुढे अधिक खालच्या पातळीवर झऱ्यांच्या रूपाने बाहेर येतात. भूपृष्ठाखाली भूमिगत पाण्याच्या कार्यामुळे खडकाच्या फटी रुंदावतात, ⇨ गुहा तयार होतात. त्यांत काही ठिकाणी ऊर्ध्वमुख व अधोमुख लवणस्तंभ, झुंबरे इ. तयार होतात. एखाद्या गुहेचे छप्पर कोसळले म्हणजे तेथे दरी दिसून येते.

समुद्राचे पाणी, लाटा :समुद्राच्या लाटांमुळे समुद्रकिनाऱ्यावर झीज व भर या दृष्टीने महत्त्वाचे कार्य होत असते. नद्या, हिमनद्या, वारा, ज्वालामुखी इत्यादींनी समुद्रात आणून टाकलेला गाळ, खडे, दगडगोटे इ. डबरही लाटांबरोबर येत असते. त्याचाही या कार्यात महत्त्वाचा वाटा असतो. समुद्रकिनारा उत्थानामुळे बनलेला आहे की खचण्यामुळे, त्याचे खडक मऊ आहेत की कठीण यांवरही हे कार्य अवलंबून असते. उत्थानामुळे बनलेला समुद्रकिनारा बहुतेक सरळ असतो व किनाऱ्यापासून सागरतळ हळूहळू उतरता होत गेलेला असतो. अशा किनाऱ्याकडे येणाऱ्या लाटांचा तळ किनाऱ्याला पोहोचण्याआधीच सागरतळाला टेकतो आणि तेथे लाटेचा जोर ओसरून तिच्याबरोबर आलेले बरेचसे डबर तेथे, किनाऱ्यापासून थोडे दूरच साठते. लाटेचा वरचा भाग पुढे कोसळतो आणि काही वाळू, दगडगोटे वगैरे घेऊन उथळ पाण्याचा एक थर किनाऱ्यापर्यंत येतो. त्या पदार्थांची भर पाण्यात पडते परंतु किनाऱ्यापासून हे पाणी परतताना यातील काही पदार्थ बरोबर घेऊन जाते. किनाऱ्याकडे येणारी लाट त्याच्याशी काटकोन करून येत असेल तर ती त्या त्याच दिशेने परत फिरते परंतु ती तिरप्या दिशेने आली तर पाणी किनाऱ्याला समांतर दिशेने काही अंतर जाते आणि किनाऱ्यावर थोडी भर पडते. किनाऱ्यापासून काही अंतरावर पडलेल्या डबराचा बांध हळूहळू वाढत जातो आणि ते समुद्रसपाटीच्यावर येऊन तेथे वाळूचा दांडा किंवा बांध तयार होतो. मग हा बांध आणि किनारा यांमध्ये शांत पाण्याचे ⇨ खाजण  किंवा ⇨खारकच्छ तयार होते. वाळूचा दांडा ⇨वालुकाभिंती हा नेहमी किनाऱ्याला समांतरच असेल असे नाही. समुद्रतळाची रचना, वाऱ्यांची दिशा इ. कारणांनी बांधाचे एक टोक किनाऱ्याच्या जमिनीला टेकलेले, तर दुसरे समुद्रात तिरपे निमुळते होत गेलेले दिसते. याला जिह्वा असे म्हणतात. याचे अनेक प्रकार दिसून येतात. जिह्वेचे टोक आकड्यासारखे आत वळलेले कधी कधी दिसते, तर किनाऱ्याजवळच्या बेटाला वाळूचा बांध जोडला गेलेला कधी कधी आढळतो. त्याला टोंबोलो म्हणतात.


किनाऱ्यावरील खडक मऊ असेल, तर लाटा व त्यांच्याबरोबरचे डबर यांच्या माराने तो जास्त झिजतो व कठीण असेल तर कमी झिजतो. कठीण खडकांचे भाग भूशिरे म्हणून समुद्रात घुसल्यासारखे दिसतात, तर मऊ खडक झिजून तेथे पाणी शिरून आखाते व उपसागर बनतात. आखातात व उपसागरात लाटांचा जोर कमी होऊन त्यांच्याबरोबरचे डबर किनाऱ्यावर साठून ⇨पुळण  तयार होते. सरळ किनाऱ्यावरही पुळणी तयार होतात.

खचण्यामुळे बनलेल्या किनाऱ्यावर पुष्कळदा खडकाचे उभे कडे थेट पाण्यापर्यंत आलेले दिसतात. अशा उभ्या खडकांवर लाटांचा मारा होऊन ते झिजतात. लाटांबरोबरच्या डबराच्या मारामुळे ते अधिकच झिजतात. त्यांच्या तळाचा भाग झिजून कालांतराने तेथे पोकळी तयार होते. तीही लाटांच्या माऱ्‍याने अधिकच खोल, जमिनीच्या बाजूला झिजलेली होऊ लागते आणि सागरी गुहा निर्माण होते. या गुहेत लाटांचे पाणी जोराने शिरले, की त्याबरोबर काही हवाही आत कोंडली जाते. पाण्यामुळे ती दाबली जाऊन तीही खडकांची झीज करते. आतील खडकाला उभी चीर असेल, तर गुहेत घुसलेले पाणी तिच्यातून कारंजासारखे वर उसळते, अशा चिरेला वातविवर म्हणतात. त्याचीही झीज होत जाते. गुहेचे तोंड याप्रमाणे झिजते परंतु तिचा वरचा भाग कमी झिजल्यामुळे तेथील खडक लोंबत राहतो आणि कालांतराने तो मोडून पडतो. यामुळे सबंध कडाच मागे हटल्याप्रमाणे दिसतो. गुहा तयार न होता कड्याचा लांबच लांब भाग तळाशी झिजून झिजून वीचिकृत मंच तयार होतो. लाटांचे पाणी मागे जाताना झिजलेले दगडगोटे वगैरे माल त्याबरोबर जाऊन किनाऱ्याला लागून भरीमुळे पाण्याखाली वीचिरचित मंच तयार होतो. समुद्रात पुढे शिरलेल्या डोंगरांच्या भागात काही मऊ खडकाचा भाग असेल तर तो झिजून डोंगराच्या त्या भागाला आरपार भोके पडून खडकाची कमान तयार झालेली दिसते आणि कालांतराने कमानीचे छप्पर कोसळून डोंगराचा खांबासारखा तुटक भाग सागरखुंट पाण्यात उभा राहिलेला दिसतो.

वाऱ्याने उभारलेले सहारातील वाळूचे ‘पिरॅमिड’

वारा : वाऱ्यामुळे होणारी झीज किंवा भर विशेषतः कोरड्या हवेच्या प्रदेशांत (मरुप्रदेशांत) दिसून येते. वाऱ्याच्या माऱ्याने खडकांचे ढिले झालेले कण किंवा कपचे सुटून पडण्यास मदत होते परंतु वाऱ्याचे कार्य मुख्यतः त्याच्याबरोबर वाहून येणाऱ्या वाळूच्या माऱ्याने दिसून येते. वाळूच्या घर्षणाने खडक झिजतात आणि त्यांचे तुकडे तुकडे व शेवटी बारीक वाळू बनते. वाळू आणि वारा यांच्या संयुक्त माऱ्यामुळे रुक्ष प्रदेशातील खडकांची झीज होऊन त्यांस चित्रविचित्र आकार प्राप्त होतात. कधी कधी वाऱ्याच्या मार्गात उभ्या असलेल्या खडकाचा मधलाच भाग जास्त झिजून ⇨ छत्री खडक तयार होतो. वाऱ्यामुळे वाळू दुसरीकडे वाहून नेली जाऊन तिची भर पडते आणि ⇨वालुकागिरी  निर्माण होतात. काही वालुकागिरी स्थिर असतात, तर बहुतेक अस्थिर असतात कारण त्यांच्या वाताभिमुख सौम्य येथे आकृती आहे.उतारांवरून वाऱ्याने वाहून येणारी वाळू त्यांच्या तीव्र, वातपराङ्‌मुख उतारावरून पलीकडे पडत राहते आणि सबंध वालुकागिरीच पुढे सरकल्यासारखा वाटतो. चंद्रकोरीच्या आकाराचे बारखान वालुकागिरीही वाऱ्यामुळेच निर्माण होतात. वाऱ्यामुळे एका ठिकाणची माती दुसरीकडे वाहून नेली जाते आणि तेथे तिची भर पडते. हे ‘लोएस’ मातीचे थर होत.

विवेचनाच्या सोयीसाठी विदारण, नदी, हिमनदी, लाटा, वारा इत्यादींचा झीज आणि भर या दृष्टींनी वेगवेगळा विचार केला तरी कोणत्याही एका ठिकाणी यांपैकी अनेक कारके एकाच वेळी कार्य करीत असतात आणि त्यांचा संकलित असा परिणाम होत असतो.

संदर्भ :

1. Kellaway, G. P. A Background of Physical Geography, London, 1960.

2. Monkhouse, F. J. Principles of Physical Geography, London, 1962.

3. Strahler, A. N. Physical Geography, New Delhi, 1971.

कुमठेकर, ज. ब.